वारणेच्या मातीत विकासगंगा आणणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे !

साखर कारखाना सुरू झाला की तात्या पहाटे उठून कारखान्याच्या परिसरात फिरायचे. सोबत एक दोन गार्ड असतं मग रस्त्यावर फिरताना आसपास ऊसाची दांडकी पडलेली असत. ती तात्या उचलत. सोबतचे गार्ड पण ती उचलत आणि मग ते सारं कारखान्याच्या गव्हाणीत आणून टाकलं जाई.

वारणा सहकार समूह ज्यांनी उभारला त्या तात्यासाहेब कोरेंची ही आठवण बरेच जण सांगतात. माझ्या वडिलांनी आणि बहिणीच्या सासऱ्यांनी पण ही आठवण सांगीतली आहे. ऊस पिकवणारा शेतकरी रक्त, घाम आटवून ऊस पिकवतो. त्याचं मोल जोखणारा कारखान्याचा तात्यासाहेब कोरेंसारखा संस्थापक,चेअरमन निराळाच..!

वारणा परिसर आज हिरवागार,संपन्न दिसतो तसा पन्नास वर्षापूर्वी नक्कीच नव्हता.

माळरान,पडीक,बाभळी उगवणाऱ्या माळावर दारिद्र्य पाचवीला पुजलं होतं. शेत जमीन चांगली होती, शेतकरी कष्ट करायचा पण हातात काहीच शिल्लक रहायचं नाही. शेतातल्या उत्पनाला बाजारात मोल नव्हतं. शेतीत सुधारणा करायच्या,पाणी पुरवठ्याची सोय करायची म्हटलं तर लहान शेतकऱ्यांकडे भांडवल नव्हतं.

वारणा खोऱ्याची  जी ही परिस्थिती होती तीच जवळपास सर्व महाराष्ट्राची होती. मात्र आज या परिसराचा जो कायापालट झालेला दिसतो, तो तात्यांच्या प्रयत्न आणि दूरदृष्टीतूनचं झालेला आहे. 1959/60 सालच्या आसपास वारणा साखर कारखान्याची सुरवात झाली आणि नव्या बदलांना पण सुरवात झाली.

Screenshot 29

वारणा साखर कारखाना सुरू झाला तरी कारखान्यासोबत वारणा खोऱ्याचा  चेहरा मोहरा बदलायला ‘वारणा दूध संघ’ मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला, कारण अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांना ऊस उत्पादन घेणं शक्य नव्हतं. साखर कारखान्यातून समाजातील ठराविक वर्गाचा विकास झाला असता पण तो ”सर्वसमावेशक” ठरला नसता. वारणा दूध संघ मग इथं लोकांच्या उपयोगी आला. वारणेच्या दूध उत्पादकांपैकी ३० टक्के उत्पादक महिला आहेत ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. ‘वारणा भगिनी मंडळ’ हा याच वारणा सहकार परिवाराचा घटक ज्याने शेकडो स्त्रीयांना रोजगाराची संधी मिळवून दिली.

भारतात जेंव्हा मॉल ही संकल्पना पण उदयाला आली नव्हती तेंव्हा म्हणजे १९७८ साली  ग्रामीण भागात ‘वारणा बझार’ची स्थापना करून गृहोपयोगी, दर्जेदार विविध वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून दिल्या.

आज वारणा बाजारच्या पन्नासच्या आसपास शाखा वारणा खोऱ्यात ग्राहक सेवा उपलब्ध करून देताहेत. शंभर कोटींपेक्षा जास्त असणारी वारणा बझारची वार्षिक उलाढाल बरचं काही सांगून जाते. वारणा साखर,वारणा दूध संघ यांच्यासोबत वारणा सहकारी बँक,वारणा शिक्षण मंडळ या संस्था ही मग स्थापन झाल्या.

पैसा माणसाला स्वातंत्र्य देतो. निवडीचं स्वातंत्र्य,जगण्याचं स्वातंत्र्य,ऊस पिकानं व दुग्ध व्यवसायाने ही बाब या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात दिली. पोरांची शिक्षण, किमान चांगल घरं,घरी कोणी आजारी पडल्यावर त्यांचे औषधोपचार आणि पोरापोरींची लग्न याबाबी पैसा हाती असल्यावरच केल्या जावू शकतात. सहकारानं आणि वारणा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या कष्टातनं या बाबी घडतं गेल्या. या साऱ्यात तात्यासाहेब कोरंची याला साथ व नेतृत्व लाभले.

चांगल्या माणसांना जोडण्याची कला तात्यांना अवगत होती.

वारणेवर हायस्कूल सुरू केल्यानंतर पाचगणीला जावून महाबळेश्वरवाला सरांना भेटून तात्यांनी त्यांना वारणेत आणलं आणि त्यांच्यावर हायस्कूलची जबाबदारी सोपवली. महाबळेश्वरवाला सरांची तात्यांनी दिवसभर ऑफिसच्या बाहेर वाट पाहीली होती.

मला हायस्कूल चालवताना तुमचा कोणताही हस्तक्षेप नको तरचं मी येईन’

असे महाबळेश्वरवाला सरांनी सांगताच ती अट पण तात्यांनी मान्य केली होती. शेतकऱ्यांची  पोरं शिकली पाहिजेत. त्यांना चांगले शिक्षक व शिक्षण मिळायला हवं म्हणून तात्यांनी केलेली ही धडपड कित्येकांना आज ही आठवते.

माझे आजोबा राजाराम यशवंत पाटील(बापू) तात्यांचे सहकारी. कारखाना उभारणीत तात्यांच्या खांद्याला खांदा लावून जे जे कोणी झटले त्यात आजोबा पण होते. तात्यांच्या आत्मचरित्रात आजोबांचा उल्लेख पण आहे. नंतर काही कारणानंतर मतभेद झाल्यावर तात्या व आजोबांचे मार्ग वेगळे झाले होते.

त्यानंतर गावात एका सभेसाठी तात्या आल्यानंतर सभेला आलेल्या माझ्या वडिलांना तात्यांनी जवळ बोलावून घेतले होते. वडील त्यावेळी बरेच लहान होते. तात्यांनी वडीलांना मांडीवर बसवले,त्यांच्यासोबत बोलले,सभेनंतर तात्या घरी आले. आजोबांना भेटलेले,परत सोबत येण्याबद्दल पण बोललेले. वडील हे बाब काही वेळा बोलून गेले आहेत

दरवेळी त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक मी कितीदा तरी पाहिली आहे आणि तात्यांबद्दलचा आदरही…!!

Inclusive growth,inclusive economy हे आज राजकारण व अर्थकारण यात परवलीचे शब्द झाले आहेत पण पन्नास वर्षांपूर्वी सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचे  सर्वांगीण जीवनमान उंचावणे, त्याला स्वतःच्या  पायावर उभं रहायची संधी मिळवुन देवून त्याच्या कष्टाचं मोल मिळवुन देण्यात जीथं सहकार रूजला तिथं काही प्रमाणात का होईना यश मिळालं. महाराष्ट्रात ज्यांनी हे सहकाराच्या माध्यमातून साध्य केलं त्यात मा.तात्यासाहेब कोरेंचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल…!!

भिडू शरद पाटील 

1 Comment
  1. JADHAV SUCHINT EKNATH . says

    Love all your posts! Amazing website! incredible information!
    P.S. : RMB click is not always to copy. I use to open the link in new tab.

Leave A Reply

Your email address will not be published.