सचिन,सौरव,राहूल आऊट झाले की मॅच संपायची अशा काळात ‘वाघ’ आला होता.

‘मुलतानचा सुलतान’ आणि ‘नजफगडचा नवाब’ अशी ओळख मिरवणाऱ्या त्याच्याबद्दलची एक दंतकथा काही वर्षांपूर्वी फेमस झाली होती. अनेकजण अजून देखील त्याच्याबद्दल बोलताना त्या किस्स्याचा उल्लेख कधीतरी करतातच.

किस्सा असा की कौंटी क्रिकेटमध्ये खेळताना एकदा त्याला आणि जेरमी स्नेप या त्याच्या पार्टनरला अब्दुल रज्जाकचा ‘रिव्हर्स स्विंग’ खेळता येत नव्हता. त्यामुळे परेशान झाल्याने जुना बॉल बदलून नवीन बॉल घेता यावा आणि ‘रिव्हर्स स्विंग’ पासून बचाव व्हावा यासाठी त्याने अब्दुल रज्जाकला थेट ग्राउंडच्या बाहेर फेकलं होतं. त्यामुळे अम्पायारला नवीन बॉल घ्यावा लागला होता.

अर्थात ही एक दंतकथाच होती. त्यात फारसं तथ्य नव्हतं. पण हा किस्सा त्याच्या एकूण क्रिकेटच्या शैलीला साजेसा असाच होता, हे मात्र नाकारता येत नाही.

 तंत्रशुद्ध फलंदाजी, ठराविक टेक्निक वगैरे गोष्टींवर त्याचा कधीच विश्वास नव्हताच.

लहानपणी सायकल चालवताना त्याने शेवटचे लयीत पाय हलवले होते असं वाटावं इतकं अप्रतिम त्याचं फूटवर्क होतं. अमुक परिस्थितीत तमुकरीत्या खेळल्यास बॅटिंग सोपी जाते एवढंच त्याला कळायचं आणि असं करून मग समोरचे बॉलर्स लवकर फ्रस्ट्रेट होतात हे ही पाहायला त्याला आवडायचं.

सचिन-सौरव ही जगातली बेस्ट ओपनिंग जोडी धुमाकूळ घालत असताना ओपनर म्हणून स्वत:चं  स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं.

टेस्ट असो किंवा वन डे.. सचिन, सौरव, राहुल या तिघांपैकी एक तरी खेळतोच अशी आपल्या टॉप थ्रीची ख्याती सर्वदूर पसरली होती, त्यात हा अजून एक आला आणि आपली बॅटिंग अजूनच भक्कम झाली.

वीरेंद्र सेहवाग. खरंच वाघासारखाच खेळायचा तो.

वाघ आपली शिकार कमजोर आहे की ताकदवान आहे हे बघत नाहीच, तो फक्त हल्ला करून फडशा पाडतो. सेहवागही तेच करायचा. समोर बॉलर कुणीही असो, पीच कोणतही असो, आपली बॅटिंग पहिली असो की दुसरी. असं तसं जिंकायचं तर समोरच्या टीमवर दबाव टाकायचाच आहे त्यासाठी धुलाई तर करायची आहेच ना, मग पहिल्याच बॉलपासून का करू नये, असे महान विचार असल्याशिवाय माणूस २०११ सालच्या वर्ल्ड कपला जवळपास प्रत्येक मॅचला (सलग पाच मॅचेस) पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चौकार मारत नाही किंवा न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टीम साउदीला सलग तीन सिक्स मारून करत नाही.

२००७ सालच्या वर्ल्ड कपला बांगलादेशने आपल्याला हरवून रडवलं होतं. २०११ साली पुन्हा हीच टीम पहिल्याच मॅचला समोर. टीम मीटिंग सिरियसली सुरु असताना हा माणूस कानात गाणी ऐकत बसतो आणि गॅरी कर्स्टनकाका ओरडल्यावर म्हणाला होता,

‘बांगलादेशला काय घाबरायचंय..? आपण स्ट्रॅटेजी वगैरे आखावी एवढ्या लायकीची टीम तरी आहे का ती..? नुसतं जायचं आणि तुडवून यायचं. झालं..!’

साधारण असंच तो प्रेसमध्येही बोलला, ‘बांगलादेश ही एक अतिसामान्य टीम आहे’. अर्थात हे त्यालाच शोभतं, कारण या मॅचमध्ये आपण काढलेल्या ३७० रन्समधले जवळपास निम्मे म्हणजेच १७५ रन्स त्याचे एकट्याचेच होते. मॅन ऑफ द मॅच.

सेहवाग असाच बेदरकार, फुल केअरलेस अॅटीट्यूड पांघरून मैदानावर उतरणारा, पण बहुतेकदा आपला हा अॅटीट्यूड खराही करून दाखवणारा.. की ‘या फालतू टीमला काय घाबरायचं, त्या बॉलरला काय एवढं महत्त्व द्यायचं.. म्हणत होतो ना’.. आणि मग कोच, कॅप्टन, इतर खेळाडू कुणीच काही बोलू शकायचे नाहीत.  कोच जॉन राईटनीही सांगितलं होत,

“सेहवागला त्याच्या पद्धतीने खेळू द्यावं, त्याला शिकवत बसण्यात काही अर्थ नाही.”

हॅन्ड-आय को ऑर्डिनेशनचा वीरू हा आधुनिक क्रिकेटमधील बादशाह होता.

सचिनबद्दलही वाचलं होतं की त्याची डाव्या डोळ्याची नजर तेज आहे, त्यामुळे  बॉलरच्या दिशेने पाहत असताना त्याला चेंडूचा अंदाज लवकर घेता यायचा. हेच काहीशा फरकाने ब्रायन लाराच्या बाबतीत जाणवायचं. त्याची बॅटिंग बघताना वाटायचं की कोणत्याही बॉलवर याच्याकडे तीन शॉट्स तयार आहेत आणि अति लेट खेळायच्या सवयीमुळे (पुढे ही शैली जयवर्धनेनेही शिकून घेतली) तो ऐनवेळी त्यातला हवा तो शॉट निवडून खेळू शकायचा. सतत शफल केल्याने बॉलर आणि फिल्डर्सनाही कळायचं नाही. पण ‘क्रिकेट हा माईंड गेम आहे’ असं जे सचिन नेहमी म्हणत आला तेही सेहवागने जपलं.

कसोटीत जिथे गावसकर, तेंडुलकर, द्रविड याना त्रिशतक ठोकणं जमलं नव्हतं, तिथे हा पट्ठ्या दोन त्रिशतके नावावर करून बसलाय. मानसिक कणखरता, एकाग्रता असल्याशिवाय ते शक्यच नाही. तेही बांगलादेश, झिम्बाब्वेसारख्या आंडूपांडू टीमपुढे नव्हे, तर पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकेच्या बॉलर्सना झोडपून त्यानं हे साध्य केलंय, याचं विशेष कौतुक.

टेस्टमध्ये फास्टेस्ट अडीचशे आणि तीनशेचा विक्रम अजूनही तो आपल्याच नावावर मिरवतोय.

वनडेत दोनशे आणि कसोटीत तीनशे करणारा हा एकटाच होता, आता ख्रिस गेलही जाऊन बसलाय त्याच्या बाकावर.  मॅक्ग्रा, वॉर्न, अक्रम, वकार, अख्तर, मेंडिस, मुरली, वास, पोलॉक, डोनाल्ड सगळेच कधी ना कधी डोकं धरून बसलेत याच्यामुळे. (तसे ते द्रविडमुळेही बसलेत. पण कारण अगदी उलट. ‘अरे कधी हा बॉलला बॅट लावणार. का इतक्या लांबून पळत येत सारखा पोपट करून घेतोय मी स्वत:चा’)

मेंडिसवरून आठवलं.  मिस्ट्री बॉलर म्हणून त्याने  लौकिक मिळवला होता. स्पिन चांगला खेळणाऱ्यानाही त्याने नाचवलं होतं. तेव्हा गॉल टेस्टमध्ये सेहवागने याला धू  धू धुतला, द्विशतक मारलं. पण त्यावेळी ‘मेंडिसच्या सो कॉल्ड अद्भुत स्पिनला खेळताना काही स्ट्रॅटेजी केली होतीस का’ यावर तो पत्रकाराला म्हणाला होता,

‘भाईसाब, स्पिनर को स्पिनर बॅट्समन बनाता है, फिर उसका कॉन्फिडन्स बढता है और वो विकेट लेने लगता है.. मैने उसे स्पिनर बनने ही नही दिया, उससे क्या डरना?”

सेहवागने मेंडीसला धुतलं मग जागतिक क्रिकेटमधील दादा बॅट्समनना पुढे मेंडिसला मारण्याचा फॉर्म्युला सापडला. मिस्ट्री बॉलर हे त्याच्याभोवतीचं सुरक्षा कवच भेदण्याचं श्रेय त्या अर्थाने निर्विवादपणे सेहवागचंच.

निवृत्तीनंतरही त्याने कॉमेंट्री बॉक्स आणि ट्विटरवर आपला बिनधास्तपणा तसाच जपलाय.

  • पराग पुजारी.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.