गुरुदत्तच्या पहिल्या पिक्चरमागे होता बिअरचा घोट अन सिगरेटच्या कश सोबत मित्राने दिलेला शब्द !

साल होतं  १९४५. स्थळ पुण्यनगरीतील एक मधुशाला (म्हणजेच बार ओ!!)  वेळ ऑफकोर्स संध्याकाळ नंतरची

मंद धुंद प्रकाशात चिअर्सचा खणखणाट होतोय. दुनियादारीची देवान घेवाण होतीय. न पिणारे चकना फस्त करताहेत. एक्सच्या आठवणींचा ग्लास ओसंडून वाहतोय. अशाच एका टेबलवर दोन जिगर बसलेत. दोघेपण कर्तबगार तरुण आहेत. आता कर्तबगार तरुण म्हणजे उद्याच्या खाण्यापिण्याचा पत्ता नसणारच.

दोघापैकी एकजन छोट्या बजेटच्या फिल्मचा हिरो आहे तर दुसरा त्या पिक्चरचा असिस्टंट डायरेक्टर. दोघांच्यात एक गोष्ट कॉमन आहे. दोघ पण फुल रोमांटिक आहेत. आज मात्र  ‘पास्ट टेन्स’ सोडून ‘फ्युचर टेन्स’च्या टेन्शन मध्ये आहेत. 

 असिस्टंट डायरेक्टरला चढली आणि तो बोलला, “भावा, ज्यादिवशी मला पिक्चर डायरेक्ट करायला मिळाला ना,  त्या दिवशी मी तुला माझ्या पिक्चरचा हिरो म्हणून घेणार” आता हिरोला पण चढली होती आणि टेबलावर मित्राची मैत्री डब्बल व्याजाने परतफेड करायची असते. हिरो बोलला, “मी जेव्हा मोठा स्टार होईन तेव्हा माझ्या कंपनीच्या पहिल्या पिक्चरचा डायरेक्टर तू असणार.” (संवाद हिंदीत झाला होता. लगेच भिडूशी भांडायला येऊ नये.)

रात्री बियरच्या साक्षीने झालेल्या अनेक आणाभाका सकाळी उतरल्यावर विसरून जायच्या असतात आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर शुद्धीत असताना गंडवल जातं. मात्र आपल्या हिरोने दिलेला शब्द पाळला. त्या हिरोचं नाव देव आनंद. पुढे सुपरस्टार झाल्यावर देवानंदने ‘नवकेतन फिल्म कंपनी’ सुरु केली आणि आपला जिगर गुरुदत्तला दिग्दर्शक म्हणून पहिला ब्रेक दिला. गुरुदत्तने बनवलेला “बाझी” चित्रपट हा ‘न्वार हॉलीवूड’ चित्रपटांना ट्रिब्युट होता.

 देवानंद, गीता बालीची जादू, एस.डी बर्मनचं संगीत, साहीरचे गीत असा हा टोटल पॅकेज असलेला पिक्चर सुपरहिट ठरला नसता तर आश्चर्य वाटलं असत. पहिल्या सिनेमातच आपली दिग्दर्शनातली जादू दाखवून गुरुदत्तने सिद्ध केलं होत की भारतात सिनेमा बदलणाऱ्या डायरेक्टरचं आगमन झालं आहे. गुरुदत्तने तिथून पुढे देवानंद साठी ‘जाल’ आणि  ‘सीआयडी’ असे आणखी दोन चित्रपट बनवले. 

या मैत्रीची सुरवात झाली होती पुण्याच्या प्रभात स्टुडियोमध्ये, तेही एका धोब्याच्या चुकीमुळे. तो प्रभात स्टुडियोचा पडता काळ होता. व्ही.शांताराम यांनी प्रभात सोडलं होत आणि पी.एल.संतोषी म्हणजे आपल्या राजकुमार संतोषीचे वडील हिंदू मुस्लीम एकतेवर “हम एक है” नावाचा चित्रपट बनवत होते. त्यांनी स्ट्रगलर असलेल्या देवानंदला महिना ३५० रुपयांच्या बोलीवर हिरो म्हणून साइन केलं होत.

गुरुदत्त तेव्हा प्रभातमध्ये विश्राम बेडेकरांचा असिस्टंट होता. त्याच्या मामांनी  त्याला या नोकरीला चिकटवल होत.”हम एक है“च्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी गुरुदत्तवर सोपविण्यात आली होती.स्टुडियोमध्ये काम करणाऱ्यांचे कपडे एक धोबी धुवायचा. एके दिवशी या धोब्याने गुरुदत्त आणि देवानंदच्या शर्टची अदलाबदल केली. आता दोघे पण बॅचलर शिवाय वरून कडके. त्यादिवशी घालायला दुसरा शर्टपण नव्हता. जो मिळाला तो शर्ट घालून त्यादिवशी दोघेपण शुटींगला आले. एकमेकाकडे बघितल्यावर त्यांना धोब्याचा गोंधळ लक्षात आला होता.

तशी दोघांची ओळख पण नव्हती. तरी गुरुदत्तने देवानंदला गंमतीत विचारलं की हा शर्ट कुठून घेतलाजोरजोरात हसत हसत दोघांनी एकमेकांना टाळी देऊन मिठी मारली. त्या दिवसापासून ते जिगर झाले ते गुरुदत्तच्या दुर्दैवी मृत्यूपर्यंत त्यांची मैत्री टिकून होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.