खां साहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या शहनाईचं काय झालं…?

‘शहनाई’ आणि कमारुद्दिन खान अर्थात ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां’ साहेब या दोन गोष्टी एकमेकांशी इतक्या एकरूप झाल्यात की जेव्हा कधी खां साहेबांचा उल्लेख येतो त्या प्रत्येक वेळी आपल्याला त्यांच्या शहनाईचे सूर आठवतात आणि जेव्हा कधी ‘शहनाई’ या वाद्यप्रकाराविषयी लिहायचं-बोलायचं असतं तेव्हा ते प्रकरण खां साहेबांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण नाही होऊ शकत.

शहनाईच्या सुरांनी कमारुद्दिन खान यांना ‘उस्ताद बिस्मिल्लाह खां साहेब’ बनवलं तर खां साहेबांनी शहनाईला जागतिक ओळख मिळवून दिली. भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांना शहनाईची ओळख झाली तीच मुळी खां साहेबांमुळे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास सर्वच महत्वाच्या देशांमध्ये खां साहेबांचे कार्यक्रम झाले आणि भारतातली शहनाई जागतिक बनली.

केवळ एखाद्या शुभमुहूर्ताच्या प्रसंगी  वाजवल्या जाणाऱ्या वाद्याच्या परंपरेतून शहनाईची मुक्ती करून तिला शास्त्रीय संगीताच्या मेहफिलींमध्ये स्थान मिळवून देण्याचं श्रेय निर्विवादपणे खां साहेबांचंच !

ustad bismillah khan

२१ मार्च १९१६ रोजी बिहारमधील डूमराव येथे जन्मलेल्या खां साहेबांनी वयाच्या सहाव्या वर्षापासूनच आपले काका अली बक्श यांच्याकडून शहनाई वादनाचं प्रशिक्षण घेतलं होतं. शहनाई वादन हे खां साहेबांसाठी प्रार्थनेसमान होतं. विद्येची देवता समजल्या जाणाऱ्या सरस्वती मातेचे खां साहेब भक्त होते.

माता सरस्वतीप्रती आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठीच ते सरस्वती मातेच्या मंदिरात आणि गंगाघाटावर जाऊन बसत आणि शहनाईवादन करत असतं. त्यामुळेच खां साहेब हे ‘गंगा-जमनी तहजीब’ मधलं सर्वात महत्वाचं नांव ठरलं.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्यावेळी भारत ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य झाला त्यावेळी लाल किल्ल्यावरून झालेल्या स्वातंत्र्याच्या उत्साहाला खां साहेबांच्या शहनाईच्या सुरांनी पुनीत केलं होतं. पंतप्रधान जवाहर नेहरूंच्या भाषणानंतर खां साहेबांच्या शहनाईच्या सुरांनी देशवासियांना मंत्रमुग्ध केलं होतं.

खां साहेबांचं आपल्या शहनाईवर अपार प्रेम होतं. ते कधीच शहनाईकडे फक्त एक वाद्य म्हणून बघत नसत तर शहनाई त्यांना आपली सखी, प्रियतमा वाटत असे. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तर खां  साहेबांनी शहनाईलाच आपली ‘बेगम’ अर्थात पत्नी मानलं होतं. रोज रात्री झोपताना ते सोबत शहनाई घेऊनच झोपत असत. पत्नीच्या मृत्युनंतर याच ‘बेगम’ने त्यांच्या आयुष्यात ‘रोमान्स’ भरला होता.

खां साहेबांचं आपल्या शहनाईप्रतीचं जे प्रेम होतं, जी श्रद्धा आणि  निष्ठा होती ती लक्षात घेऊनच २१ ऑगस्ट २००६ रोजी ज्यावेळी खां साहेबांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीरासोबत त्यांची शहनाई सुद्धा दफन करण्यात आली. हे एकप्रकारे शहनाईप्रती व्यक्त करण्यात आलेलं ऋण होतं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.