अमेरिका २००८ सालापर्यंन्त मंडेलांना दहशतवादी मानत होता !

नेल्सन रोलीहलाहला मंडेला.

आधुनिक दक्षिण आफ्रिकेचे निर्माते. वर्णभेदाविरुद्धच्या चळवळीतलं जागतिक पातळीवरील विसाव्या शतकातलं सर्वात महत्वाचं नांव. आपली अवघी हयात या माणसाने वर्णभेदाविरुद्धच्या संघर्षात घालवली आणि तुरुंगातून सुटून आल्यानंतर आधुनिक दक्षिण आफ्रिकेच्या निर्मितीची पायाभरणी केली.

त्यांची आज १०० वी जयंती. संयुक्त राष्ट्रांकडून हा दिवस ‘जागतिक मंडेला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतोय.

१८ जुलै १९१८ साली दक्षिण आफ्रिकेतील मार्विजो या गावात जन्मलेल्या मंडेलांना लोक प्रेमाने ‘मदिबा’ म्हणून देखील बोलवत असत.  महाविद्यालयीन जीवनात असताना वाल्टर सिसुलू आणि वाल्टर एल्बरटाइन यांच्या संपर्कात आल्याने ते राजकीयदृष्ट्या सक्रीय झाले. सुरुवातीच्या काळात या दोघांचाच मंडेला यांच्यावर प्रभाव होता. आजूबाजूला घडत असलेल्या वर्णभेदाच्या घटनांनी उद्विग्न होऊन त्याविरोधात व्यापक लढाई उभारण्याचा  निर्णय त्यांनी घेतला आणि तिथूनच दक्षिण आफ्रिकेतील वकिलीचं  शिक्षण घेतलेल्या सामान्य मुलाच्या असामान्य प्रवासाची सुरुवात झाली.

वर्णभेदाची लढाई लढण्यासाठी ते आफ्रिकी राष्ट्रीय काँग्रेसशी जोडले गेले आणि पुढे या संघटनेच्या नेतृत्वाची धुरा देखील सांभाळली. ऑगस्ट १९६२ साली त्यांना अटक झाली. त्यांच्यावर खटला चालवण्यात येऊन १९६४ साली त्यांना २७ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कारावासातील शिक्षेदरम्यान देखील  त्यांनी तुरुंगातून आपला लढा सुरूच ठेवला. १९९० साली आपली जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करून बाहेर पडलेल्या मंडेलांनी १९९४ सालची निवडणूक लढवली.  त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने या निवडणुका जिंकल्या आणि  मंडेला आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बनले.

mandela
twitter

आफ्रिकेच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होईपर्यंत वर्णभेदाविरुद्ध त्यांनी लढलेल्या लढाईचा गौरव शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराने करण्यात आलेला होता.

महात्मा गांधींना आपला आदर्श मानणाऱ्या आणि त्यामुळेच ‘आफ्रिकेचे गांधी’ म्हणून नावारूपास आलेल्या  नेल्सन मंडेला यांना भारत सरकारने देखील आपला सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केलं होतं. भारताशिवाय रशिया, कॅनडा, पाकिस्तान यांसारख्या देशांनी देखील आपले सर्वोच्च सन्मान देऊन त्यांच्या लढ्यास सलाम केला होता.

जगभरात मंडेलांचं नांव आदराने आणि गौरवाने घेतलं जात असताना एक देश असा देखील होता जो मंडेला यांना दहशतवादी मानत होता. तो देश म्हणजे अमेरिका. २००८ सालापर्यंत मंडेलांचं नांव अमेरिकेच्या ‘टेरर वॉच लिस्ट’ मध्ये होतं. मंडेला आणि त्यांच्या आफ्रिकी नॅशनल काँग्रेसने वर्णभेदाविरोधात चालवलेल्या लढ्यास अमेरिका दहशतवादी कृत्य मानत असे. त्यामुळेच मंडेला यांच्यासह आफ्रिकन काँग्रेसमधील काही सदस्यांचा या यादीत समावेश करण्यात आला होता.

बराक ओबामा ज्यावेळी २००८ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले त्यावेळी त्यांनी मंडेलांचं नांव या यादीतून वगळलं. ओबामांसाठी महात्मा गांधींप्रमाणेच मंडेला हे देखील प्रेरणास्थानी होते. आपण आपल्या आयुष्यात कायमच गांधी आणि मंडेला यांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न केलाय, असं ओबामा यांनीच सांगितलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.