जेलमध्ये जाळण्यात आलं आणि बाहेर आत्महत्येच्या बातम्या पेरल्या : गोष्ट स्वातंत्रसैनिकाची.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो स्वातंत्र्यसैनिकांचं योगदान राहिलेलं आहे. अनेकांनी भारतभूमीवर केलेल्या आपल्या रक्ताच्या अभिषेकाची फलश्रुती म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला मिळालेलं स्वातंत्र्य होय.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याच्या कथा आपण लहानपणापासून ऐकलेल्या असतात, पण त्याचवेळी इतिहासाने ज्यांची दखल घेतली नाही असे अनेक अनाम चेहरे देखील आपल्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होते.

त्यापैकीच एक नांव म्हणजे राजस्थानच्या जैसलमेर प्रांतातील स्वातंत्र्यसैनिक सागरमल गोपा हे होय.

सागरमल गोपा यांचा जन्म १९०० सालचा. ते एका आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा कुटुंबातून येत होते. त्यांचे वडील जैसलमेर साम्राज्यात राजा महारावळ जवाहर सिंह यांच्या सेवेत होते. पण सागरमल यांचा बाणा लहानपणापासून विद्रोही होता.

अवघा देश एकत्रित येऊन ब्रिटीशांशी लढत असताना आपण आणि आपला प्रांत निष्क्रियपणे ब्रिटीशांची चाकरी आनंदाने स्वीकारतोय हे बघून ते अस्वस्थ होत असत. त्यामुळेच आपण स्वतः तर ब्रिटीशांशी लढलं पाहिजेच पण आपल्या प्रांताचही स्वातंत्र्याच्या लढाईत योगदान असलं पाहिजे असं त्यांना वाटत असे.

देशावर तर इंग्रजांचे अत्याचार सुरु होतेच, पण जैसलमेर प्रांत आपल्याच राजाकडून होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारामुळे त्रस्त होता. तेव्हा सुरुवात इथूनच केली पाहिजे हे लक्षात आल्याने सागरमलने राजा महारावळ जवाहर सिंह यांच्या विरोधात दंड थोपटले. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी साहित्याची निवड केली आणि जवाहर सिंह यांच्या अत्याचाराविरोधात उघडपणे लिखाण सुरु केलं.

१९२१ साली ते गांधीजींच्या असहकार आंदोलनात देखील सहभागी झाले होते. जैसलमेर प्रांताने देखील या आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन स्वातंत्र्यचळवळीत आपलं योगदान द्यावं असं आवाहन ते जैसलमेरच्या जनतेला करत होते.

सागरमल यांचं लिखाण इतकं कठोर होतं की लवकरच जैसलमेर सम्राट जवाहर सिंह यांच्या ते रडारवर आले.

त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात येऊ लागला. तोपर्यंत त्यांचे ‘जैसलमेर का गुंडाराज’ आणि ‘आझादी के दिवाने’ हे पुस्तकं प्रकाशित झाली होती. लोकांमध्ये जुलमी सत्तेविरोधात चीड उत्पन्न व्हायला सुरुवात झाली होती. जवाहर सिंह यांच्याकडून होणारा त्रास वाढल्याने सागरमल नागपूरला निघून आले. तिथूनच त्यांनी आपली स्वातंत्र्याची लढाई सुरु ठेवली होती. सागरमलच्या लिखाणामुळे त्रस्त राजा जवाहर सिंह त्यांच्यावर डूख धरून बसलेले होतेच.

१९४१ सालं उजाडलं. याचवर्षी सागरमल यांच्या वडिलांचं निधन झालं. आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सागरमल जैसलमेरला रवाना झाले. इथेच घात झाला. चिडलेल्या जवाहर सिंहानी जैसलमेरमध्ये पोहोचताच सागरमल यांना कैद केलं आणि तुरुंगात डांबलं. ६ वर्षांचा तुरुंगवास.

कैदेत असताना सागरमल यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांनी महारावळ जवाहर सिंह यांची माफी मागावी असं त्यांना सांगण्यात आलं, पण बाणेदार सागरमल यांनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. पोलीस अधिकारी हताश होते.

कौर्याची परिसीमा करून देखील सागरमल आपला स्वाभिमानी बाणा सोडायला तयार नव्हते.

हरेक प्रकारचे प्रयत्न करून देखील सागरमल झुकायला तयार होत नसल्याचे बघून शेवटी त्यांच्या सोबत जे करण्यात आलं ते हृदयद्रावक होतं. जेलमध्ये त्यांच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि बाहेर मात्र सागरमल यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या होत्या. सागरमल गेले पण जाताना जैसलमेरमधील जनतेच्या मनात स्वातंत्र्यासाठी लढण्याच्या मशाली पेटवून गेले.

पुढे स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसनेते मिठालाल व्यास यांनी १९४५ साली जैसलमेरमध्ये प्रजामंडळ सरकारची स्थापना केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ३० मार्च १९४९ रोजी जैसलमेर स्वातंत्र्य भारतात विलीन करण्यात आलं. १९८६ साली टपाल विभागाने सागरमल सोपा यांच्यावर एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केलं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.