लष्करप्रमुख जनरल करिअप्पांंचा मुलगा पाकिस्तानला युद्धकैदी म्हणून सापडतो तेव्हा..

१९६५सालचं युद्ध ऐन भरात होत.

भारतीय वायुदलाच्या तीन वैमानिकांना पाकिस्तान मध्ये घुसून बॉम्बींग करण्याचं मिशन देण्यात आलं होत. तिन्ही विमानांनी पश्चिम दिशेला आभाळात झेप घेतली.

पाक जमिनीला बॉम्बच्या चटक्यांनी भाजून काढण्याचं काम भारतीय वायुद्लाचे हे शूर पायलट करत होते. या हल्ल्यामुळे खवळलेल्या पाकिस्तान्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. विमानविरोधी तोफेने एका भारतीय विमानाला टिपले. ते विमान आगीच्या लपटेमध्ये वेगाने जमिनीवर गेले.

डोळ्यादेखत आपल्या सहकाऱ्याला गमावल्या वरही बाकीचे दोन वैमानिक परत फिरले नाहीत. त्यांनी लढा चालूच ठेवला.

इतक्यात आणखी एका गोळा दुसऱ्या विमानाला चाटून गेला.  त्याच्या सोबत्याला दिसले की विमानाला आग लागली आहे. त्याने त्या पायलटला पराशुट घेऊन उडी मारण्याचा संदेश पाठवला.  मात्र तो आपल्याच धुंदीत होता. त्याला फक्त आपले टार्गेट दिसत होते. शेवटच्या क्षणापर्यंत तो लढत होता.

आता त्याच्या विमानाचा स्फोट होणार हे बघून त्याचा सोबती मेसेजवर किंचाळला,

“कॅरी इजेक्ट”

कॅरीने अखेर उडी मारली. पाकिस्तानी धरतीवर जाऊन तो आदळला. त्याच्या पाठीचे हाड मोडले होते. उठून उभे राहण्याची ताकद सुद्धा त्याच्यात नव्हती. थोड्याच वेळात पाक सैनिक तिथे आले. त्यांनी त्याला उचलून आपल्या कम्पमध्ये नेले. तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याला नाव विचारले. तो म्हणाला,

“फ्लाईट लेफ्टनंट के.सी. करिअप्पा.”

नाव ऐकून’ त्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला धक्का बसला. हा तर भारताचे पूर्व लष्करप्रमुख फिल्डमार्शल करिअप्पा यांचा मुलगा नंदू करिअप्पा आहे. हेडक्वार्टर्सला जनरल करिअप्पा यांचा मुलगा युद्धकैदी म्हणून सापडला आहे ही बातमी पोहचवण्यात आली. काही वेळात भारतात सुद्धा रेडियोवर ही घोषणा करण्यात आली. सर्वत्र खळबळ उडाली.

पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती होते जनरल अयुब खान. हे स्वान्तत्र्यपूर्व काळात भारतीय लष्करात जनरल करिअप्पा यांचे ज्युनिअर होते. नंदू करिअप्पा त्यांच्या समोर लहानाचा मोठा झाला होता. नंदू करिअप्पा यांची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती अयुब खान यांची पत्नी आणि मुलगा लष्करी इस्पितळात आले.

अयुब खान यांना करिअप्पा बद्दल आदर होता. त्यांनी पाकिस्तानी एम्बसीमार्फत संदेश पाठवला की तुमचा मुलगा सुरक्षित आहे आणि त्याला भारतात सुरक्षितपणे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येऊ शकते.

स्वाभिमानी फिल्डमार्शल करिअप्पा यांनी त्यांना खणखणीत उत्तर दिले,

“नंदू मेरा नहीं इस देश का बेटा है. उसके साथ वही बर्ताव किया जाए जो दूसरे युद्धबंदियों के साथ किया जा रहा है. अगर आप उसे छोड़ना ही चाहते हैं तो सभी युद्धबंदियों को छोड़िए.”

फ्लाईट लेफ्टनंट नंदू करिअप्पा यांना त्यांची जखम भरून आल्यावर रावळपिंडीला इतर भारतीय युद्धकैद्यांसोबत तुरुंगामध्ये हलवण्यात आले. युद्धसमाप्तीनंतर दोन्ही देशाच्या युद्धकैद्यांची अदलाबदल करताना करिअप्पा यांच्या मुलाचीही सुटका झाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.