सचिनच्या अनेक ऐतिहासिक खेळ्यांना या दोघांनी कॉमेंट्रीच्या माध्यमातून अविस्मरणीय बनवलं !

दोघांचाही जन्मदिवस एकच. क्रिकेटमधील महान ऑल-राउंडर खेळाडूंच्या यादीतील दोघांचंही नाव पहिल्या फळीत. ऑल-राउंडर खेळाडू म्हणून कारकिर्दीची सुरुवात केलेल्या दोघांनीही आपापल्या संघाचे कॅप्टन म्हणून संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली.

क्रिकेटिंग करिअर संपल्यानंतर दोघांनीही कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घेतला आणि या क्षेत्राला देखील एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. क्रिकेटरसिक ‘चॅनेल ९’च्या प्रेमात पडले, कारण दोघांनीही या चॅनेलला आपला ‘आवाज’ दिला. एवढ्या सगळ्या समानता कमी होत्या म्हणून की काय पण दोघांचाही मृत्यू देखील कॅन्सरनेच झाला.

एक ऑस्ट्रेलियाचा तर दुसरा इंग्लंडचा. क्रिकेटमध्ये जेवढी रायव्हलरी भारत-पाकिस्तानमध्ये असते, तेवढीच ती ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये देखील असते. क्रिकेटमधील एकमेकांचे हाडवैरी समजल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या देशांचं प्रतिनिधित्व करणारे ते दोघं मात्र एकमेकांचे जिगरी दोस्त.

रिची बेनो आणि टोनी ग्रेग असं महान ऑल-राउंडर खेळाडूंचं नाव. दोघांचाही आज जन्मदिवस.

क्रिकेटिंग कारकीर्दीचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचे रिचर्ड बेनो, जे रिची बेनो या नावानेच प्रख्यात होते, ते इंग्लंडच्या टोनी ग्रेगला सिनिअर होते. रीचींनी आपली शेवटची टेस्ट १९६४ साली खेळली आणि टोनी ग्रेगचं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पदार्पणचं १९६५ सालचं.

१९७७ सालच्या कॅरी पॅकरच्या ‘पॅकर सर्कस’च्या वेळी मात्र त्या दोघांना एकत्र बघितलं गेलं. क्रिकेटच्या इतिहासात अतिशय वादग्रस्त ठरलेल्या या वर्ल्ड सिरीजचे कर्तेधर्ते म्हणून या जोडगोळीकडेच बघितलं जातं. पण इथून पुढे त्या दोघांची जी भट्टी जमली ती जमलीच.

१९३० साली जन्मलेले रिची बेनो हे क्रिकेटच्या इतिहासात २००० रन्स आणि २०० विकेट्स पूर्ण करणारे पहिले खेळाडू होते. त्यानंतर अनेकांनी या विक्रमाला गवसणी घातली पण पहिला तो शेवटी पहिलाच असतो. त्याचं श्रेय बेनो याचंच.

महान सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातलं त्यांचं जे योगदान आहे त्याचं मुल्यांकन फक्त आकडेवारीत नाहीच होऊ शकत. पण तरीही त्यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकही टेस्ट सिरीज गमावली नाही, हे महान खेळाडू असण्याबरोबरच ते कॅप्टन म्हणून देखील तितकेच महान होते हे सिद्ध करण्यास पुरेसं आहेच की.

richie and graig
डावीकडे रिची बेनो आणि उजवीकडे टोनी ग्रेग

१९४६ साली जन्मलेला ६ फुट ६ इंच एवढा उंचापुरा टोनी ग्रेग हा काही क्रिकेटमधील जन्मजात प्रतिभेचा धनी नव्हता, पण तो प्रचंड हार्डवर्कर होता हे मात्र नक्की. संघाला जिंकून देण्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती हे त्याचं मोठं अॅसेट. त्याच्याच जोरावर त्याने इंग्लंड क्रिकेटमध्ये यशस्वी कॅप्टन म्हणून नाव कमावलं.

१९७६-७७ सालच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील भारताच्या दौऱ्यात इंग्लडला ३-१ असा विजय मिळवून देऊन संघाचा पंधरा वर्षांचा शृंखला विजयाचा दुष्काळ संपवण्याची किमया टोनी ग्रेगनेच तर घडवली होती.

आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये स्वभावातील फटकळपणामुळे मात्र त्याने स्वतःभोवती अनेक वाद ओढवून घेतले. १९७६ सालच्या वेस्ट इंडिजच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी तर ‘आम्ही त्यांना कुत्र्यासारखं फरफटायला लाऊ’ असं म्हणत टोनी ग्रेगने कहरच केला होता. स्लेजिंगमध्ये देखील तो सगळ्यात पुढे असायचा.

या सगळ्याच गोष्टींमुळे आणि १९७७ सालच्या कॅरी पॅकरच्या ‘पॅकर सर्कस’च्या आयोजनातील सक्रीय सहभागामुळे त्याला इंग्लंड संघाचं कर्णधारपद गमवावं लागलं. त्यानंतरच्या काळात त्याचं क्रिकेटिंग करिअर देखील संपुष्टात आलं.

क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर रिची आणि टोनी दोघांनीही क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली. दोघांचीही ही इनिंग त्यांच्या पहिल्या इनिंगपेक्षा सुपर-डुपर हिट राहिली. क्रिकेट जगतातील कित्येक सुवर्ण क्षणांना क्रिकेटच्या इतिहासात कैद करून ठेवण्याचं श्रेय या दोघांकडेच जातं. आजही हे दोघे क्रिकेटजगतातले लिजेंडरी कॉमेंटेटर समजले जातात.

भारतीय क्रिकेटरसिकांसाठी तर सचिन तेंडूलकरच्या अनेक महान खेळ्यांना या दोघांपैकी एकाने किंवा काही वेळा दोघांनी मिळून आपल्या ओघवत्या कॉमेंट्रीच्या शैलीत अजरामर करून ठेवल्यात. विक्रम साठेंच्याच शब्दात सांगायचं तर, “सचिनच्या यशाचं निम्मं श्रेय तर टोनी ग्रेगला पण दिलं पाहिजे”  उदाहरणादाखल आपल्याला १९९८ सालच्या शारजा सिरीजमधली ऑस्टेलियाविरुद्धची सचिनची इनिंग आठवता येईल.

महान सचिन तेंडूलकर, ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई करत असताना तितकाच महान कॉमेंटेटर टोनी ग्रेग कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून आपल्या रसभरीत वर्णनाने दूरदर्शनवरील करोडो क्रिकेटरसिकांसाठीही आणि क्रिकेटप्रेमींच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठीही हा क्षण अविस्मरणीय बनवत होता.

क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणाऱ्या भारतीय क्रिकेटरसिकांनी कॉमेंटेटर म्हणून जेवढं प्रेम या दोघांना दिलं, तेवढं क्वचितच दुसऱ्या कुणा विदेशी कॉमेंटेटरला मिळालं असेल.

१२ डिसेंबर २०१२ रोजी सिडनी येथे टोनी ग्रेग कॅन्सरने गेला. त्यावेळी त्याला श्रद्धांजली वाहताना क्रिक्निन्फोला दिलेल्या मुलाखतीत रिची बेनोने जे म्हंटलय ते क्रिकेट ब्रॉडकास्टिंगच्या क्षेत्रात टोनी ग्रेग किती दादा माणूस होता हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे. रिची बेनोने  म्हंटलं होतं,

“टोनी कॉमेंट्री तर करायचाच, पण तो पीच रिपोर्ट देखील करायचा. पीच रिपोर्ट देऊन सुद्धा इतकी प्रसिद्धी मिळवता येते हे मला त्याच्याकडूनच समजलं. त्याने हे काम जितक्या सफाईदारपणे केलं ते त्याच्याशिवाय इतर कुणाला जमणं कदाचित शक्यच नव्हतं.”

टोनी ग्रेग गेल्यानंतर दोनच वर्षांमध्ये १० एप्रिल २०१५ रोजी रिची बेनो देखील गेले. बेनो गेल्यानंतर टोनी ग्रेगचा मुलगा मार्क ग्रेग म्हणाला, “बेनो आणि माझे पप्पा आता स्वर्गात एकत्र असतील. या दोघांनी जर स्वर्गातून ब्रॉडकास्टिंग सुरु केलं तर तिथे देखील त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळेल”

आजघडीला क्रिकेट बघताना ज्या पद्धतीची कॉमेंट्री ऐकायला लागते, त्यावेळी या दोघांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कॉमेंट्री बॉक्सचं या जोडगोळीने जे स्टँडर्ड सेट करून ठेवलंय त्याचंच हे यश. जोपर्यंत टीव्हीवरून क्रिकेट बघितलं जाईल, तोपर्यंत ही दोघे कायमच स्मरणात राहतील.

  • अजित बायस

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.