‘हादगा’ म्हणा किंवा ‘भोंडला’ पण त्याची मजा “छोगडा तारा”च्या गरब्यात नाही !
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडुदे
करीन तुझी सेवा…
मग काय दोस्तहो आणि ऑफ कोर्स दोस्तिनहो,
आठवलं नां हादग्याच हे गाणं…?
अभी बहोत गरबा रमे छो…! चला आता जरा हादगा पण खेळुया. हो हो. हादगा.
हादगा म्हणजे तोच हो ज्याला कुणी भोंडला म्हणतं तर कुणी भुलाबाईचा खेळं म्हणतं. तसंही नावात काय असं कोणीतरी म्हटलयच ना !
तर लहानपणी काय विचारुच नका. हादगा जवळ आला म्हंटल की नुसती मज्जाच मज्जा असायची. गणपती विसर्जन झाले की आमचा सुर्याबा. तोच ओ आपला सुरज. तो हस्त नक्षत्रात प्रवेश करायचा. हस्त नक्षत्र म्हणजे पावसाचे परतीचे दिवस. गडगडत..गर्जना करत…विजा कडाडत…जातो बाबा आम्ही म्हणुन पाऊस परतायचा आणि आमची हादग्याची लगबग सुरु व्हायची.
पहीलं जाऊन हादग्याच चित्र आणायचं. ते दोन हत्ती सोंडेत माळ घेऊन एकमेकांसमोर उभे असलेलं . ते भिंतीवर चिकटवायचं. ते झालं की पान , फुलं, फळं गोळा करायची. कुठुन कुठुन पायपीट करुन आणायची ती. त्यासाठी मैत्रीणींची शेतं, बागा, अंगण, परसदारं पालथी घालायची आणि मिळवायचीच सगळी हादग्याची सामग्री.
हादगा काय मग आमचा पुढे सोळा दिवस चालायचा. त्या चित्राला फळाफुलांचे , चिरमुऱ्याचे हार घालायचे. पाटावर एक देखणा हत्ती काढायचा आणि मग तो पाट मधे ठेऊन गल्ली बोळात , शेजारीपाजारी असतील नसतील तेवढ्या मैत्रीणी गोळा करायच्या. पाटाभोवती फेर धरुन एकदाचा तो मोस्ट अवेटेड हादगा सुरु व्हायचा.
पहील्या दिवशी एक गाणं दुसऱ्या दिवशी दोन गाणी असं वाढवत वाढवत सोळा दिवसांपर्यंत सोळा गाणी म्हणायची. गाणी तरी काय एकदम भन्नाट. सोळा दिवसांच्या सोळा गाण्यात राग, लोभ, प्रेम, पराक्रम, माया, वेडेपणा सगळे सगळे भाव, आयुष्याच सार असायचं.
शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तोरणा किल्ला
किल्या मधे सात विहीरी विहीरी मधे सात कमळे
एकेक कमळ तोडीले भवानी मातेला अर्पण केले
भवानी मातेने तलवार दिली , तलवार घेऊनी आला
हिंदुचा राजा तो झाला….
हे गाणं म्हणताना अभिमानानं छाती फुलायची. तो राजा, तो तोरणा, त्या विहीरी, ती भवानी माता, ती तलवार हे सगळ सगळ चित्र जसच्या तसं डोळ्यांसमोर उभ रहायचं जस की शिवाजी राजा साक्षात आपल्या समोर येतोय.
एका गाण्यात कृष्ण हट्ट करायचा यशोदेकडे “आई मला चांदण्या दे, धरुन त्याच्या लाह्या दे करुन”
मग त्यावर यशोदा म्हणायची
“असलं रे कसलं मागण तुझं जगाच्या वेगळं”
ते गाण म्हणताना वाटायच चांदण्याच्या लाह्या कशा बरं करत असतील????
“कारल्याच बी पेरं गं सुने
मग जा आपुल्या माहेरी माहेरी”
कारल्याचं बी पेरलं की हो सासुबाई
आतातरी जाते माहेरी माहेरी.”
सुनबाई आर्जव करायचीच करायची माहेरी जाण्यासाठी पण सासु काही ते कारल्याला कारलं लागुन त्याची भाजी करुन खायला घालुन मगच सुनेला माहेरी पाठवायची तेव्हा राग यायचा त्या खाष्ट सासुचा .
वेड्याच्या बायकोचं एक गाणं होतं. ती सतत श्रीकांता आणि कमलाकांता या दोन मैत्रीणींना नवऱ्याच्या वेडाच गाऱ्हाणं सांगायची. ते गाऱ्हाणं गाण्यातून असं यायचं,
“श्रीकांता कमलाकांता अस्स कस्स झालं
अस्स कस्स वेड माझ्या कपाळी आलं
वेड्याच्या बायकोने केले होते लाडु
ईकडुन आला वेडा त्यांन निरखुन पाहीलं
चेंडु चेंडु म्हणुन त्याने फेकुन दिला”
एवढं हसु यायचं हा वेडा माणुस कित्ती वेडेपणा करायचा म्हणुन. मग ही गाणी म्हणुन झाली की मग खास कार्यक्रम असायचा.ओळखा ओळखा कोणता असेल ? येऽऽऽऽऽऽऽस खिरापत ओळखायची..
खिरापत म्हणजे सगळ्या मैत्रिणी जिच्या घरी हादगा असेल तिथे आपापला डब्बा घेऊन यायच्या आणि त्या डब्यात काय आहे ते सगळ्यांनी ओळखायचं. मगच तो डबा ऊघडायचा. मग काय ती खिरापत काय आहे हे ओळखायला भलीमोठी पदार्थाची यादी पटापटा बोलुन दाखवायची. श्वास न घेता एका दमात. “चिरमुरेलाडुभंडगफुटाणेशेंगदाणेशिरापोहेउपीट !! ” असं
मला तरी माझी खिरापत कुणी ओळखली की रडुच यायचं. आपली खिरापत कुणी पटकन ओळखु नये म्हणु सगळ्याजणी आपापल्या आयांकडुन नविन नविन चमचमीत चटपटीत पदार्थ करुन आणायच्या आणि त्याला नाव पण असच काहीतरी भन्नाट दिलेलं असायचं.
या हादग्याची तयारी करण्यापासुन गाणी आठवुन द्यायला, खिरापत करुन द्यायला आया, आज्ज्या , मावश्या , माम्या, आत्या सगळी सगळी मदत करायच्या. आधी आम्ही साऱ्या मैत्रिणी सगळ्यांच्या खिरापतीचे डबे ओळखुन झाले की मग सगळ्या बसुन ताव मरायचो त्या खिरापतीवर.
भाईबंधूंची वेगळीच लगबग सुरु असायची. हादग्याच्या ठिकाणी त्यांना प्रवेश नसायचा. पण खिरापतीच्या वासान त्यांचासुद्धा जीव वर खाली व्हायचा. सगळ्यात शेवटी त्यांना खिरापत पोहचायची. सोळाव्या दिवशी मग सोळा गाणी म्हणुन प्रसाद दाखवुन मग त्या हादग्याचं विसर्जन व्हायचं.
आजही शाळा कॉलेजमधे एक दिवसाचा हादगा होतो, पण त्यात ती सोळा दिवसांची मजा नाही राहीली आता. आजकालच्या इंग्लिश मिडीयमच्या मुलांना गरबा माहीत आहे “छोगडा तारा” माहीत आहे पण हादगा, भोंडला माहीत नाही.
हादगा म्हणजे काही फक्त फेर धरुन गोल गोल फिरण नव्हतं तर त्यातुन अगदी लहान मुलीपासुन ते आज्जीपर्यंत आम्ही सगळ्या एकत्र येऊन केलेली मजा होती. त्या गाण्यातुन सासर कस्स द्वाड असतं ते कळायचं, आमचा शिवाजी राजा किती पराक्रमी होता ते समजायचं, कृष्णाचे बालहट्ट गाण्यातुन समोर दिसायचे. जवळ जवळ आयुष्याच सारंच सांगत होता तो हादगा.
त्या सोळा दिवसांच्या सोहळ्यातुन हादगा म्हणजे मैत्रिणी, गाणी, रोजवेगवेगळा खाऊ, अनलिमीटेड मज्जा होती. आज मात्र आपण वेळेअभावी ही अनलिमीटेड आनंद देणारी मजा विसरुन चाललोय, याची खंत सलत राहते.
हे ही वाच भिडू
- मर्यादेच्या जोखडात बांधलेल्या मुलींसाठी ‘गुलाबाई’ हा एक मुक्त होण्याचा उत्सव असतो.
- पाकिस्तानमधील हिंगलाज भवानी कोल्हापूरच्या गडहिंग्लजला कशी आली?
- रात्रीच्या अंधारात तुम्हाला कधी हाकामारीचा अनुभव आला आहे का ?
- महाराष्ट्रातील भारतमातेचं एकमेव मंदिर !