शारजा मध्ये काय झालं होतं, की तिथे क्रिकेट खेळणं अचानक बंद झालं.

भारत पाकिस्तानच्या अटीतटीच्या सामन्यांचा थरार. दोन्ही देशाच्या फॅन्सनी खाचाखच भरलेलं स्टेडियम. सगळीकडे भारत पाकिस्तानचे झेंडे समान लहरत असलेले झेंडे. आपआपल्या टीमच्या बाजूने जोरजोरात करण्यात येत असलेलं घोषणा युद्ध. असा हा माहोल अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. अनेक कटूगोड आठवणी या स्टेडियमशी जोडलेल्या आहेत.

मग इथे पुर्वीसारखे सामने का होत नाहीत? आधी आपण या स्टेडियमचा इतिहास जाणून घेऊ.

युनायटेड अरब अमिराती नावाचा क्रिकेटच्या नकाशावर कोणाच्या खिजगणतीतही नसणारा देश. पण सात अरब सुलतानाच्या सात अमिराती एकत्र येऊन बनलेला हा वाळवंटी देश तेलाच्या कृपेने जगभरात डंका वाजवत होता. याच सात अमिराती पैकी एक शारजा. दुबई पासून अवघ्या काहीच किलोमीटर वर असलेल्या या गावात ऐंशीच्या दशकात एका श्रीमंत व्यापाऱ्यान हे स्टेडियम उभारलं.

त्याच नाव अब्दुल रहमान बुखातीर.

अब्दुलला विश्वास होता वाळवंटात त्याने हे क्रिकेटचे बीज रुजवले होते त्याचे झाड होऊन त्याला भरभरून फळे लागतील. आणि घडलं ही तसंच.६ एप्रिल १९८४ साली पहिली वनडेमॅच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अशी खेळवण्यात आली. येथून सुरु झाला शारजा क्रिकेटचा एरा.

भारत आणि पाकिस्तानमध्ये असंख्य कुरबुरी काश्मीर प्रश्न दहशतवादी संघटनांच्या धमक्या यामुळे एकमेकाच्या देशातील दौरे जवळपास बंद होते. मग शारजा स्टेडियमने दोन्ही देशाच्या सिरीजचे आवतान दिल. दुबई आणि युएई मध्ये असंख्य भारतीय आणि पाकिसात्नी लोक स्थायिक झाले होते. शिवाय शारजा मुंबईपासून विमानाने काही तासाच्याच अंतरावर होती. मग दोन्ही देशाच्या फन्सच्या सोयीच्या ठिकाणी म्हणून शारजामध्ये हे सामने होऊ लागले.

याकाळात अनेक तुफानी सामने झाले. पहिली सगळ्यात गाजलेली मॅच म्हणजे मियांदादने शेवटच्या चेंडूमध्ये सिक्स मारून भारताला हरवलं होत. आपल्या इथे अनेकांनी टीव्ही फोडले होते. वासिम अक्रमने इथेच त्याची फेमस हॅट्रिक घेतली होती.

फक्त पाकिस्तानच नाही तर इतर देशाबरोबरचे सामने सुद्धा खूप गाजले. सचिन तेंडूलकरच तर हे लाडकं स्टेडियम होत. इथेच सँडस्टोर्म आल असताना त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध भन्नाट इनिंग खेळली होती. शेन वॉर्नला पुढे येऊन येऊन त्याने मारलेले सिक्स, वाढदिवसा दिवशी त्याला मिळालेली मॅन ऑफ दि सिरीजची कार. त्यावर चढून बसून ऑस्ट्रेलियाला हरवल्याचा आनंद साजरा करत अख्ख्या स्टेडियमला राउंड मारणारे खेळाडू हे अगदी काल घडल्यासारख वाटतं.

इथेच सचिन ने हेन्री ओलोंगाला धुवून त्याचा अहंकार ठेचला होता. तसेच याच स्टेडियममध्ये श्रीलंकाने आपल्याला फक्त ५४ धावात सर्वबाद करून इतिहासातला सर्वात लाजीरवाणा पराभव स्वीकारायला लावला होता. असे अनेक अविस्मरणीय सामने इथे झाले. या सामन्यामध्ये अब्दुल बुखातीरने बरेच पैसे ही कमावले. सामन्यानंतर तो देत असलेली बक्षिसे हा सुद्धा चर्चेचा विषय होता. उंटावर बसून हिंडणाऱ्या अरबी शेखांना याच शारजा ने क्रिकेटचे वेड लावले.

मग असं काय झालं की इथे भारताने सामने खेळायचे बंद केले?

मगाशी ज्या सामन्याचा उल्लेख झाला तो भारत श्रीलंकाचा सामना हा भारताचा शेवटचा सामना होता. २५४ धावांनी झालेला पराभवानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या. बाटलीत बंद असलेल मॅच फिक्सिंगच भूत बाहेर आलं. पाकिस्तानचा कप्तान सलीम मलिक हा सगळ्यात पहिला सापडलेला आरोपी होता. त्याच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार  हॅन्सी क्रोनिये याने सुद्धा शारजामध्ये खेळलेल्या सिरीज मध्ये पैसे घेऊन सामने हरल्याची कबुली दिली.

पूर्व पाकिस्तानी खेळाडू अमीर सोहेल याने सांगितलं की शारजा हे सट्टेबाज आणि बुकींचे माहेरघर आहे. हॅन्सी क्रोनियेच्या आरोपाच्यावेळी झालेल्या चौकशीत एका बुकीने पाकिस्तानच्या दोन खेळाडूना एक लाख डॉलरची बग दिल्याचं सांगितलं. भारताचा कप्तान अझरूद्दीन, उपकप्तान अजय जडेजा, नयन मोंगिया हे सुद्धा मॅच फिक्सिंग मध्ये सापडले. भारताचा माजी खेळाडू सुपरस्टार कपिल देववर मनोज प्रभाकर ने फिक्सिंगचे आरोप लावले, त्याबद्दल स्टिंग ऑपरेशन झाले.

शारजा स्टेडियमसाठी तिथला पैसा हा शाप ठरला.

दुबईजवळ असल्यामुळे पैशाचा वाहत ओघ शारजा मध्ये होता. मुंबईचे अंडरवर्ल्ड डॉन तिथे सेटल झाल्यामुळे त्यांचा पण हस्तक्षेप वाढला. दाऊद इब्राहीमचं हे लाडक स्टेडियम होत. बॉम्बस्फोट प्रकरणानंतर गायब होण्यापूर्वी त्याला या स्टेडियमवर मॅच पाहताना अनेकदा पाहण्यात आलं होत.

दिलीप वेंगसरकर यांनी सांगितलेल्या कथेनुसार एकदा स्वतः दाऊद इब्राहीम शारजामधल्या भारताच्या ड्रेसिंग रूम मध्ये शिरला होता पण त्याला कपिल देवने हाकलून लावले होते.

एकूणच शारजाचा भोवती घडलेल्या या घटनांनी शारजा बदनाम झाली.

अनेक तज्ञांनी शारजामध्ये कमीतकमी दहा ते बारा सामन्यांची निकालनिश्चिती करण्यात आली असल्याची शक्यता बोलून दाखवली.  बीसीसीआयने भारतीय टीमला शारजाला पाठवण्यास नकार दिला. भारत तिथे येत नाही म्हटल्यावर इतर देशांनी सुद्धा शारजाला जाणं थांबवलं.

२००३ ते २०१० पर्यंत एकसुद्धा इंटरनॅशनल मॅच तिथे झाली नाही. पुढे पाकिस्तानमध्ये सामन्या दरम्यान दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तिथले सामने खेळण्याच्या निम्मिताने शारजामध्ये परत सामने खेळले जाऊ लागले.

आता पर्यंतचा सर्वात जास्त वनडे सामने (२३६) आयोजित करण्याचा विक्रम शारजा स्टेडियमने आहे. त्यांची टीम अजूनही कसोटी साठी क्वालिफायझालेली नाही तरी शारजाला कसोटी सामने आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.

२०१४ च्या आयपीएल सिझनचे सुरवातीचे काही सामने भारतातल्या लोकसभा निवडणुकीमुळे शारजाला खेळवले गेले. यंदाच्या वर्षी देखील IPL चे सामने शारजा मध्ये खळवले जात आहेत. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.