आदिवासी समाज ‘बिरसा मुंडा’ यांची देव म्हणून पूजा का करतो..?
आदिवासी समाज ज्यांची देव म्हणून पूजा करतो अशा महान स्वातंत्र्यसैनिक ‘बिरसा मुंडा’ यांची आज पुण्यतिथी
इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढताना पत्करलेल्या हौतात्म्याने बिरसा मुंडा यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अजरामर करून ठेवलंय.
कोण होते बिरसा मुंडा..?
झारखंडच्या इतिहासात बिरसा मुंडा या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलीहातु या खेडेगावात जन्मलेल्या बिरसा मुंडा यांनी आपले गुरु जयपाल नाग यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतलं होतं.
त्यानंतर जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
पण काही काळातच या शाळेत आदिवासी संस्कृतीची उडवली जाणारी खिल्ली बघून संतापलेल्या बिरसा यांनी त्या विरोधात बंडाची भाषा बोलायला सुरुवात केल्याने त्यांना या शाळेतून काढून टाकण्यात आलं.
त्यानंतर बिरसा छोटा नागपूर परिसरात ब्रिटिशांविरोधातील सरदार आंदोलनाच्या संपर्कात आले आणि ब्रिटिशांनी १८८२ साली बनवलेल्या वनकायद्याचा त्यांनी प्रखर विरोध केला.
बिरसांच्या वाढत्या विरोधामुळे १८९५ साली सर्वप्रथम त्यांना अटक करण्यात आली. २ वर्षे त्यांनी तुरुंगात घालवली.
आदिवासी समाज बिरसा यांना देवाचा अवतार का मानू लागला..?
ब्रिटिशांविरोधात संघर्ष सुरु असतानाच जमीनदाराकडून देखील आदिवासींना दिलेली क्रूर वागणूक बघून बिरसंच्या मनात जमीनदारांविरोधात विद्रोह तयार झाला होता. त्यामुळे त्यांनी जमिनदारांविरोधात देखील आपला आवाज बुलंद केला होता.
आदिवासींच्या नैसर्गिक संपत्तीवर पहिला अधिकार त्यांचाच असल्याचे त्यांनी ठासून सांगितले आणि तो मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी आदिवासींना दिली.
शिवाय बिरसा मुंडा यांनी लोकांचं प्रबोधन करायला देखील सुरुवात केली. त्यांच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्यानंतर त्यांनी धर्माची आपली व्याख्या केली आणि त्यातूनच ‘बिरसईत पंथा’ची सुरुवात झाली.
साथीच्या रोगाच्या काळात त्यांनी गावोगाव फिरून लोकांची सेवा केली. त्यामुळेच लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची श्रद्धा वाढायला लागली.
असंही सांगितलं जातं की १८९५ साली काही अलौकिक घटना घडल्या आणि त्यामुळे आदिवासी लोक त्यांना देवाचा अवतार मानायला लागले.
उलगुलान
बिरसा यांनी आदिवासींचं धर्मांतर मोठ्या प्रमाणात थांबवलं आणि आदिवासी संस्कृती आणि परंपरांचं जतन करण्याची शिकवणूक आदिवासींना दिली. त्यानंतर बिरसा मुंडा यांनी आपल्या अनुयायांना इंग्रजाविरोधात खुल बंड करण्याचं आवाहन केलं.
त्यांच्याच नेतृत्वाखालील इंग्रजांविरोधातील आवाज बुलंद करण्यात आला. बिरसांनी आपल्या अनुयायांना घेऊन ब्रिटीशांच्या विरोधात उभारलेल्या या आंदोलनालाच ‘उलगुलान’ म्हणून ओळखलं जातं.
२४ डिसेंबर १८९९ रोजी त्यांनी ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र बंड केलं.
आपल्या साथीदारांना घेऊन त्यांनी धनुष्यबाणाने इंग्रज पोलीस चौक्यांना आग लावायला सुरुवात केली. समोरून इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबाराचा वर्षाव केला. ब्रिटीश आणि मुंडा यांच्या साथीदारांमध्ये घनघोर लढाई झाली. अनेक लोक मारले गेले.
त्यानंतर ३ मार्च १९०० ब्रिटिशांनी मुंडा यांना अटक केलं. त्यांच्यासोबत अजून जवळपास ५०० अनुयायांना देखील अटक झाली.
जेलमध्ये असताना ब्रिटिशांनी बिरसा यांना प्रचंड यातना दिल्या. पण त्यांनी ब्रिटिशांसमोर झुकायला स्पष्ट नकार दिला. ९जून १९०० रोजी रांचीच्या जेलमध्येच वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
ब्रिटीश सरकारने हैजा या रोगामुळे बिरसांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र अनेकजण ब्रिटिशांनी त्यांची हत्या केल्याचा दावा करतात.
हे ही वाच भिडू
- स्वातंत्र्यलढ्यात सर्वात कमी वयात फासावर चढलेला क्रांतिकारक !
- जेलमध्ये जाळण्यात आलं आणि बाहेर आत्महत्येच्या बातम्या पेरल्या : गोष्ट स्वातंत्रसैनिकाची.
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आमरण उपोषण करून शहीद झालेले एकमेव क्रांतिकारक !
- स्वातंत्र्यलढ्यातील एकमेव अमेरिकन ज्याने भारतात ‘सफरचंद क्रांती’ घडवून आणली !
गोवारी प्रकरणानंतर महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना बिरसा मुंडा माहिती झाले. त्या आधी मोजक्या लोकांना बिरसा मुंडा माहिती होते. पुजण्याची परंपरा पण महाराष्ट्रात कदाचित त्यानंतरच सुरू झाली.