आणि सोनवड्याच्या लढाईत प्रतिसरकारचे किसन अहिर हुतात्मा झाले.

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ क्रांतिसिंह नाना पाटील यांचं प्रतिसरकार महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत. इंग्रज पोलीस जंगजंग पछाडून ही त्यांना पकडू शकत नव्हते. सातारा-सांगली जिल्ह्यामध्ये प्रतिसरकारचाच हुकुम चालत होता.

प्रतिसरकारची स्वतःची सेना होती. तिला तुफान सेना म्हणत. ही सेना जंगलामध्ये कॅम्प करून राहायची. तिथे बॉम्ब बनवणे, गोळीबाराचा सराव करणे अशा लष्करी प्रशिक्षणाच्या गोष्टी तिथे चालायच्या. इंग्रजांना सुगावा लागू नये म्हणून दर काही दिवसांनी या कम्प ची जागा बदलावी लागत असे.

फेब्रुवारी १९४६, प्रतिसरकारच्या तुफान सेनेचा कॅम्प धाबड्याच्या पठारावर होता. या छावणीत पोहचण्यासाठी अनेक डोंगर दऱ्या पार करून याव लागत असल्यामुळे नैसर्गिकरीत्या संरक्षण लाभले होते. शिवाय कोल्हापूर संस्थानच्या हद्दीत येत असल्यामुळे येथे रेड मारणे इंग्रजांना अवघड होते.

प्रतिसरकारच्या या छावणीमुळे आसपासच्या गावात जरब बसली. जुलमी सावकरांचा, गावगुंडांचा निकाल लागला, आयाबहीणीचा संसार सुरळीत होऊ लागला. गुन्हेगारांना शिक्षा होऊ लागली.

प्रत्येक गावातून एका तरुणाला आझाद हिंद सेनेत भाग घेण्यासाठी प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येऊ लागले. हे सैनिकी प्रशिक्षण नानकसिंग व मन्सासिंग हे आझाद हिंद सेनेतले माजी सैनिक देत होते.

बरेच दिवस हा कॅम्प तिथे असल्यामुळे आता जागा बदलणे आवश्यक आहे हे या सेनेचे सेनापती नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या लक्षात आले होते.

एक दिवस त्यांना एक सीआयडीचा माणूस टेहळणी करताना सापडला. पोलीस धाड येणार हे ओळखून दुसऱ्याच दिवशी नवीन जागेवर छावणी हलवणे अत्यावश्यक झाले. नवीन जागा शोधायची जबाबदारी किसन अहिर यांच्यावर सोपवली.

पहिलवान किसन अहिर हे नागनाथ अण्णा यांचे उजवा हात म्हणून ओळखले जायचे. वाळव्यामध्ये दोघांच घर हे अगदी एका गल्लीत. तेव्हा पासूनची दोघांची दोस्ती होती. सहा फुट उंची दांडगी शरीरयष्टी असलेला हा पहिलवान आपल्या उभ्या आयुष्यात एकही कुस्ती हरला नव्हता.अंगात दहा हत्तीचं बळ असलेला हा माणूस कधीही कोणालाही एक शब्द उलट बोलत नसे.

नागनाथ अण्णाचा शब्द हा त्यांच्यासाठी शेवट असे. कधी आण्णानी त्यांना चळवळीत लागणाऱ्या खर्चासाठी काही पैसे दिले तर ते म्हणत,

अण्णा, ही पिडा माझ्याजवळ नकू. दुध,धडूत कपडा, घोंगडी चपलासह सगळ तुम्ही आम्हाला देताय मग पैसे कशाला लागतायत?”

२३ फेब्रुवारी १९४६, किसन पैलवान दोन सहकार्यांना घेऊन मोहिमेवर निघाले. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजे पर्यंत परत येऊन नवीन ठिकाणी छावणी नेली जाणार होती. किसन पैलवान शोधत शोधत मणदूर गावाजवळच्या जंगलात पोहचले. तिथली जागा त्यांना आवडली. दुसऱ्या दिवशी सकाळी कधी एकदा धाब्ड्याच्या छावणीत जाऊन हि बातमी देतोय असे त्यांना झाले. गडबडीत ते परतीच्या प्रवासाला निघाले.

परत येताना त्यांची गाठ प्रतिसरकारच्या कुंडलगटाचे मोठे क्रांतिकारक पांडू मास्तर यांच्याशी पडली. पांडू मास्तर नुकतच येरवड्याचा जेल फोडून पळून आले होते. पोलीसाचा ससेमिरा त्यांच्या मागेच होता.

पांडू मास्तर आणि किसन अहिर नागनाथ अण्णाच्या छावणीला निघाले. शिराळपेट्याच्या जंगलात जाणार तेवढ्यात एक हत्यारबंद पोलीस सायकलवरून त्यांच्या आडवा आला. मात्र किसन अहिरमागे हटले नाहीत. त्यांनी त्याला चांगला चोप दिला. त्याची बंदुक काढून घेतली, सायकल मोडली आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थतेत सोडून दिल.

हा पोलीस शिराळा स्टेशन मध्ये पोहचला. त्याने घडलेला सगळा वृत्तांत आणि या क्रांतिकारकांचा ठिकाणा सांगितला. पांडू मास्तरचा ठिकाणा कळाला या गोष्टीच्या आनंदात शिराळा पोलीस अधिकाऱ्याने सर्व वरिष्ठांना कळवले. इस्लामपूर सातारा येथून जादाची कुमक बोलवून घेण्यात आली. शिराळापेट्याचे जंगल पिंजून काढण्यात आले. त्यांना कळाले पांडू मास्तर, किसन अहिर आणि आणखी दोन क्रांतिकारक असे चौघे मणदूर मध्ये लपले आहेत.

पांडू मास्तर यांच्या आग्रहाने हे तिघे मणदूरच्या एका ओळखीच्या माणसाच्या घरी उतरले होते.रात्री गावाला पोलीसानी वेढा टाकला. एक आणि एक घर तपासलं जात होत. इकडे नागनाथ अण्णा यांना किसन अहिर ठरलेल्या वेळेत आले नाहीत म्हणून चिंता वाटू लागली. तेवढ्यात त्यांना बहिर्जी नाईक गुप्तहेर संघटने कडून कळाले कि किसन पैलवानांना पोलीस शोधत आहेत. त्यांना सावध करण्यासाठी तीन साथीदारांना बंदुका देऊन पाठवण्यात आले.

झोपलेल्या किसन अहिराना कसला तरी आवाज आल्यामुळे जाग आली. क्रांतीच्या या लढ्यात जंगलात राहून त्यांना कायम सावध झोप घेण्याची सवय लागली होती. बारीकसा आवाज झाला तरी त्यांना कळायचे कि कसली हालचाल चालू आहे. पोलीस पुढच्या दारात आले होते. पहिलवानानी पांडू मास्तरना बखोटीला धरून उठवले, त्यांना खांद्यावर उचलून मागच्या दाराने ते पसार झाले. पोलिसांना कळालेच नाही.

हि सगळी क्रांतिकारक मंडळी निबाड जंगलात एका सुरक्षित जागी पोहचली. किसन अहिरनी पांडू मास्तरांना खाली उतरवलं. पांडू मास्तर या पहिलवानाच्या ताकदीच्या कौतुकाने म्हणाले,

“शिवरायांच्या जवळ होता जीवा म्हणून वाचला शिवा तसे असे म्हणायचे. तसेच आता होता किसन म्हणून वाचला पांडू असे म्हणावे लागेल”

जीवावर बेतलेल संकट निवारले म्हणून रिलॅक्स झालेले हे चौघे क्रांतिकारक पांडू मास्तरांच्या या विनोदावर दिलखुलास हसले.

इकडे त्यांच्या शोधात निघालेले तीन बाकीचे सहकारी मात्र पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्याजवळ असलेल्या ह्त्यारामुळे हे प्रतिसरकारचे क्रांतिकारक आहेत हे लगेच कळाल.

तोवर धाब्ड्याच्या छावणीत कुणी तरी बातमी आणली की किसन अहिर आणि पांडू मास्तर सापडले. पूर्ण छावणीवर शोककळा पसरली. नागनाथ अण्णा ते. चिडलेल्या क्रांतिकारकांनी किसन पहिलवानाना सोडवण्यासाठी हल्लाबोल केला. यात स्वतः नागनाथअण्णा,महिला क्रांतिकारक राजुताई बिरनाळे, वाय.सी पाटील, नानकसिंग हे सगळे क्रांतिवीर होते.

२४ फेब्रुवारीच्या रात्री सोनवडे आणि मगदूर गावाजवळच्या ओढ्यामध्ये हे सगळे क्रांतिकारक दोन टीममध्ये दबा धरून पोलिसांची वाट पाहू लागले.

तेवढ्यात किसन अहिर आणि पांडू मास्तरांना कळाला आपल्याला पकडलय या गैरसमजातून सगळी तुफान सेना पोलिसांवर हल्ला करण्यासाठी आली आहे. ते धावत धावत ओढ्याजवळ पोहचले. नागनाथ अन्ना आणि इतर साथीदारांना किसन पहिलवान सुखरूप असलेल पाहून हायस वाटलं. पण तरीहि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या इतर सहकार्यांना घेऊनच तिथून जायचं असा निश्चय त्यांनी केला.

ओढ्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या टेकड्यांवर हे क्रांतिकारक लपून पोलिसांची वाट पाहू लागले.  पहाटे मणदूर मधून पोलीस सोनवडयाजवळ आले. तेव्हा तिथे जोरदार गोळीबार सुरु झाला. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलीस घाबरले. त्यांनी त्या कैद केलेल्या क्रांतीकारकांची सुटका केली आणि प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरु केला. दोन्ही साईडवरून तुफान फायरिंग होत होते. प्रतिसरकारचे हे मावळे जोरजोरात घोषणा देत होते,

“शिवाजी महाराज की जय.”

नैसर्गिक परिस्थिती पोलिसांच्या फायद्याची होती. क्रांतिकारक वरून मारत असलेल्या गोळ्यांचा नेम पोलिसांना लागत नव्हता. पण पोलिसांनी खालून मारलेल्या गोळ्याच्या टप्प्यात मात्र ते येत होते. अखेर नानकसिंग आणि किसन अहिरानी एक निर्णय घेतला . बाकीच्या साथीदारांना वाचवावे यासाठी हे दोघेही डायरेक्ट पोलीसांच्या फळीत उतरले. त्यांनी एका करवंदीच्या झाडामागे उभे राहून गोळीबार सुरु केला.

तुफान सेनेच्या या तुफान हल्ल्यापुढे अखेर पोलिसांना माघार घ्यावी लागली. पोलीस पळून गेले. क्रांतिकारकांनी विजयाच्या घोषणा दिल्या. काही जन आनंदात नाचू लागले, एवढ्यात नागनाथ अण्णांना दिसले आपला वाघ शहीद होऊन पडला आहे. किसन अहिर पहिलवान आणि नानकसिंग या दोघांनी बाकीच्या क्रांतिकारकांचे प्राण वाचावेत यासाठी स्वतःची आहुती दिली होती.

हुतात्मा किसन अहिरना छातीशी कवटाळून नागनाथ अण्णा रडू लागले. बाकीच्या क्रांतिकारकांनी त्यांना सावरले. पोलीस नवीन कुमक घेऊन येतील आणि शहिदांच्या शवाची विटंबना होईल म्हणून लवकर तिथून हलणे गरजेचे होते.

दोन्ही हुतात्म्यांचे शव खांद्यावर घेऊन प्रतिसरकारचे  सैनिक तिथून निघाले. नदीच्या किनाऱ्यावर त्यांना अग्नी देण्यात आली. २१ गोळ्यांची फायरिंग करून लष्करी इतमामात सलामी  देण्यात आली .

पुढे दोनच वर्षात प्रतिसरकार व देशभरातल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या पराक्रमाचं फलित म्हणून  देश स्वतंत्र झाला .  पण  किसन अहिर यांच्या हौतात्म्याला नागनाथ अण्णा विसरले नाहीत. तिथून पुढे आजतागायत दर वर्षी २५ फेब्रुवारीला  किसन अहिर यांचा स्मृतीदिन साजरा केला जातो. वाळव्या मध्ये नागनाथ अण्णा यांनी उभारलेल्या शाळा ते साखर कारखाना अशा प्रत्येक संस्थेचे नाव त्यांच्या लाडक्या हुतात्मा किसन अहिर यांच्यावरून देण्यात आले आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.