चोवीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिनबरोबर अख्खा देश रडला होता…

जानेवारी १९९९. जवळपास १२ वर्षांनंतर पाकिस्तान भारत दौऱ्यावर आलेला. अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानपुढे मैत्रीचा हात केला होता त्याचाच भाग म्हणून पाक क्रिकेट टीम भारतामध्ये आलेली. रणसंग्राम तर भरणार होता पण पब्लिकमध्ये मात्र या सिरीज बद्दल उत्सुकता आणि खळबळ दोन्ही होती.

शिवसेनेचा पूर्वी पासून सीमेवर जवान मरत असताना पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यास विरोध होता. राज्यात तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यामुळे मुंबईत सामना होण्याचा तर प्रश्नच नव्हता. चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता येथे कसोटी सामने होणार होते.

१७ जानेवारी १९९९ला दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमचं पीच शिवसैनिकांनी उखडलं. सगळीकडे गोंधळ उडाला. फक्त एवढंच नव्हे बीसीसीआयचं मुंबई ऑफिससुद्धा एका शिवसेना आमदाराच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. तिथं हजर असणारे बीसीसीआयचे सेक्रेटरी शरद दिवाडकर यांना कानाखाली वाजवली गेली आणि ऑफिसमधल्या या गोंधळात आणखी एक लाजिरवाणी घटना घडली.

भारताने जिंकलेला पहिला १९८३ सालचा विश्वकप या गुंडानी तोडला.

विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. ही घटना घडली तेव्हा देशाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी मुंबईमध्ये होते. पण कोणत्याही गुन्हेगाराला पोलीसांनी अटक केली नाही. दौरा रद्द होईल की काय अशी वेळ आली होती.

तेव्हा खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी या घटनेची निर्भत्सना केली आणि दौरा सुरक्षितपणे पार पडेल याचे आश्वासन दिले. पण तरी शिवसेना प्रमुखांनी इंटरव्हू मध्ये सांगितलं होतं की,

“मी माणसं चेन्नईला पाठवलेत मॅचची व्यवस्था करायला.”

मैदानाबाहेर एवढा मोठा गोंधळ सुरु होता याचे पडसाद खेळामध्ये पडणे सहाजिक होते. अनेक पाकिस्तानी खेळाडू पहिल्यांदाच भारतात आले होते. चेन्नईमध्ये होणाऱ्या पहिल्याकसोटीमध्ये काहीही होऊ शकते असे तंग वातावरण होते.

वातावरणातील भार हलका करण्यासाठी पाकिस्तानी कप्तान वसीम अक्रमने पुढाकार घेतला. सराव सुरु असताना तो भारतीय खेळाडूंच्याकडे आला आणि सचिनला नुकत्याच जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दल त्याला एक छोटं गिफ्ट दिलं. थोड्याशा घरगुती गप्पा मारल्या आणि परत निघून गेला. हा प्रसंग कॅमेराने टिपला होता.

२८ जानेवारी १९९९ ला हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने मॅच सुरु झाली. खेळाच्या सुरूवातीला अमन आणि शांती जरी झाली असली तरी सामना सुरु झाल्यावर महायुद्ध पेटले.

दुसऱ्या डावात अठरा वर्षाच्या शहीद आफ्रिदीच्या अफलातून शतकाच्या जोरावर पाक टीमने भारताला जिंकण्यासाठी २७० धावांचं अवघड लक्ष्य दिल. भारतीय फलंदाजांची सकलेन, वकार, आणि वसीम अक्रम यानी प्रॉपर वाजवली होती. त्यात पहिल्या इनिंग ला सचिन फ़ालतू शॉट खेळुन डकवर आउट झालेला.

दुसऱ्या इनिंगच्या आदल्या दिवशी वसीम प्रेस कॉन्फरन्सला बोलला होता कि आम्ही ५० रन मधे ७ विकेट आरामात घेवु शकतो. क्लाइमेट ह्युमिड होत. सचिन सोडून बाकीचे सगळे बॅटसमन पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.

सचिन या इनिंग मध्ये मनाशी काही तरी ठरवून आला होता. लंच ते टी ब्रेकपर्यंत मोंगियाला सोबत घेऊन त्याने रिस्क फ्री खेळ केला नंतर मोठे शॉट खेळण्यास सुरवात केली.

नेमकं याच दरम्यान त्याच्या पाठदुखीने जोर पकडला. स्पिनर विरुद्ध खेळताना त्याला स्वीप शॉट मारायलासुद्धा जमेना पण तरी सकलेन मुश्ताकला ठोकणे त्याने थांबवले नाही. ८३ धावावर असतना मात्र तो जमिनीवर कोसळला. फिजीओने येऊन त्याने त्याला तात्पुरते औषध दिले.

सचिन जिद्दीने परत खेळायला उभा राहिला.  मरणाच्या वर कळा होत असताना त्यानं शतक पूर्ण केलं.

बघता बघता जिंकण्यासाठी फक्त १७ धावा शिल्लक होत्या. पण मारायच्या नादात सचिन आउट झाला. अजुन ३ विकेट होत्या पण सचिन गेला म्हणल्यावर पाकिस्तान फूल फॉर्मात आला त्यात नवीन बॉल होता. वसीम आणि सकलेन ला जास्त वेळ लागला नाही विषय संपवायला.

भारत २५४ वर असताना सचिन आउट झाला आणि २५८ धावावर भारताची शेपूट गुंडाळून पाकिस्तानने मॅच खिशात टाकली. सचिन बरोबर अख्खा देश रडला. पूर्ण भारतात त्यादिवशी कित्येक टीव्ही फुटले असतील माहित नाही. आज चोवीस वर्ष झाली या मॅचला पण आपल्यापैकी कित्येक जणांना त्या काळ्या आठवणी आठवत असतील.

इकडे राजकीय पटलावर वेगळ्याच घडामोडी घडल्या. मनोहर जोशी त्याच दिवशी वेगळ्या कारणामुळे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले. वाजपेयींनी जिद्दीने पिच उखडलेल्या दिल्लीच्या स्टेडियमवर दुसरी कसोटी खेळवली. या सामन्यात कुंबळेने आपला जगप्रसिद्ध १० विकेट पटकावण्याचा विक्रम केला.

आजवर झालेल्या भारत पाकिस्तान कसोटी सिरीजमधली ही सर्वात अटीतटीची सिरीज ठरली.

यानंतर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामना जो आशियाई कसोटी सिरीजचा पहिला सामना म्हणून खेळवण्यात आला होता. त्यात शोएब अख्तर पहिल्यांदा भारताविरुद्ध खेळला आणि त्याने आयुष्यभर आपल्या हृदयाशी जपून ठेवलेली स्पेल ज्यात द्रविड आणि सचिनला सलग बोल्ड केले.

याच मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीमने कच खाल्ली आणि त्यात सचिनला अंपायरने चुकीचा निर्णय देऊन रनआउट केले. यामुळे पेटलेल्या कोलकत्ताकरांनी ईडन गार्डन मध्ये दंगल घडवली आणि अशा रीतीने महायुध्दाच्या धरतीवर लढल्या गेलेल्या या कुप्रसिद्ध दौऱ्याचा अंत भारताच्या हरण्याने झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.