शायर ज्याला नेहरूंनी जेलमध्ये बंदिस्त केलं होतं !

राजसत्ता नेहमीच साहित्यिक, कवी, शायर आणि बुद्धीजीवी लोकांना आपल्या अधीन ठेवण्यासाठी प्रयत्नरत असते. यामागचं कारण सरळ की त्यांच्याकडे असलेल्या लेखणीच्या  ताकदीची कल्पना राजसत्तेला खूप चांगल्याप्रकारे असते. म्हणूनच ही लेखणी कधी आपल्या सरकारविरोधात बुलंद होऊ नये, असा जगभरातील राजसत्तांचा प्रयत्न असतो.

एखाद्या पत्रकार, लेखक आणि कवीने जर तसा काही प्रयत्न केलाच तरच तो मोडून काढण्यासाठी काय काय केलं जातं याची अनेक उदाहरणं आपण वर्तमानकाळात बघतच आहोतच, पण स्वतंत्र आणि विरोधी आवाजाला दडपून टाकण्याची आपली ही परंपरा काही आज सुरु झालेली नाही.

आपल्याविरोधातील स्वातंत्र्य आवाजाला दडपून टाकण्यात स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा आपलं योगदान दिलंय. त्याअर्थाने स्वातंत्र्य भारतात विरोधी आवाज दडपण्यासाठी त्याची गळचेपी सुरु करण्याचं श्रेय देखील जवाहरलाल नेहरू यांचंच.

किस्सा आहे १९४९ सालचा. नेहरू देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होते आणि त्यांनी आपल्या विरोधात शेर लिहिणाऱ्या एका शायरला त्याबदल्यात जेलमध्ये पाठवल होतं. नेहरूंविरोधात शेर लिहून आपल्या अभिव्यक्तीची किंमत जवळपास २ वर्षांचा तुरुंगवास भोगून चुकवणाऱ्या या शायरचं नाव होतं मजरूह सुलतानपुरी.

हो ! मजरूह सुलतानपुरी !

“मै अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर/ लोग साथ आते गये और कारवा बनता गया”

हा शेर लिहिणारे मजरूह सुलतानपुरी !

प्रख्यात शायर आणि हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपर-डुपरहिट गाणी देणारे गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना भारतीय स्वातंत्र्यानंतर २ वर्षांनीच तुरुंगात जायला लागलं होतं. मुंबईतील कामगारांच्या एका मोर्चाला संबोधित करताना त्यांनी नेहरूंविरोधातील शेर ऐकवला होता.

याच शेरमुळे सुलतानपुरी साहेब नेहरूंच्या प्रकोपाचे शिकार झाले !

खादी आणि नेहरू यांच्याविरोधातील या शेरमुळे मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर मोरारजीभाई देसाई यांनी मजरूह सुलतानपुरी यांची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये केली. जेलमध्ये टाकण्यात आल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्यासमोर सरकारची माफी मागण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु अत्यंत स्वाभिमानी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या सुलतानपुरी यांनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि जवळपास २ वर्षे तुरुंगात काढली.

तुरुंगात असतानाच्या काळात त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली. कुटुंबाचे हाल व्हायला लागले. त्यावेळी प्रख्यात सिनेकलाकार राज कपूर त्यांच्या मदतीसाठी धावले. राज कपूर यांना सुलतानपुरी यांच्याविषयी आदर होता. याच आदरातून राज कपूर त्यांची मदत करू इच्छित होते. पण इथे परत सुलतानपुरी यांचा स्वाभिमान आडवा आला. राज कपूर यांची मदत स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.

राज कपूर यांनी मात्र या परिस्थितीतून देखील मधला मार्ग काढला. त्यांनी असा उपाय सुचवला की ज्यामुळे सुलतानपुरी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील होईल आणि त्यांचा स्वाभिमान देखील दुखावला जाणार नाही. राज कपूर यांनी मजरूह सुलतानपुरी यांच्याकडून एक गीत लिहून घेतलं आणि त्याबदल्यात त्यांच्या कुटुंबियांना १००० रुपये दिले.

https://www.youtube.com/watch?v=pGYjHQbV1KE

सुपरहिट ठरलेलं ‘एक दिन मिट जायेगा, माटी के मोल’ हेच ते गाणं होतं, जे सुलतानपुरी साहेबांनी राज कपूर यांच्या विनंतीवरून लिहिलं होतं.  १९७५ साली राज कपूर यांनी आपल्या ‘धरम करम’ या चित्रपटात ते वापरलं होतं.

तुरुंगात बंदिस्त असताना देखील त्यांनी लिहिलेल्या गाण्यांना जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळत होती. अनेकांच्या ओठांवर त्यांचं गाणं असायचं. शेवटी त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेसमोर सरकारला झुकावं लागलं आणि त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली.

हिंदी चित्रपटसृष्टीवर गीतकार म्हणून दीर्घकाळ आपलं साम्राज्य गाजवलेल्या मजरूह सुलतानपुरी यांना खरं कधीच चित्रपटसृष्टीत यायचं नव्हतं. त्यावेळच्या अनेक शायारांप्रमाणेच गीतकार म्हणून काम करणं आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही, असं त्यांचं मत होतं. पण शेवटी त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि एकापेक्षा एक असे जबरदस्त हिट गाणी बॉलीवूडला दिली.

सर्वप्रथम १९४५ साली सुलतानपुरी साहेब एका मुशायऱ्यात सहभागी झालेले असताना फिल्म प्रोड्युसर ए.के.कारदार यांच्या नजरेत ते भरले आणि त्यांनी सुलतानपुरी यांच्यासमोर आपल्या चित्रपटासाठी गीतलेखन करण्याचा प्रस्ताव ठेवला. कारदार यांचा हा प्रस्ताव सुलतानपुरी साहेबांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला परंतु कारदार यांनी आपली जिद्द सोडली नाही.

आपल्या चित्रपटासाठी कुठल्याही किमतीवर गीतलेखक म्हणून कारदार यांना सुलतानपुरीच हवे होते. त्यामुळे त्यांनी सुलतानपुरी यांचे गुरु जिगर मोरादाबादी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी समजावून सांगितल्यानंतर शेवटी सुलतानपुरी साहेब गीतलेखनासाठी तयार झाले. १९४६ साली  कारदार यांच्या ‘शहाजहा’ चित्रपटाच्या गीतलेखकाच्या स्वरुपात त्यांची बॉलीवूडमध्ये एंट्री झाली.

https://www.youtube.com/watch?v=7lZLePeN7BA

‘शहाजहा’मधीलच त्यांनी लिहिलेलं आणि के.एल. सहगल साहेबांनी गायलेलं ‘जब दिल ही टूट गया, अब जी के क्या करेंगे’ प्रचंड गाजलं. स्वतः के.एल. सहगल साहेबांना हे गाणं खूप आवडलं. त्यामुळे आपल्या मृत्युनंतर अंत्ययात्रेत हे गाणं वाजवलं जावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. के.एल. साहेबांकडून मिळालेली ही पावतीच मजरूह सुलतानपुरी यांच्याबद्दल सर्व काही सांगून जाते. कुठल्याही कलाकारासाठी आपल्या कलाकृतीला मिळालेलं यापेक्षा चांगलं दुसरं प्रशस्तीपत्र काय असू शकतं..?

एकदा चित्रपटसृष्टीत पदार्पण झाल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. जवळपास ६  दशकं बॉलीवूडमध्ये सक्रीय राहिलेल्या सुलतानपुरी साहेबांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी ४००० पेक्षा अधिक गाणी लिहली. ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ ‘हमे तुमसे प्यार कितना, ये हम नही जानते’ ‘इक लडकी भिगी भागी सी’ ‘वो मेरे दिल के चैन’ ही त्यांच्या सुपरहिट गाण्यांची काही उदाहरणे.

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले पहिले गीतकार 

१९६४ सालचा ‘दोस्ती’ प्रचंड गाजला. याच चित्रपटातील ‘चाहुंगा मै तुझे सांझ सवेरे’ या गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. पुढे १९९३ साली मजरूह सुलतानपुरी साहेबांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावणारे बॉलीवूडमधील पहिले गीतकार ठरले होते.

१ ऑक्टोबर १९१९ रोजी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे जन्मलेल्या मजरूह यांचं खरं नाव ‘आसरारूल हक खान’ असं होतं. पण लेखन सुरु केल्यानंतर त्यांनी मजरूह सुलतानपुरी असं नाव धारण केलं होतं. गीतकार आणि शायर म्हणून प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या सुलतानपुरी साहेबांसाठी शायरी ही जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या श्वासाइतकी जवळची गोष्ट होती.

आज त्यांच्या जयंतीदिनी अभिव्यक्तीच्या गळचेपीच्या सर्वात वाईट काळात आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या आणि विरोधी आवाज बुलंद ठेवणाऱ्या या महान शायराची आठवण जपण्याचा हा प्रयत्न.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.