पद्मा चव्हाण- मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब !

मराठी चित्रपटसृष्टीतील सौंदर्याचा अप्रतिम नमुना म्हणून मराठी सिने आणि नाट्य अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख केला जात असे. त्यामुळेच त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीमध्ये त्यांचं वर्णन ‘मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’ असं केलं जात असे.

पद्मा चव्हाण यांच्याविषयीचा एक किस्सा जेष्ठ पत्रकार आणि रंगकर्मी शिरीष कणेकर यांनी लिहिलाय. कणेकरांचा एक प्रयोग शिवाजी रंगमंदिरात सुरु होता. प्रयोगासाठी पद्मा चव्हाण आल्या होत्या.

प्रयोगात कणेकरांच्या तोंडी एक संवाद होता. संवाद असा की,

“ पद्मा चव्हाणला महाराष्ट्राची मार्लिन मन्रो म्हणतात, असं तिकडे अमेरिकेत मन्रोच्या कानावर गेलं म्हणून ना तिने आत्महत्या केली..?”

कणेकरांसमोर प्रश्न होता की समोर प्रेक्षकात पद्मा चव्हाण बसलेल्या असताना हा संवाद फेकायचा कसा..? कदाचित पद्मा चव्हाण खिलाडूवृत्तीने तो स्वीकारतीलही पण प्रेक्षक त्यांना सोडतील का..? प्रेक्षक त्यांच्यासमोर येऊन चित्रविचित्र आवाजात चिरकतील की काय अशी भीती त्यांना वाटत होती.

प्रयोग सुरु असताना आपणच घाबरलो होतो आणि तो संवाद आपण त्या प्रयोगात बोललो की नाही हे आठवत नाही, पण कदाचित घाबरून तसा तो न बोलल्याचीच शक्यता जास्त. कारण पद्मा चव्हाणने कानाखाली आवाज काढला असता तर आपणच थेट मर्लिन मन्रोला भेटायला गेलो असतो, असं कणेकरांनी लिहिलंय.

मराठीतील प्रसिद्ध बंडखोर लेखक चंद्रकांत खोत आणि पद्मा चव्हाण यांच्या नात्याच्या अनेक चर्चा झाल्या. चंद्रकांत खोत हे आपलं लग्न पद्मा चव्हाण यांच्याबरोबर झाल्याचा दावा करत असत, पण पद्मा चव्हाण यांच्याकडून मात्र कधीही या गोष्टीला दुजोरा मिळू शकला नाही. चव्हाण-खोत प्रकरण फक्त एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांच्यातले वाद-विवाद बरेच वाढले. कोर्टबाजी झाली.

‘गुंतता हृद्य हे’, ‘लग्नाची बेडी’, ‘माझी बायको, माझी मेव्हणी’ यांसारख्या नाटकांमधून आणि ‘अवघाची संसार’ ‘गुपचूप गुपचूप’ ‘सदमा’ ‘करवा चौथ’ यांसारख्या चित्रपटामधून प्रेक्षकांना भेटलेल्या पद्मा चव्हाण यांचा १२ सप्टेबर १९९६ रोजी अपघाती मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.