ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी हा भारतीय खेळाडू इंग्लंडला आपल्या संघात ओपनर म्हणून हवा होता !

घराण्यांचा विषय निघाला की आपल्याला एकतर संगीत क्षेत्रातील किंवा मग राजकारणातील घराणे आठवतात पण १९३० ते १९६० या दशकातील भारतीय क्रिकेट गाजवलं ते भारतीय क्रिकेटमधील ‘विजय घराण्या’ने.

विजय हजारे, विजय मर्चंट आणि विजय मांजरेकर हे त्या ‘विजय घराण्या’चे ३ शिलेदार. त्यातल्याच विजय मर्चंट यांचा आज जन्मदिवस. ज्यांची तुलना त्याकाळी सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जायची असा भारतीय क्रिकेटर.

मुंबईतील एका व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या विजय मर्चंट यांचं खरं नाव होतं विजयसिंग माधवजी ठाकरसी. पण हे नाव ‘विजय मर्चंट’ होण्याचा किस्सा देखील रंजक आहे. झालं असं की शाळेत असताना एकदा इंग्रजीच्या शिक्षकांनी त्यांना नाव आणि वडिलांचा व्यवसाय विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपलं नाव विजय आणि वडिलांचा व्यवसाय ‘मर्चंट’ अर्थात व्यापारी असल्याचं शिक्षकांना सांगितलं. परंतु गोंधळलेल्या शिक्षकांनी त्यांचं नाव ‘विजय मर्चंट’ असं लिहिलं आणि विजय  ठाकरसी  ‘विजय मर्चंट’ झाले.

विजय मर्चंट

विजय मर्चंट यांनी एकेकाळी भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं होतं. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची आकडेवारी तपासली तर आपल्याला फार काही हाती लागणार नाही, पण फक्त या आकडेवारीहून त्यांचं मूल्यमापन करता येत नाही. कारण विजय मर्चंट यांना फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळायलाच मिळाले नाहीत. याच मुख्य कारण म्हणजे दुसरं महायुद्ध. विजय मर्चंट यांचा खेळ बहरला तो प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या काळात. त्यामुळे ते आपल्या कारकिर्दीत फक्त १० आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकले.

१९३६ साली मर्चंट यांना ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इअर ’ पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. याचवर्षीच्या इंग्लंड टूरवरील आपल्या  कामगिरीने तर त्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना देखील चकित करून टाकलं होतं. त्यावेळी इंग्लंडचा सी.बी. फ्राय म्हणाला होता,

“आम्हाला याला पांढऱ्या रंगामध्ये रंगवून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघासाठी ओपनर म्हणून घेऊन जाऊ द्या”

१९४७-४८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी  आपल्या खराब तब्येतीमुळे ते संघात नव्हते. त्यावेळी या निर्णयामुळे नाराज झालेल्या सर डॉन ब्रॅडमन यांनी लिहिलं होतं,

“हे सर्वात वाईट आहे की आम्हाला विजय मर्चंट यांची झलक सुद्धा बघायला मिळणार नाही. ज्याला आम्ही नक्कीच सर्वात महान भारतीय क्रिकेटर म्हणू शकतो”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वयात शतक फटकावणारे भारतीय

१९५१ साली वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी कोटलाच्या ग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. या सामन्यातील पहिल्याच इनिंगमध्ये त्यांनी १५४ धावा फटकावल्या. त्यावेळी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वयात शतक फटकावणारे भारतीय क्रिकेटर ठरले होते, जो विक्रम अजूनही त्यांच्याच नावे आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट फारसं खेळू शकले नसले तरी त्यांनी मोठ्या प्रमाणत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं आणि आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळलेल्या १५० मॅचमध्ये  ४५ शतक ५२ अर्धशतकांसह  त्यांचं अॅव्हरेज राहिलंय ७१.६४ इतकं. विजय मर्चंट यांचं हे अॅव्हरेज आज देखील कुठल्याही भारतीय खेळाडूचं या प्रकारातील सर्वोत्त्तम आहे.

फक्त भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा जरी विचार केला तर ९५.१४ अशा अविश्वसनीय अॅव्हरेजसह फक्त सर डॉन ब्रॅडमन हे एकमेव बॅटसमन त्यांच्या पुढे आहेत. रणजी स्पर्धेत खेळलेल्या ४७ इनिंग्जमधील ३६३९ रन्स काढताना त्यांचं अॅव्हरेज राहिलंय ९८.७५ इतकं.

आपल्या फर्स्ट क्लास करीअरमध्ये त्यांनी ११ द्विशतक झळकावले होते. हा देखील एक विक्रमच आहे. त्यातली २ द्विशतकं तर सलग २ सामन्यात केली होती. अशा प्रकारची कामगिरी नोंदविणारे ते एकमेव भारतीय क्रिकेटर आहेत. शिवाय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात शतक आणि हॅट्रीक करण्याची कामगिरी करणारे देखील ते एकमेव भारतीय आहेत.

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील निवृत्तीनंतर मर्चंट यांनी भारतीय क्रिकेटच्या प्रशासनात देखील रस घेतला. त्यांच्याच अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय क्रिकेटची धुरा अजित वाडेकर यांच्या हातात सोपविण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे यात मर्चंट यांची भूमिका अशासाठी महत्वाची होती की मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून अजित वाडेकर यांच्याकडे संघाचं नेतृत्व सोपविताना विजय मर्चंट यांनीच आपल्या ‘कास्टिंग व्होट’चा अधिकार वापरला होता. पुढे वाडेकरांनी कॅप्टन म्हणून संघाला कसं घडवलं हे इथे वेगळं सांगायला नकोच.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.