ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांची आज पुण्यतिथी.

ते खऱ्या अर्थाने १९६५ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचे नायक होते. १९६५ सालची लढाई भारताने जिंकली आणि ते युद्धाचे हिरो ठरले, पण त्याचवेळी जर या लढाईत भारताचा पराभव झाला असता तर कदाचित त्यांच्यावर ‘कोर्ट मार्शल’ची कारवाई देखील केली जाऊ शकली असती, असा एक निर्णय त्यांनी घेतला होता.

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांचा तो निर्णय होता तत्कालीन सेनाध्यक्ष जे.एन.चौधरी यांचा आदेश धुडकावून लावत लाहोरवर हल्ला करून पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवण्याचा.

१९६५ साली ज्यावेळी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला त्यावेळी भारतीय सैन्याच्या पश्चिम सीमेवरील तुकडीचं नेतृत्व हरबक्ष सिंग करत होते. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर त्यांनी लाहोरवर हल्ला करण्याची रणनीती बनवली होती. याउलट तत्कालीन सेनाध्यक्ष जे.एन.चौधरी मात्र भारताने हल्ला न करता बचावाचा पवित्रा घेऊन सीमेचं रक्षण करावं, या मताचे होते.

आपल्या या रणनीतीच्या समर्थनात हरबक्ष सिंग यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या ‘काश्मीरवरचा हल्ला हा भारतावरचा हल्ला’ या भूमिकेची आठवण करून दिली होती. परंतु दिल्लीतून मात्र ठाम भूमिका घेतली जात नव्हती.

in the line of duty

हरबक्ष सिंग यांनी ‘इन द लाईन ऑफ ड्युटी’ या आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की, ९ डिसेंबर १९६५ रोजी सेनाध्यक्ष  जे.एन.चौधरी यांनी फोन करून हरबक्ष सिंग यांना लाहोरवर हल्ला करण्याऐवजी पाकिस्तानच्या हल्य्यापासून बचावाची रणनीती तयार करण्याचा आदेश दिला होता.

या फोन कॉलवर सेनाध्यक्ष जे.एन.चौधरी आणि हरबक्ष सिंग यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेदाची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीत हरबक्ष सिंग यांनी चौधरी यांना फिल्डवर येऊन आपल्याला लिखित स्वरुपात आदेश द्यावेत, तरच आपण त्यांचा आदेश मानू अशी भूमिका घेतली होती.

मेजर जनरल पलीत यांनी देखील यांदर्भात लिहिलंय की,

“हरबक्ष सिंग सेनाध्यक्ष चौधरी यांना म्हणाले होते की एवढ्या महत्वाच्या गोष्टीसंदर्भातला केवळ तोंडी आदेश आपण मानू शकत नाही. त्यासाठी लिखित आदेशच द्यावा लागेल. पण लिखित आदेश मिळालाच नाही”

हरबक्ष सिंग यांनी सेनाध्याक्षांचा आदेश न मानता आपल्या रणनीती प्रमाणेच पुढील कारवाई केली आणि आपल्यापेक्षा अद्ययावत शस्त्रसाठ्यांनी युक्त असलेल्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने सळो की पळो करून सोडलं. भारताने पाकिस्तानच्या मोठ्या भूभागावर कब्जा मिळवला. पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली आणि या युद्धात पाकिस्तानचा मानहानीकाक पराभव झाला.

युद्धानंतरही पाकिस्तानी सैन्याला योग्य तो सन्मान दिला

हरबक्ष सिंग यांच्या कन्या हरमाला गुप्ता यांनी आपल्या पित्याची एक आठवण सांगितलिये. हरमाला गुप्ता यांच्या सांगण्यानुसार युद्धानंतर देखील हरबक्ष सिंग यांनी पाकिस्तानी सैन्याला योग्य तो सन्मान दिला.

युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानातील मशिदीची नासधूस झाली होती. हरबक्ष सिंग यांनी त्या मशिदीची डागडुजी करून पाकिस्तानी सैन्याला परत केली. शिवाय युद्धात मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या  मृतदेहांचे सन्मानाने दफन केलं.

with bakhtiyar rana

युद्धविरामानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यानच्या संवादासाठी हरबक्ष सिंग यांना संयुक्त राष्ट्रात पाठविण्यात आलं होतं. पाकिस्तानकडून चर्चेसाठी जनरल बख्तियार राणा आले होते. जनरल राणा आणि हरबक्ष सिंग हे कधीकाळी लाहोरच्या शासकीय महाविद्यालयात एकत्र शिकलेले होते आणि ते एकमेकांचे मित्र होते.

चर्चेच्या ठिकाणी चिलीचे जनरल मराम्बियो यांनी भारत-पाकिस्तान यांच्यासाठी २ वेगवेगळ्या तंबूची व्यवस्था केली होती. हरबक्ष सिंग ज्यावेळी तिथे पोहोले त्यावेळी त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम जनरल राणा यांची विचारपूस केली आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

हरबक्ष सिंग आणि जनरल राणा ज्यावेळी समोरासमोर आले त्यावेळी सिंग यांनी राणा यांना मिठीच मारली. हे बघून चिलीचे जनरल मराम्बियो यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि ते म्हणाले,

“मला खरंच कळत नाहीये की भारत-पाकिस्तान हे एकमेकांशी नेमकं का लढताहेत..? लढण्याचं नेमकं कारण तरी काय आहे..?”

पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याकडून तलवार भेट

harbaksh singh with shastriji

हरबक्ष सिंग यांनी दाखवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांना एक तलवार भेट दिली होती. जी त्यांच्या परिवाराने अत्यंत अभिमानाने सांभाळून ठेवलेली आहे.

दरम्यान या युद्धानंतर सेनाध्यक्ष जे.एन.चौधरी यांना पद्म विभूषण देऊन गौरविण्यात आलं होतं. या गोष्टीचा हरबक्ष सिंग यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांना फोन करून विरोध केला होता.

हरबक्ष सिंग यांनीच केलेल्या दाव्यानुसार त्यावेळी यशवंतरावांनी त्यांना जे.एन.चौधरी यांच्यानंतर सेनाध्यक्ष बनविण्याचा शब्द दिला होता. पण त्यानंतर काही काळातच शास्त्रीजींच्या मृत्यूमुळे ही गोष्ट तिथेच मागे पडली.

१ ऑक्टोबर १९१३ रोजी पंजाबमधील संगरुर येथे जन्मलेल्या हरबक्ष सिंग यांचे वडील सैन्यात डॉक्टर होते. त्यांचे भाऊ देखील ब्रिटीश सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते. ब्रिटीश सैन्याकडून लढताना या दोघाही भावांना जपानी सैन्याने युद्धबंदी देखील बनवलं होतं.

पुढे भारताच्या स्वातंत्र्यानंतर ऑक्टोबर १९४७ साली पाकिस्तानने काश्मीरवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी काश्मीर वाचविण्यात देखील जनरल हरबक्ष सिंग यांची अतिशय महत्वाची भूमिका राहिली होती. भारतीय सैन्यात त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल भारत सरकारकडून त्यांचा वीर चक्र, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन सन्मान करण्यात आला होता. १९९९ साली आजच्याच दिवशी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचं दिल्ली येथे निधन झालं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.