जेव्हा कर्टली अँम्ब्रोसने १ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या ७ विकेट्स घेतल्या होत्या !

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक कालखंड असा होता की संपूर्ण क्रिकेट विश्वावर वेस्ट इंडीजच्या संघाचं अधिराज्य होतं. वेस्ट इंडीज हा त्याकाळी क्रिकेटमधील ‘दादा’ संघ समजला जायचा. काय बॅटसमन, काय बॉलर जिकडे तिकडे फक्त वेस्ट इंडीजच्या क्रिकेटर्सचाच बोलबाला असायचा.

जागतिक क्रिकेटमधल्या वेस्ट इंडीजच्या या दबदब्यामागे त्यांचा तेवढाच तगडा संघ होता. जागतिक कीर्तीच्या बॅटसमनसह तोफगोळे फेकल्याप्रमाणे बॉल फेकणाऱ्या वेस्ट इंडीजच्या आक्रमणाला सामोरं जायचा फक्त विचार करून देखील जगभरातील अनेक दिग्गज बॅटसमनना धडकी भरायची, इतकी या वेस्ट इंडिजच्या बॉलर्सची त्याकाळी क्रिकेटविश्वात दहशत होती. वेस्ट इंडीजच्या तिखट आक्रमनापुढे अनेक खेळाडूंचं करिअर संपलं होतं.

डावीकडून कर्टली आणि कर्टनी ही वेस्ट इंडिजच्या आक्रमणाची विध्वंसक जोडगोळी

त्यांच्या बॉलर्सच्या वेगाला मदत मिळायची ती या लोकांच्या उंचीची. असाच एक उंचापुरा बॉलर वेस्ट इंडिजच्या संघात होता. ६ फुट ७ इंच. कर्टली अँम्ब्रोस त्याचं नाव. कर्टली अँम्ब्रोसने आपला जोडीदार कर्टनी वॉल्शच्या साथीत जागतिक क्रिकेटच्या इतिहासावर आपला अमिट असा ठसा सोडलेला आहे. त्या दोघांनी मिळून कितीतरी सामने वेस्ट इंडिजला एकहाती जिंकून दिलेले आहेत. तर त्यातीलच कर्टली अँम्ब्रोसचा आज वाढदिवस.

२१ सप्टेंबर १९६३ रोजी अँटीगुआ मधील स्वीट्स येथे एका सुतारकामकाम करणाऱ्या बापाच्या पोटी जन्मलेल्या या पोराच्या कुटुंबाचा आणि क्रिकेटचा तसा दूर-दूरपर्यंत काही संबंध नव्हता. असलाच तर तो इतकाच की त्याच्या आईला क्रिकेट आवडायचं. अँम्ब्रोसचंही क्रिकेट हे काही पहिलं प्रेम नव्हतं, त्याला बास्केटबॉल अधिक आवडायचा. पण त्याच्या आईने त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तो क्रिकेटकडे वळला.

वयाच्या विसाव्या वर्षी खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळायला सुरु केलेल्या अँम्ब्रोसने अल्पावधीतच क्लब क्रिकेटमधील आपल्या कामगिरीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. फर्स्ट क्लास आणि क्लब क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीने त्याची १९८८ सालच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघात निवड झाली.

सत्तरच्या दशकातील महान जोएल गार्नर यांची जागा त्याने वेस्ट इंडीज संघात घेतली होती. हाच धागा पकडून टोनी कोझीएरने ‘विस्डेन’साठी लिहिलेल्या लेखात  त्याच्याविषयी म्हणून ठेवलंय की

“तो (अँम्ब्रोस) हा जोएल गार्नर यांची रेडी मेड रिप्लेसमेंट होता”

वयाच्या पंचविसाव्या वर्षी किंग्स्टन जमैकाच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. पाच सामन्यांच्या या दौऱ्यातील पहिल्या ३ सामन्यात खेळताना त्याने ८ विकेट्स मिळवत आपली निवड सार्थ ठरवली.

याच दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. पण कसोटीत मात्र त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. पहिल्या कसोटीत त्याला फक्त २ विकेट्स मिळाल्या. शिवाय पाकिस्तानविरुद्धचा हा सामना वेस्ट इंडीजने ९ विकेट्सने गमावला. त्यावेळी तो वेस्ट इंडिजचा गेल्या १० वर्षातील त्यांच्या घरच्या मैदानावरील पहिलाच पराभव ठरला होता.

नंतरच्या काळात मात्र त्याने आपल्या कामगिरीत प्रचंड सुधारणा घडवून आणली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा त्याच्यासाठी फार महत्वपूर्ण राहिला. त्याच्या बॉलिंगच्या जीवावरच वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिरीज ३-१ अशी जिंकली. अँम्ब्रोसच्या शॉर्ट बॉल्समुळे त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघातील बॅट्समनसाठी पळता भुई थोडी झाली होती. या दौऱ्यातील कामगिरीमुळे तो  वेस्ट इंडीजच्या बॉलिंगचा कणा म्हणून समोर आला. कारण या दौऱ्यात त्याने कसोटीत २६ आणि वन-डे मध्ये २१ विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियन बॅटिंगचं कंबरड मोडलं होतं.

१९९० सालच्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातला त्याच्या एका स्पेलने तर संपूर्ण सामन्याचं आणि सिरीजचं देखील चित्र पालटवून टाकलं होतं. ५ सामन्यांच्या या सिरीजमध्ये वेस्ट इंडीजचा संघ १-० असा पिछाडीवर होता. चौथ्या सामन्यातील शेवटच्या दिवशी  वेस्ट इंडीजच्या ३६४ रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ संघर्ष करत होता. पण सामन्याचा शेवटच्या तासभराचा खेळ शिल्लक असताना इंग्लंडच्या हातात ५ विकेट्स होत्या. त्यामुळे तेवढा वेळ खेळून सामना अनिर्णीत अवस्थेत सोडवणं हीच  इंग्लंडची रणनीती होती. अशा स्थितीत वेस्ट इंडीजचा कॅप्टन व्हिव्ह रिचर्डसने बॉल अँम्ब्रोसच्या हातात दिला.

अँम्ब्रोसने देखील आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवताना नव्या बॉलच्या मदतीने पुढच्या तासाभराच्या खेळात इंग्लंडच्या ५ खेळाडूंना पॅव्हेलीयनचा रस्ता दाखवत वेस्ट इंडिजला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या विजयामुळे वेस्ट इंडीजने सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी केली. पुढे पाचवा सामना जिंकत सिरीज देखील जिंकली. या सामन्यात अँम्ब्रोसने एकूण १० विकेट्स घेतल्या होत्या, त्यातील ८ विकेट्स दुसऱ्या डावातल्या होत्या. ४५ रन्स देऊन ८ विकेट्स हीच त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी देखील ठरली.

तो विध्वंसक आणि म्हणूनच अविस्मरणीय स्पेल

त्यानंतरच्या बहुतेक दौऱ्यात अँम्ब्रोस आपली कामगिरी उंचावत राहिला आणि वेस्ट इंडिजच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावत राहिला. पण अँम्ब्रोसच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय स्पेल आला तो पर्थच्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात. १९९३ सालच्या वेस्ट इंडीजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ कसोटीत अँम्ब्रोसने टाकलेला स्पेल आज देखील क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम स्पेलपैकी एक समजला जातो.

वेस्ट इंडिजचा संघ गेल्या १८ वर्षांमध्ये प्रथमच व्हिव्ह रिचर्डस, गोर्डन ग्रीनीज आणि माल्कम मार्शल या आपल्या महान खेळाडूंशिवाय ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता. सिरीजमधली दुसरी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली होती, पण चौथ्या कसोटीत अवघ्या १ रनने थरारक विजय मिळवत वेस्ट इंडीजने बरोबरी साधली होती. त्यामुळे पाच सामन्यांच्या सिरीजमधला पर्थच्या मैदानावर खेळविण्यात येणारा शेवटचा सामना निर्णायक ठरणार होता. दोन्हीही संघ हा सामना जिंकून सिरीज खिशात घालण्याच्या प्रयत्नात होते.

https://www.youtube.com/watch?v=a5G4pqb4nns

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन अॅलन बॉर्डरने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतला होता. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात देखील मिळाली होती. ८५ रन्सवर ऑस्ट्रेलियाच्या २ विकेट्स पडल्या होत्या. लंचनंतर मात्र अँम्ब्रोस आपल्या नवीन स्पेलमध्ये बॉलिंग करायला आला आणि त्याने कहर केला. आधी त्याने वेल-सेटल्ड डेव्हिड बूनला पॅव्हेलीयनमध्ये पाठवलं आणि मग पीचवर आलेल्या कुठल्याच प्लेअरमध्ये त्याच्या तिखट माऱ्याला सामोरं जायचं धाडस झालं नाही.

३२ बॉल्सच्या आपल्या घणाघाती स्पेलमध्ये त्याने कांगारूंच्या ७ विकेट्स मिळवल्या होत्या. विशेष म्हणजे या ७ विकेट्स घेताना त्याने फक्त १ रन मोजला. त्यामुळेच ८२ रन्सवर २ विकेट्स असणाऱ्या कांगारूंचा संघ अवघ्या ११९ रन्सवर ऑल आउट झाला. त्यातही शेन वॉर्न रन आउट झाला, नाहीतर अँम्ब्रोसची ही आकडेवारी १ रन मोजून ८ विकेट्स अशी देखील असू शकली असती. ही अँम्ब्रोसची जादूच होती की अॅलन बॉर्डर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच दोन्हीही डावात शून्यावर बाद झाला होता. अँम्ब्रोसच्या याच कामगिरीमुळे वेस्ट इंडीजने तो सामना आणि सिरीज या दोहोंवरही आपलं नाव कोरलं.

अँम्ब्रोसने आपल्या कारकिर्दीत निवृत्तीपूर्वी खेळलेल्या ९८ टेस्ट मॅचेसमध्ये आपल्या खात्यात ४०५ विकेट्स जमवल्या. विशेष म्हणजे त्याचा संपूर्ण कारकिर्दीतील इकॉनॉमी रेट आहे २.३१ असा राहिला. एकदिवसीय सामन्यात देखील त्याने साधारणतः २४ च्या अॅव्हरेजने २२५ विकेट्स पटकावल्या. तिथेही त्याचा इकॉनॉमी आहे ३.४८.

आयसीसीनुसारच सांगायचं झालं तर अँम्ब्रोस हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये बॉलर्सच्या जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ म्हणजेच २०५७ दिवस पहिल्या क्रमांकावर विराजमान राहिलेला एकमेव बॉलर आहे. २०५७ दिवस म्हणजेच  जवळपास ६ वर्षे. विशेष म्हणजे तो ज्यांची ‘रेडीमेड रिप्लेसमेंट’ समजला जायचा ते गार्नर पण या यादीत क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहेत. त्याच्या एकूणच विस्मयकारक क्रिकेटिंग करीअरसाठी फक्त वेस्ट इंडीजच्याच नाही तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासात तो कायमच ‘लिजेंड’ म्हणूनच लक्षात ठेवला जाईल.

  • अजित बायस

हे ही वाच भिडू