राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर सैनिकांच्या निधीसाठी बायकोचे दागिने विकले !  

डॉ. राजेंद्र प्रसाद.

आपल्या लोकप्रियतेमुळे सबंध देशभरात ‘देशरत्न’ या नावाने परिचित असलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज जयंती. डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे असे एकमेव राष्ट्रपती होते, जे सलग दोन वेळा या पदासाठी निवडले गेले. गांधीजींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात उतरलेला हा ‘वकील’ माणूस पुढे देशाचा पहिला राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर देखील देशासाठी समर्पित राहिला.

राजेंद्र प्रसाद यांचा जन्म बिहारमधील सिवान जिल्ह्यातील जीरादोई या गावचा.

त्याचं प्राथमिक शिक्षण छपरा जिल्ह्यातील एका शाळेत झालं होतं. त्यांचे वडील महादेव सहाय हे संस्कृत आणि फारसी भाषेचे विद्वान समजले जात असत. वडलांचा हाच वारसा राजेंद्र बाबुंकडे आला होता. त्यामुळेच शालेय जीवनात राजेंद्र प्रसाद अतिशय हुशार विद्यार्थी समजले जात असत. एक वेळा तर त्यांची एका परीक्षेतील त्यांची उत्तर पत्रिका बघून पर्यवेक्षकाने म्हंटल होत,

“परीक्षार्थी हा परीक्षकापेक्षा हुशार आहे”

राजेंद्र बाबूंचं लग्न त्यावेळच्या प्रथेप्रमाणेच वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच झालं झालं होतं. त्यांच्या लग्नाविषयीचा देखील एक किस्सा तर असाही सांगितला जातो की, राजेंद्र बाबू ज्यावेळी आपल्या लग्नासाठी निघाले होते, त्यावेळी २ दिवसांच्या प्रवासानंतर ते इतके थकले होते की पालखीतच झोपून गेले होते.

आपल्या लग्नानंतर त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते भारतीय स्वातंत्र्यसंग्रामशी जोडले गेले. इतरांप्रमाणेच त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सहभागावर देखील महात्मा गांधींचा प्रभाव होता. १९३१ सालच्या मिठाच्या सत्याग्रहात आणि १९४२ सालच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी कारावास भोगला होता.

देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत राजेंद्र बाबू काँग्रेसमधले मोठे नेते म्हणून उदयास आले होते.

त्यामुळे भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी जेव्हा संविधान सभेची स्थापना करण्यात आली, त्यावेळी राजेंद्र बाबूंची संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली.

२६ जानेवारी १९५० रोजी देशाचं संविधान लागू करण्यात आलं, पण त्याच्या आदल्याच  दिवशी राजेंद्र बाबूंच्या भगिनी भगवती देवी याचं निधन झालं. दुसऱ्या दिवशी देश प्रजासत्तक राष्ट्र म्हणून उदयास येणार होता आणि राजेंद्र बाबुंवर आपल्या बहिणीच्या मृत्यूची बातमी ऐकण्याची वेळ आली होती.

असा दुखाचा प्रसंग ओढवलेला असताना देखील त्यांनी बहिणीच्या अंत्यसंस्काराऐवजी देशाच्या प्रजासाताक समारोहाच्या समारंभामध्ये सहभागी व्हायला प्राधान्य दिल.

भारताचं संविधान स्वीकारण्यात आल्यानंतर राजेंद्र बाबूंची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रपतीपदाची पहिली टर्म संपल्यानंतर १९५७ साली परत एकदा त्यांची याच पदासाठी निवड करण्यात आली.

राजेंद्र बाबूंनी आपलं संपूर्ण आयुष्य अतिशय साधेपणाने घालवल. स्वतःसाठी एक पैसाही नाही कमावला. त्यांच्या याच वृत्तीमुळे १९६२ साली ज्यावेळी ते निवृत्त झाले, त्यावेळी दिल्लीच्या रामलीला मैदानात त्यांना निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता.

राजेंद्र बाबूंच्या देशाप्रती किती समर्पित होते याचा अजून एक किस्सा त्यांच्या निवृत्तीनंतरचा. १९६२ सालचा. राजेंद्र बाबूंच्या पत्नी राजवंशी देवी यांचं सप्टेंबर १९६२ मध्ये निधन झालं होतं. देश त्यावेळी चीनशी युद्ध लढत होता. अशा वेळी पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरानंतरच राजेंद्र बाबूंनी भारतीय सैन्यासाठी उभारण्यात येत असलेल्या निधीसाठी आपल्या पत्नीचे सगळे दागिने दान केले.

निवृत्तीनंतरचं वर्षभराच जीवन राजेंद्र बाबूंनी पाटण्यामधील गांधीजींच्या सदाकत आश्रमात घालवलं. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याचं निधन झालं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.