तुम्ही गोमांस खाल का? या प्रश्नावर प्रबोधनकारांनी जे उत्तर दिलं ते आजही अनेकांना पचणार नाही

काल राज ठाकरेंनी जे भाषण केलं, त्यामध्ये आपल्या आजोबांचा प्रबोधनकार ठाकरेंचा संदर्भ देत म्हणाले, संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे, माझ्या आजोबांनी या लोकांसाठी शब्द काढलेला ‘लवंडे’… यासोबत त्यांनी मशिदीवरचे भोंगे उतरवणार असल्याचा पुनरुच्चार केला. थोडक्यात आपण घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका ही कितीही विरोध झाला, तरी ठाम राहील हे त्यांनी कालच्या भाषणातून स्पष्ट केलं.

पण मुळात प्रबोधनकार ठाकरे हे हिंदुत्ववादी होते का? आणि त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार काय होते? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे.

महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या नावाची जेव्हा कधी चर्चा होते, त्यावेळी प्रबोधनकारांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. लेखक पत्रकार, इतिहासकार म्हणून ते स्वयंभू होते.

त्यांनी सुरु केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकावरून त्यांना प्रबोधनकार ही उपाधी मिळाली.

प्रबोधनकारांचे व्यक्तिमत्व अगदी सुरवातीपासून झंझावती होते. भाषणातील ‘ठाकरी शैली’चा उगम त्यांच्यापासूनच झाला. बाळासाहेब आणि पुढच्या पिढीला त्यांनी ‘मराठी बाणा’ आणि ‘हिंदुत्व’ यांचा वारसा दिला. प्रबोधनकारांचा हिंदुत्ववाद हा आजही अनेकांना पचनी पडणारा नाही.

13001
प्रबोधनकार, मीनाताई आणि बाळासाहेब !

कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे अशा पुस्तकातून त्यांनी प्रचलित धर्म व्यवस्थेतील कर्मकांडावर टीकास्त्र सोडले होते. जातीव्यवस्था,अस्पृश्यतेचा प्रश्न, हुंडा-बालविवाहासारख्या अनिष्ट परंपरा या मुळे हिंदू धर्मियांचे खच्चीकरण होत आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

प्रबोधनकार ठाकरेंनी स्वातंत्र्यपूर्व काळात गजानन वैद्य यांनी हिंदुत्वाच्या प्रसारासाठी सुरु केलेल्या हिंदू मिशनरीज या संस्थेबरोबर काम केले होते. ब्रिटीश ख्रिस्ती मिशनरीजनी सुरु केलेल्या  हिंदूच्या आक्रमक धर्मांतराविरुद्ध त्यांनी लढा दिला होता. त्या काळातले कर्मठ धर्मपंडीत अशा धर्मांतर झालेल्या बांधवाना परत हिंदू धर्मात घेण्याच्या विरोधात असायचे. पण प्रबोधनकारांनी कोणालाच जुमानले नाही.

‘माझी जीवनगाथा’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी एक किस्सा सांगितलाय 

‘हिंदू मिशनरी’तर्फे अख्या महाराष्ट्रात प्रबोधनकारांच्या सभा चालत. एकदा अशाच एका सभेसाठी ते नागपूरला गेले होते. सभेला विलक्षण गर्दी झाली होती. ठाकरेंच्या घणाघाती भाषणानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरु झाला. यातच एक ख्रिस्ती रेव्हरंड सुद्धा सभेला हजर होते.

त्यांनी ठाकरेंना सवाल केला,

“परधर्मीयांकडे अन्नभक्षण केल्याने हिंदू बाटतो की नाही?”

प्रबोधनकार म्हणाले,

” हिंदूला बाट कशानेही लागत नाही.”

रेव्हरंडचा पुढचा सवाल

“तुम्ही मुसलमानांकडे जेवता का?”

ठाकरेंचे प्रत्युत्तर.

“आम्ही वाटेल त्याच्या हातचे खाऊ आणि हिंदू राहू”

रेव्हरंडचा आत्ता गुगली टाकण्याचा प्रयत्न.

“तुम्ही गोमांस खाल का?”

यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी जे उत्तर दिले त्या उत्तराने त्या रेव्हरंडची बोलतीच बंद झाली. प्रबोधनकार म्हणाले,

“गोमांसच काय, आम्ही तुम्हाला खाऊ. तुमच्या क्रिस्ताला खाऊ, सगळ्या जगाला खाऊ आणि वर निर्भेळ हिंदूच राहू. आजकालची ही नवी जनस्मृती आहे.”

ठाकरी भाषा शैलीतून दिलेली ही चांगलीच चपराक होती. या सभेनंतर अनेक धर्मांतर झालेले तरुण ठाकरेंना येऊन भेटले. त्यांनी धर्मात शुद्धी करून घेण्याची विनंती केली.

प्रबोधनकार म्हणाले “शुद्धी कसली? छे छे उपनयन “.

त्यांना कमरेभर पाण्यात उतरण्यास सांगितले. गायत्री मंत्राच्या घोषात त्यांना यज्ञोपवीत चढवण्यात आली. चिंतामणराव मराठ्यांनी गीतेच्या ११ व्या अध्यायाचं पठन केलं. कोणतंही मोठं कर्मकांड न करता अत्यंत सोप्या पद्धतीने या तरुणांना परत हिंदू धर्मात घेण्यात आलं.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात असे क्रांतिकारी विचार असणारे प्रबोधनकार ठाकरे हे कोणत्याही अस्मितेच्या पलीकडे जाणारे समाजसुधारक होते.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.