मुस्लीम मुलांना देखील आपल्या मठात शिकवणारे ते काळाच्या पुढचे ‘संत’ होते.

सुषमा राव नावाच्या एक सुप्रसिद्ध नाट्यकलाकार आहेत. मध्यंतरी त्यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती, त्यात त्या लिहतात, “मी तेव्हा ती तेरा वर्षाची होती. माझ्या शाळेची ट्रिप शिवगंगा ट्रेकिंगसाठी गेली होती. येताना दुपारच्या जेवणासाठी सगळे सिद्धगंगा मठामध्ये गेलो होतो. मला आणि माझ्या काही मैत्रिणीना जेवणासाठी वेगळ बसवण्यात आलं. तेव्हा एक भगव्या कफनीमधले म्हातारे साधूबाबा तेथून जात होते. त्यांनी विचारलं या मुलींना का वेगळं बसवलं आहे. त्यावेळी त्यांचे मासिक धर्मातले ते दिवस होते म्हणून त्यांच्या शिक्षिकेने त्यांना वेगळं बसवलं होतं. 

नव्वदीतल्या साधूबाबांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. त्यांनी त्या मुलीना सगळ्यांच्याबरोबर जेवायला बसवलं. ते मायेन हसून म्हणाले ,

“मासिक पाळी ही काही अपवित्र गोष्ट नाही तर शरीराची नित्यनियमाची क्रिया आहे. कधीच त्याची लाज बाळगू नका”.

आपल्या विचारांनी काळाच्या कित्येक वर्ष पुढे असलेले साधुबाबा म्हणजे सिद्धगंगा मठाचे गुरु शिवकुमार स्वामी.

शिवण्णा यांचा जन्म १ एप्रिल १९०७ साली कर्नाटक राज्यातल्या (त्याकाळातले म्हैसूर) विरापुरा या गावी एका धार्मिक कुटुंबात झाला. गंगाम्मा आणि होनेगौडा या दांपत्याच्या तेरा मुलांपैकी हे सर्वात धाकटे.

शिवण्णा लहानपणापासूनच शाळेमध्ये हुशार म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवले. त्यांना शिकण्यासाठी सिद्धगंगा मठामध्ये ठेवण्यात आलं. शिवण्णा पदवीपर्यंत शिकले.

वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांची सिद्धगंगा मठाचा उत्तराधिकारी म्हणून निवड झाली. ११ जानेवारी १९४१ साली ते शिवण्णाचे मठाधिपती शिवकुमार स्वामी झाले.

सिद्धगंगा हा बंगळूरूपासून सत्तर किलोमीटर वर असलेल्या टूमकुर या गावातला लिंगायत समाजातला सर्वात शक्तीशाली मठ आहे. बसवेश्वर स्वामींच्या आदर्शांवर चालणाऱ्या या मठाच गेली सत्तर ऐंशी वर्ष अधिपत्य शिवकुमार स्वामींच्या कडे राहिलं.

शिवकुमार स्वामी हे काळाच्या मानाने बरेच पुरोगामी विचाराचे होते. त्यांनी कर्मकांड जातीभेद धर्मभेद राजकारण या सगळ्या गोष्टी मठापासून दूर ठेवल्या. 

2speechlecture753

देव दगडात नसून तो माणसात आहे ही त्यांची श्रद्धा होती. मठामध्ये येणाऱ्या आणि तिथे शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रतीचे जेवण मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.

त्यांनी सिद्धगंगा मठाच्या गुरुकुल परंपरेला अजून विस्तृत स्वरूप प्राप्त करून दिले. स्वामीनी शंभरच्यावर शैक्षणिक संस्था उभा केल्या. जिथे फक्त पारंपारिक संस्कृतचेच नाही तर आधुनिक विज्ञान, अभियांत्रिकी, मॅनजमेंट याचही ज्ञान मिळणार होत.

आज जवळपास नऊ हजार मुले सिद्धगंगा मठात शिक्षण घेतात. या मुलांना राहण्याची, खाण्याची, शिक्षणाची कोणतीही फी नाही. या मठामध्ये शिकण्यासाठी मुलांना कोणत्याही जातीधर्माची कसलीही अट नाही. अनेक मुस्लीम विद्यार्थी सुद्धा सिद्धगंगा मठात राहून शिकलेले आहेत. 

एकेकाळी या मुलांना खाऊ घालण्यासाठी शिवकुमार स्वामी तांदूळ आणि धान्याची भिक्षा मागून आणत. आज शेजार पाजारच्या तीन हजार खेड्यातून या मठातल्या मुलांच्या जेवणासाठी रोज सकाळी ट्रक भरून धान्य पोहचत केलं जात. सर्व जाती धर्माचे लोक दिवस वाटून घेऊन हे कार्य स्वतः करतात. पुढची पिढी घडवणे हीच ईश्वराची सेवा आहे हे शिवकुमार स्वामीजींचे तत्व होते.

एकदा लिंगायत विचारवंत माजी आय. ए. एस. अधिकारी एस.एम जामदार त्यांना अनेक वर्षांपूर्वी कुडलसंगम या तीर्थक्षेत्राच्या विकासा संदर्भात ते शिवकुमार स्वामींना भेटले. यावेळी स्वामीनी त्यांचे म्हणणे शांत पणे ऐकून घेतले. पण शेवटी ते म्हणाले,

” मंदिराचा विकास करणे, त्याच्या सभोवती उद्याने उभारणे हे कौतुकास्पदच आहे पण याशिवाय तिथे बसवान्ना यांच्या विचारांच्या पुस्तकांचं एक ग्रंथालय उभ केलं पाहिजे.”

दयाळू वृत्तीच्या स्वामीजीची ओळख शेवटपर्यंत चालतेफिरते देवपुरुष अशीच राहिली.

कर्नाटकात लिंगायत समाजाचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. अनेक लिंगायत मठ आपल्या स्पष्ट राजकीय भूमिका घेत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा मिळावा की नको याची अनेक चर्चा कर्नाटक राज्यात सुरु होती.

अशावेळी अनेक मठाधिपतीनी विविध राजकीय पक्षांच्या बाजू घेतल्या. पण सर्वात शक्तिशाली मठ असलेल्या सिद्धगंगा मठ या राजकारणापासून कोसो दूर राहिला. याचे एकमेव कारण म्हणजे शिवकुमार स्वामी. अनेक दिग्गज नेते सिद्धगंगेच्या दाराशी धरणे धरून बसले होते पण स्वामीनी कोणाच्याही पाठीवर हात ठेवला नाही.

shivkumar swami 2543309 835x547 m

२१ जानेवारी २०१९ रोजी वयाच्या १११ व्या वर्षी शिवकुमार स्वामींचे निधन झाले. कर्नाटकातले मुख्यमंत्र्यांपासून सर्व नेते सिद्धगंगा मठात हजर झाले होते. राज्यभरात ३ दिवसाचा दुखवटा जाहीर केला गेला आहे.

आपला देश म्हणजे संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. पण आजकाल संत महंत राजकारणापासून ते टूथपेस्ट विकण्याच्या बिझिनेसपर्यंत सगळ्या क्षेत्रात दिसतात. अशा काळात शिवकुमार स्वामी म्हणजे संत कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण होते.

हे ही वाचा भिडू.

2 Comments
  1. विशाल says

    बसवण्णा , तुमकूरु असे उच्चार आहेत, खात्री करून लिहावे .

  2. Pramod Ekanath Bamane says

    I m proud of such work which this ‘math’s is doing. But it is essential to fight for this reason itself, to get acknowledgement of लिंगायत धर्म as separate identity -as it belongs to all & happiness of all

Leave A Reply

Your email address will not be published.