‘मार्क्स बाबा’ काय म्हणाला होता..?

 

संपूर्ण मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. वर्गसंघर्षाच्या  पायावरच मानवी इतिहास उभा आहे, असं सांगून जगाला समाजवादी विचारधारा देणाऱ्या एकोणिसाव्या शतकातील महान जर्मन विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांची आज २०० वी जयंती. जगभरातील शोषित-वंचित-कष्टकरी लोकांच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी कार्ल मार्क्स नेहमीच मार्गदर्शक राहिलेले आहेत. जगाला ‘समाजवाद’ ही राजकीय विचारधारा देणाऱ्या मार्क्सला जगभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी लाभले. रशिया आणि चीनसारख्या देशात समाजवादावर आधारित सरकारं स्थापली गेली. भारतात देखील जवाहरलाल नेहरूंसारख्या नेत्यांना कार्ल मार्क्सने भुरळ घातली. भगतसिंग सारखे क्रांतिकारक सुद्धा  मार्क्सच्या विचारांनी भारावून गेले होते. आज मार्क्सच्या २०० व्या जयंतीदिनी समजून घेऊयात कार्ल मार्क्स नेमकं काय सांगून गेले होते आणि जगाला बदलून टाकू पाहणाऱ्या समाजात राहणारा माणूस त्यांना कसा अभिप्रेत होता…

  • उत्पादन साधनांवरची खासगी मालकी हीच कामगारांच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांचे मूळ आहे. भांडवलशहांच्या हातात उत्पादनांची मालकी असल्याने कामगारांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही त्यामुळे कामगारांचे आर्थिक शोषण होते. कामगारांच्या घामावर आणि त्यांच्या आर्थिक पिळवणूकीवरच भांडवलशाहीचे इमले उभारले जातात. त्यामुळे नैसर्गिक संसाधनावरील खासगी मालकी संपुष्टात आणणे, हेच समाजवादाचं उद्दिष्ट्य असलं पाहिजे.
  • कामगारांकडे आपल्या हातातील गुलामीच्या बेड्यांव्यतिरिक्त गमावण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे जगभरातील कामगारांनी या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन मार्क्सनं केलं. भांडवलाची तुलना मार्क्सने युरोपियन लोककथेतील जिवंत माणसाचं रक्त शोषणाऱ्या भूताशी केली. कामगारांचं रक्त शोषूनच अधिकाधिक भांडवलाची निर्मिती केली जाते, अशी मांडणी मार्क्सने केली.
  • कामगारांच्या आर्थिक शोषणाविषयी आणि पिळवणूकीविषयी बोलतानाच मार्क्स महिलांच्या सामाजिक आर्थिक सक्षमिकरणाची भूमिका देखील मांडतात. मार्क्स म्हणतो की, “इतिहासाची थोडीशी देखील समज  असणाऱ्या  कुठल्याही  व्यक्तीला  या गोष्टीची पूर्ण कल्पना असते की कुठलेही सामाजिक परिवर्तन हे महिलांच्या सक्षमीकरणा शिवाय शक्य नाही. कुठल्याही समाजातील महिलांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीवरूनच तो समाज किती पुढारलेला आहे, याचं मूल्यमापन केलं जाऊ शकतं.
  • KARL MARKS 1
  • सर्व लहान मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. आर्थिक विवंचनेमुळे त्यांना शिक्षण सोडून इतर कामे करायला लागू नयेत. शिक्षणाचा अधिकार त्यांच्यापासून हिरावला जाऊ नये, यासंबंधीचा विचार मार्क्सने मांडलाय. १९४८ साली जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात कारखान्यांमध्ये बालकामगारांना काम करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मार्क्स करतो.
  • एका माणसाच्या आयुष्यातील एका तासाची किंमत आणि दुसऱ्या माणसाच्या आयुष्यातील एका तासाची किंमत सारखीच असते, असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण या एका तासादरम्यान दोन्ही माणसांची किंमत मात्र सारखीच असायला हवी, असा आग्रह मार्क्स धरतो.
  • प्रत्येक माणसाला आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, असं मार्क्स मानतो. आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठी माणसाला व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. प्रत्येकाला आपल्या आवडीचं काम करता यायला हवं. आवडीच्या कामाचा संदर्भ मार्क्स व्यक्तीच्या आनंदाशी जोडतो. माणूस आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ काम करण्यात खर्च करतो, त्यामुळे तो जे काम करतो ते त्याच्या आवडीचं असेल तरंच त्यातून त्याला आनंद मिळू शकेल.
  • धर्माला मार्क्सने अफूची गोळी मानलं. मानवी आकलनाच्या पलीकडील गोष्टींची दोन हात करण्यासाठी हतबल झालेला माणूस धर्माच्या आहारी जातो. धर्म हा गोरगरिबांचा विलाप, क्रूर आणि निर्दयी लोकांचं हृदय असतो, असं मार्क्स धर्माच्या संदर्भात म्हणतो. म्हणूनच लोकांचं आयुष्य आनंदी बनविण्यासाठी त्यांच्या जीवनातून धर्माला हद्दपार करण्याची आवश्यकता मार्क्सला वाटते.
  • ऐतिहासिक घटनांच्या स्मरणरंजनात रमण्याच्या मानवी मानसिकतेविषयी भाष्य करताना मार्क्स म्हणतो, “इतिहासाकडे स्वतःचं असं काहीच नसतं, ना इतिहासाकडे अपार सामर्थ्य असतं ना अपार धनदौलत. इतिहास काहीच करत नाही. इतिहास फक्त स्वतःची पुनरावृत्ती करतो, एक शोकांतिका म्हणून किंवा एक मजाक म्हणून. जे काही करत असतो, तो फक्त माणूसच करत असतो”

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.