फक्त सात महिलांना घेऊन केलेलं आंदोलन मुस्लिम धर्मसुधारणेचं पहिलं पाऊल ठरलं..

प्रत्येक धर्माच्या समाजमान्य अशा काही रूढी-परंपरा असतात. काही श्रद्धा तर काही अंधश्रद्धा. आपल्यापैकी अनेकजण त्या मेंढरासारखे डोळे झाकून त्या रूढी आणि परंपरा फॉलो करतात. अशातच एखादा संत तुकोबा, जोतीबा, बसवेश्वर, आंबेडकर, आगरकर, दाभोलकर जन्माला येतो आणि आपल्या रूढ धार्मिक परंपरेच्या मान्यतेवर सडकून टीका करतो.

आपल्यातल्या बऱ्याच जणांना दुसऱ्याच्या धर्मावर टीका झाल्यावर  आनंद होतो, मात्र स्वतःच्या धर्मातल्या रूढ चौकटीला धक्का बसल्यावर मात्र आपण पझेसिव्ह होतो. ही टीका फक्त आपल्याच जातीतल्या आणि धर्मातल्या वाईट परंपरेवर होत आहे असे वाटत राहते. समाजाला जागं करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत राहतात आणि आपण मात्र डोळे घट्ट मिटून झोपेचे सोंग घेत राहतो. क्वचित आक्रमक होतो. मात्र ज्यांनी समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं व्रत घेतलेलं  असतं ते नंदादीपाप्रमाणे जळतच राहतात.

अशाच प्रकारे मुस्लीम समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं होत हमीद दलवाई यांनी.

कोकणातल्या चिपळूण जवळच्या ‘मिरजोळी’ गावात एका सनातनी मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी विविध समाजसुधारकांची धर्मचिकित्सेवरील पुस्तके वाचली आणि त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला की

आपल्या मुस्लीम समाजात आतापर्यंत धर्मचिकित्सेचा प्रयत्न का झाला नसेल..?

डोक्यात निर्माण झालेल्या या प्रश्नामुळे ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. महात्मा फुले, महात्मा गांधी, राममनोहर लोहिया यांच्या मांडणीने ते प्रभावित होते. सुरवातीच्या काळात त्यांनी इंधन, लाट, इस्लामचे भारतीय चित्र अशी पुस्तके लिहिली. पण फक्त पुस्तके लिहून  समाजापर्यंत आपला आवाज पोचणार नाही, त्यासाठी रस्त्यावरच  उतरावं लागेल, हे त्यांनी ओळखलं.

१८ एप्रिल १९६६.

हमीद दलवाई आणि ७ मुस्लीम महिलानी मुंबईमध्ये मोर्चा नेला. त्यांच्या मागण्या होत्या तरी काय ? त्यांना मुस्लीम महिलांवर बहुपत्नीत्व, तीन तलाक, हलाला अशा मध्ययुगीन आणि अन्यायकारक प्रथा कायद्याने बंद करवायच्या होत्या.

मोर्चाच्या आधी मुस्लीम महिलांना आवाहन केले की या मोर्चात सहभागी व्हा. मात्र नवऱ्याच्या आणि समाजाच्या भीतीने अनेक स्त्रिया इच्छा असूनही सहभागी होऊ शकल्या नाहीत.

आंदोलनाला फक्त ७ महिला हजर होत्या. त्यातही एक त्यांची पत्नी आणि दुसरी त्यांची बहीण होती.

हा मोर्चा बघून अनेकांनी त्यांची मस्करी केली. राष्ट्र सेवा दलाचे मृणाल गोरे, भाई वैद्य हे त्यांच्या बरोबर होते मात्र हिंदूंच्या मोर्चातील सहभागाने मुस्लीम महिलांच्या प्रश्नाला मुस्लीम समाजातील कट्टरपंथीय लोक वेगळे वळण देतील म्हणून ते मागेच राहिले.

मुस्लीम महिलांवरचा अन्याय दूर झालाच पाहिजे, उलेमांचा धिक्कार,समान नागरी कायदा लागू करा असे बॅनर हातात घेऊन फक्त आठ जणांचा हा मोर्चा मंत्रालयावर जाऊन थडकला.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सोपवलं. या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली.

Screenshot 8

रूढार्थाने हे आंदोलन अपयशी झालं, मात्र या आंदोलनामुळे भारतात पहिल्यांदाच मुस्लीम महिलांच्या प्रश्नाला वाचा फुटली. मुस्लीम महिलांना रूढी परंपराच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठीचं पहिलं पाउल म्हणून आजही याच आंदोलनाचा दाखला दिला जातो. या आंदोलनानंतर जवळपास पन्नास वर्षांनी २२ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘तोंडी तिहेरी तलाक’ ही प्रथा मुस्लीम महिलांवर अन्यायकारक असल्याचे सांगत ती रद्द केली. हमिद दलवाई यांच्या लढ्याला अखेर यश मिळालं.

१९७० साली त्यांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या धर्तीवर ‘मुस्लीम सत्यशोधक समाजा’ची स्थापना करून मुस्लीम धर्मचिकित्सेचं काम चालूच ठेवलं. हळूहळू त्यांना सुधारणावादी विचारांचे कार्यकर्ते भेटत गेले अन विविध व्यासपिठावर त्यांनी ही जागृतीची मोहीम चालवली.

उर्दूपेक्षा मातृभाषेत शिक्षणाचा आग्रह त्यांनी मुस्लीम समाजापुढे धरला. धार्मिक शिक्षण देणारे मदरसे, फतवे काढणारे उलेमा यांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले.  पुरोगामी राजकारणी मुस्लीम धर्मसुधारणेला घाबरतात असे त्यांचे म्हणणे होते. आधुनिकीकरणापासून मुस्लीम समाजाला तुटू न देण्याची त्यांची भूमिका होती. मुस्लीम युवकामध्ये मानवतावाद, राष्ट्रीयत्व, वैज्ञानिक दृष्टीकोन, लोकशाहीचे महत्त्व ही आधुनिक मुल्ये रूजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

मुस्लीम धर्मावर टीका करतात म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. कट्टर मुस्लिमांनी त्यांच्यावर ‘हिंदूचा एजंट’ अशी बोचरी टीका केली.

त्यांच्यावर शारीरिक हल्ले सुद्धा केले, मात्र दलवाई यांनी आपलं कार्य थांबवलं नाही. पुढे संघाच्याच सभेत जाऊन त्यांनी हिंदूधर्मातल्या रूढी परंपरावर घणाघाती आघात केले. भारताला पुरोगामी विचारच पुढे नेऊ शकतो हे त्यांनी ठासून सांगितले. आपल्या आंदोलनाचा राजकीय फायदा त्यांनी कोणालाही उठवू दिला नाही.

सदैव पाठीशी लागलेल्या आरोग्याच्या समस्या ,आर्थिक चणचण सहन केली पण समाजप्रबोधनाची मशाल कधी खाली ठेवली नाही.

दुर्दैवाने त्यांचं उद्दिष्ट साध्य करायला त्यांना मोठं आयुष्य लाभलं नाही. अकालीच  किडनीच्या रोगाने त्यांना विळखा घातला. फाशीची शिक्षा झालेला कैदी फिरोज दारूवाला याने त्यांना आपली किडनी दान केली, मात्र तरीही ते फार काळ जगू शकले नाहीत. वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी त्याचं निधन झालं.

त्यांच्या निधनानंतर देखील वादाने त्यांची पाठ सोडली नाही.

आयुष्यभर निधर्मी आणि नास्तिक म्हणून जगलेल्या हमीदभाईनी त्यांच्या मृत्यूपत्रात आपल्या अंतिम संस्कारावेळी कोणत्याही धार्मिक विधीने दफन किंवा दहन करायचा नाही हे निक्षून सांगितल होतं. त्यांच्या देहाचं विद्युतदाहिनीमार्फत दहन करण्यात यावं अशी त्यांची अंतिम इच्छा होती. त्यांच्या नातेवाईकांना मात्र मुस्लीम पद्धतीने त्यांचं दफन करायचं होतं.

अखेर हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा यांनी हमीदभाईच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांचा अंत्यविधी करायचं ठरवलं. दलवाईना त्यांच्या अंतिम दिवसात मदत करणारे तळवलकर, शरद पवार, ए.बी. शाह वगैरे मंडळी  मेहरुन्निसा यांच्या पाठीशी उभे राहिले. नातेवाईकांचा रोष पत्कारून विद्युतदाहिनीमध्ये हमीद भाई अनंतात विलीन झाले.

दलवाईचे एवढे क्रांतिकारक विचार पाहता त्यांना नैसर्गिक मृत्यू आला हाच  एक चमत्कार आहे’ असं मत जेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी एके ठिकाणी व्यक्त केलंय. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी तर त्यांना ‘भारताचा शेवटचा मॉडर्नीस्ट’ असं म्हंटलय.

त्यांचं आणि त्यांच्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाचं कार्य त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा यांनी पुढ चालू ठेवलं. मात्र दुर्दैवाने दुसरा हमीद मुस्लीम समाजात जन्मू शकला नाही, असं त्यांचं निरीक्षण आहे. त्यांच्या मृत्यूने खऱ्या अर्थानं मुस्लीम समाजाचं आणि देशाचंही कधीही न भरून निघणारं नुकसान झालं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.