YSR यांच्या अपघातानंतर अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी कोणती जादू होती त्या माणसात ?

वाय.एस.राजशेखर रेड्डी.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या रेड्डी यांची सामान्य जनतेमध्ये ‘लोकनेता’ अशी ओळख होती. त्यांच्या मृत्यूनंतर आंध्र प्रदेशमधील काँग्रेस साम्राज्याला घरघर लागली ती कायमचीच.

त्यांची जनमानसावर इतकी पकड होती की त्यांच्या अकाली मृत्यूनंतर अनेक जणांचा धक्का बसला आणि त्यातच अनेकांचा मृत्यू झाला. काही जणांनी तर आत्महत्या देखील केली होती. माध्यमांनी केलेली अतिशयोक्ती वगळली तरी त्यांची लोकप्रियता अफाट होती यात कसलीच शंका नव्हती आणि नाही.

रेड्डी स्वतः पेशाने डॉक्टर होते. कॉलेज जीवनापासूनच त्यांची ‘फायर ब्रांड नेता’ म्हणून ओळख निर्माण झाली होती. राजकारणाची कसलीही पार्श्वभूमी नसताना देखील  वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्यांनी आपली पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली देखील.

पुढच्या दोनच वर्षात ते ग्रामविकास मंत्री झाले. त्यांनी आयुष्यात एकही निवडणूक हरली नाही.

आंध्रप्रदेशमध्ये ज्यावेळी फिल्म स्टार एन.टी.रामाराव यांच्या तेलगु देसम पक्षाने  काँग्रेसचा दारूण पराभव केला होता त्यावेळी देखील वाय.एस.आर यांनी आपल्या  पुलीवेन्डला या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. स्वतः इंदिरा गांधीनी या तरुण नेत्याच्या खांद्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली होती. पुढे १९९२ साली  मुख्यमंत्रीपदाची संधी असूनही तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांचा विश्वास संपादन करू न शकल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद हुकले होते.

१९९५ साली एन टी रामाराव यांचे जावई चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री बनले.

त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला कॉर्पोरेट ऑफिसचे स्वरूप दिले. चंद्राबाबुंनी  हैद्राबादला आयटी सिटी बनवायचा चंग बांधला खरा पण या नादात त्यांचे ग्रामीण भागाकडे पुरते दुर्लक्ष झाले. याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.

ysr

वाय.एस.आर यांनी ही परिस्थिती अचूक हेरत  चंद्राबाबुंच्या विरोधात रान उठवले. यानिमित्ताने आंध्रप्रदेशच्या  राजकारणाने  ‘ग्रामीण विरुद्ध शहरी’ अशा चित्राचा अनुभव घेतला आणि अखेरीस २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देत वाय.एस.आर आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर  विराजमान झाले.

सत्तेत येताच पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची  घोषणा त्यांनी केली. दोन रुपयात तांदूळ, ग्रामीण भागात कमी खर्चात घरे, गरिबांना पेन्शन अशा लोकप्रिय योजना त्यांनीच आणल्या. ग्रामीण भाग हा त्यांच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी असे.

केंद्र शासनाची ‘रोजगार हमी योजना’ त्यांनीच आंध्र प्रदेशमध्ये यशस्वी करून दाखवली. आंध्र प्रदेशमध्ये नक्षलवादी चळवळीला पायबंद घालण्याचे श्रेय देखील त्यांचेच.

वाय.एस.आर यांच्या जनतेवरील करिष्म्याचे रहस्य विरोधकांनाच काय तर त्यांच्या स्वपक्षीयांना देखील कधीच  कळाले नाही. त्यांच्यात कायमच दुहेरी व्यक्तिमत्व पहिले गेले. ते जन्माने ख्रिश्चन होते पण तिरुपती बालाजीचे निस्सीम भक्त देखील होते.

जनतेची नस त्यांनी अचूक पकडली होती. राज्यातच काय तर केंद्रातल्या पक्षश्रेष्टींना देखील वाय.एस.आर यांचे आंध्र प्रदेशमधले वर्चस्व मान्य करावे लागले होते. २००९ साली त्यांनी सलग दुसऱ्या वेळी  आंध्र प्रदेशची विधानसभा खेचून आणली. २ सप्टेंबर २००९ रोजी सकाळी मुख्यमंत्री म्हणून ते राज्याच्या दौऱ्यावर  निघाले होते.

सोबत राज्याचे मुख्य सचिव सुद्धा होते. ‘बेगमपेट’ विमानतळावरून त्यांच्या हेलीकॉप्टरने उड्डाण घेतले, मात्र थोड्याच वेळात खराब वातावरणामुळे त्यांच्या हेलीकॉप्टरचा कंट्रोल रूमशी असलेला संपर्क तुटला. ‘नाल्लामला’ डोंगर रांगांमधील दुर्गम जंगलात त्यांचे हेलीकॉप्टर गायब झाले. 

हा परिसर नक्षलवाद्यांचा कोअर भाग असल्यामुळे शोध मोहिमेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. शोध मोहिमेसाठी वायुदलाच्या सुखोई विमानाची मदत घेण्यात आली. अखेरीस २४ तासांच्या शोधानंतर वाय.एस.आर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मृतदेह सापडले. आंध्र प्रदेशचे खऱ्या अर्थाने कधीही न भरून येणारे नुकसान त्या दिवशी झाले. आंध्र प्रदेशने त्या दिवशी सिंहासारखा आक्रमक सुपुत्र गमावला.

1 Comment
  1. Rahul Kadam says

    good

Leave A Reply

Your email address will not be published.