ओ ‘रामजी’ बडा दुख दिया…

आजकाल डॉ आंबेडकरांना नवनवीन नावात, रंगात रंगवायचे काम जोराशोरात सुरु झालेले आहे. एक माणूस जो अस्पृश्य होता, काही लोकांसाठी देशद्रोही होता, काही लोकांना तो ब्रिटीशांचा हस्तक वाटायचा, काहींना नंतर प्रखर राष्ट्रवादी वाटायला लागला. अचानक नव्वदीनंतर तो भारतरत्न झाला. एका मोठ्या माध्यमसमूहाच्या “ग्रेटेस्ट इंडियन” कार्यक्रमात तो गांधीजींनंतरचा ग्रेटेस्ट इंडियन ठरला. काही लोकांना अजूनही तो तिरस्करणीय वाटतो. बरं “तिरस्कार माणसाचा नाश करतो” हे देखील डॉक्टर सांगून गेलेत. हे सांगताना त्यांना किती पराकोटीचा संयम बाळगावा लागला असेल याची कल्पना आताच्या काळात करवत नाही. तर आपल्या सामाजिक कामाच्या सुरुवातीपासून विरोध झेलणारे डॉ आंबेडकर प्रत्येक भारतीयाच्या नजरेत कालपरत्वे बदलत गेलेत. निगेटिव्ह ते सकारात्मक असा प्रवास करणारे ते जगातले एकमेव नेते असावेत.

जसजसे डॉ आंबेडकर वाचले गेले तसतसे त्यांच्याबद्दल असलेले/ठरवून केले गेलेले समज/गैरसमज दूर होऊ लागलेत. हे बदल गेल्या काही वर्षांत हे प्रखरपणे जाणवू लागले आहेत. संपूर्ण बदलायला वेळ लागेल हे खरेच पण वाचूनदेखील डॉक्टर उमगत नसतील तर अवघड आहे. रघुनाथ धोंडो कर्वे यांचा खटला लढवणारे डॉ आंबेडकर आठवतात. व्यक्तीस्वातंत्र्य या त्यांच्या अत्यंत आवडीच्या विषयाचा अट्टाहास हा फक्त दलितांच्या मुक्तीपुरता मर्यादित नव्हता तर तो प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आग्रहातून आलेला होता. डॉक्टर स्वत: कोलंबिया विद्यापीठ (अमेरिका) आणि लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स (इंग्लंड) इथे शिकल्यामुळे त्यांना या मूल्यांची जाणीव होती. याच बळावर ते कर्वेंच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि त्यांचा खटला लढवला. खटला जिंकू शकले नाहीत पण त्या क्षणी अशी भूमिका घेणे, त्याकाळच्या किती पुढाऱ्यांना शक्य होते? समलैंगिक संबंधांबद्दलदेखील डॉ.आंबेडकरांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. अशी भावना काही माणसांमध्ये जन्मतःच असेल तर त्यांना त्याचा आनंद घ्यायचा पूर्ण अधिकार आहे, असे त्यांचे ठाम मत होते. आताच्या काळातला ‘करणी सेने’चा हैदोस पाहिला तर, असे डॉ आंबेडकर कोणात्याही राजकीय पक्षाच्या बंदिस्त चौकटीत बसणे शक्यच नाही. त्यांना पचवणे तेव्हाही आणि आतादेखील भल्याभल्यांना अवघड जाते. शिक्षण घेणे ही काही पुरुषांची मक्तेदारी नाही, स्त्रियांनीदेखील यात पुढाकार घेतला पाहिजे या भूमिकेचे डॉ. आंबेडकर प्रचंड आग्रही होते. कुटुंबातली स्त्री शिक्षित असणे याचे महत्व ते जाणून होते. एखाद्या समाजाची प्रगती मी स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजतो या त्यांच्या मापदंडावर आपण आजच्या काळात किती उरतो, हा प्रश्न आपल्याला समाज म्हणून मान खाली घालायला लावणारा आहे. डॉ आंबेडकरांनी सामान्य भारतीयांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी अनेक विधेयके पारित करून घेतली. ते आंबेडकर कोणत्या रंगाचे होते हा प्रश्न राज्यकर्त्यांना पडत नाही. हे डॉ.आंबेडकर आजही विचार करण्यास भाग पाडतात. याच काळात डॉ आंबेडकर ब्रिटीशांचे हस्तक म्हणून हिणवले जातात. त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो. गांधीभक्त आणि रूढीवादी सनातन्यांना तर डॉक्टर आंबेडकर विशेष प्रिय होते. पण वादविवाद आणि चर्चेवर पूर्ण निष्ठा असणारे डॉ.आंबेडकर प्रत्येक टीकेला तितक्याच जोरकसपणे उत्तर देत सामोरे जातात.

बरं डॉ आंबेडकर एकाच वेळी विविध पातळीवर लिहिते देखील झाले होते. ज्याच्या हातात वर्तमानपत्रं आहे, त्यांना महात्मे निर्माण करणे सहज शक्य आहे हे त्यांचं मत आजदेखील लागू होते. इथल्या सनातन्यांना झोडपून काढतानाच ते बर्ट्रांड रसेलच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शनची समीक्षा देखील करत होते. १९२० साली रसेलने त्यांना या निबंधावर चर्चेसाठी आमंत्रित देखील केले होते. मामा वरेरकरांच्या ‘दुनिया’ या साप्ताहिकात डॉ.आंबेडकरांनी त्यांचे मित्र आणि टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत यांच्यावर एक अप्रतिम लेख लिहिला होता. ते आंबेडकर किती लोकांना कितीसे माहित आहेत. मंडल आयोगानंतर म्हणजे साधारण नव्वदीनंतर इतर समाजाने काहीसे दूर ठेवलेले आंबेडकर थोडे जास्त प्रसिद्धीस आले. १९९१ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या प्रतिमेचा प्रवास असाच विलक्षण आहे.

डॉ.आंबेडकर मुसलमानांवर कठोर टीका करतात. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बुरखाधारी महिला हे भारतात आढळणाऱ्या अगदी  हिणकस दृश्यांपैकीएक दृश्य आहे असे त्यांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे. ते ऐकल्याने पलीकडचे मूलतत्ववादी खुश होतात. हे आंबेडकर त्यांना आपल्या रंगातले वाटतात. कारण त्यापुढे ते वाचतच नाहीत किंवा त्यांना वाचूच दिले जात नाही. उत्तर प्रदेशात डॉ आंबेडकरांच्या मूर्तीला भगव्या रंगात रंगवले गेले आणि लोकांच्या प्रखर विरोधानंतर ती मूर्ती पुन्हा निळ्या रंगात रंगवली गेली. बहुधा हा देखील एक प्रयोग असावा. असे प्रयोग प्रत्येक राजकीय संघटना करून पाहत असतात. त्यातलाच हा एक भाग. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक (जे मुळचे महाराष्ट्रातले आहेत, आठवत नसतील तर विरारचा छोकरा गोविंदाने ज्यांना लोकसभा निवडणुकीत हरवलं ते) यांनी डॉक्टरांचे आडनाव अम्बेडकर असे न लिहिता, त्याचा उच्चार मराठीत आंबेडकर आहे, म्हणून ते बदलावे असा आग्रह धरला. पण आम्ही तर अतिहुशार. अजयसिंग बिश्त यांनी डॉ. भीमराव ‘रामजी’ आंबेडकर अशा नावाची नोंद सरकार दरबारी करून टाकली की राव. अर्थात याने काही फार फरक पडणार नाही, कारण डॉ.आंबेडकर हा एक विचार आहे जो भारतीय जनमानसात खोलवर रुजलेला आहे. फक्त एका पोकळ मुद्द्यावर राजकीय चपाती शेकण्याचा हा प्रकार आहे, जो सत्ताधारी पक्ष इमानेइतबारे करत आहे. जेवढे डॉ आंबेडकर वाचत जाल तेवढे ते तुमच्या रूढीवादी मानसिकतेला चिमटे काढत राहतील. फक्त एवढेच की अजय बिश्त यांना हे गाणे गायला लागू नये…ओ ‘रामजी बडा दुख दिया…तेरे बेटे ने!

अरे अजून तुम्हाला कळाले नाही की अजय सिंग बिश्त कोण ते? तेच कि ओ… रंग दे मुझे तू गेरुवावाले…योगी आदित्यनाथजी. नाव तर खरेच सांगावे लागेल न आता!

Leave A Reply

Your email address will not be published.