…आणि स्मिता पाटील यांनी केलेली आपल्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली !

बॉलीवूडने आपल्या इतिहासात बघितलेल्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून जर तिचा उल्लेख केला तर ते अतिशयोक्ती ठरत नाही. अवघं ३१ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या स्मिताने या एवढ्याशा आयुष्यात देखील आभाळाएवढं काम करून ठेवलं होतं. समांतर सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात स्मिताचा वाटा लाखमोलाचा होता.

स्मिता अभिनेत्री म्हणून किती भारी होती हे इथे सांगायला नकोच. त्याविषयी भरपूर लिहिलं-बोललं गेलंय. आज तिच्या जन्मदिनी तिच्या आयुष्याचा एक वेगळा पैलू इथे वाचकांशी शेअर करावासा वाटतोय. तो पैलू स्पष्ट करणारे हे काही किस्से.

विख्यात चित्रकार व लेखक सुभाष अवचट सरांशी बोलणं झालं त्यावेळी त्यांनी स्मिता विषयीचा एक किस्सा सांगितला.

हा किस्सा मैथिली राव यांच्या Smita Patil: A Brief Incandescence या पुस्तकात देखील लिहिलाय.

सुभाष सर आणि स्मिता एकदा ताज हॉटेलच्या लिफ्टमधून जात असताना (पुस्तकात ते लॉबीत असताना असा उल्लेख आहे) त्यांनी एका परदेशी व्यक्तीला पाहिलं. स्मिता सुभाष अवचट यांना म्हणाली,

“या माणसाला विचारा की त्याचा नुकताच अपघात झालाय का ? त्याच्या डाव्या खांद्याला मार बसून  फ्रॅक्चर झालंय का?”

स्मिताने सांगितल्याप्रमाणे सुभाष अवचट यांनी त्या परदेशी व्यक्तीला विचारलं की त्याच्या बाबतीत असं काही झालंय का ? अवचट सरांच्या प्रश्नावर ती परदेशी व्यक्ती एकदमच अचंबित झाली आणि म्हणाली,

“हो, हे अगदी खरंय ! पण  तुम्हाला कसं कळालं ?

त्या व्यक्तीच्या या प्रश्नावर काहीही न बोलता स्मिता आणि अवचट सर दोघेही  बाहेर पडले. सुभाष सर मला म्हणाले की, “तिला ऑरा दिसायचा माणसाच्या भोवती. त्यावरून ती अंदाज करायची.” या असल्या गोष्टी मला व्यक्तिशः पटत नसल्या तरी ती सत्य घटना आहे. हे असे अनेक किस्से मी अनेकदा पार्टी, समारंभात स्वतः पाहिले आहेत.

पूनम धील्लोन हिच्याशी बोलताना तर स्मिताने सांगितलं होतं  की “आपण वयाच्या  ३१ व्या वर्षी मरणार आहोत”.

स्मिताने आपल्या मृत्यूच्या केलेल्या भविष्यवाणीचा हा किस्सा स्वतः पुनम धील्लोन यांनीच ‘लेहेरे’ या त्यावेळच्या व्हिडीओ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

स्मिता संदर्भातील अजून एक किस्सा असा की अमिताभ बच्चन एकदा ‘कूली’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी  बंगलोरला आले होते. तेव्हा रात्री दोन वाजता त्यांना फोन कॉल आला. सेक्रेटरीने त्यांना उठवून सांगितलं  की स्मिता पाटील फोनवर आहेत. यापूर्वी कधीही स्मिताने अमिताभ यांना फोन केला नव्हता त्यामुळे काहीतरी अर्जंट काम असणार असा विचार करून अमिताभ यांनी फोन घेतला.

फोनवर आलेल्या अमिताभ यांना स्मिताने  काळजीपुर्वक स्वरात विचारलं,

 “सर्व काही ठीक-ठाक आहे ना ? मी आताच एक वाईट स्वप्न पाहिलं त्यात तुम्हाला अपघात झालाय. म्हणून ख्यालीखुशाली पाहण्यासाठी कॉल केला.”

स्मिताचं बोलणं ऐकून हसत हसतच अमिताभ यांनी आपण सहीसलामत असून काळजी करण्याचं काहीच कारण नाही असं तिला सांगितलं.

पण दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा अमिताभ शुटिंगसाठी गेले त्यावेळी  कुलीच्या सेटवर त्यांचा जबरदस्त अपघात झाला. पुनीत इस्सार यांनी मारामारीच्या सीनमध्ये लावलेला ठोसा पोटात वर्मी बसला आणि पुढचे काही महिने त्यांना हॉस्पिटलमध्ये घालवावे लागले.

अमिताभ बच्चन हेच नंतर एका ठिकाणी म्हणाले,

“स्मिता पाटीलला दैवी देणगी होती. तिला सिक्सथ सेन्स होता. तिला घडणाऱ्या गोष्टींचा पूर्वाभास व्हायचा.”

१९८० सालापासून स्मिताने महिला सबलीकरणावर भर द्यायला प्रारंभ केला होता. मातांच्या मृत्यूचे प्रमाण रोखले जावे या प्रयत्नात ती होती. परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यूदेखील स्वतःच्या मुलाला जन्म देतानाच व्हावा याला नियतीचा कुठला खेळ म्हणायचा..? स्मिता जशी इतरांबद्दल गूढ गोष्टी सांगायची तशीच ती गेली. विशेष म्हणजे ती गेली त्यावेळी तिचं वय होतं अवघं ३१ वर्षे. तिने पूनम धिल्लोनला सांगितल्याप्रमाणेच बरोबर ३१ वर्षे.

भिडू प्रशांत पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.