90sच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या गोष्टी आजही मार्केटमध्ये जिवंत आहेत…
आजची जनरेशन म्हणजे Gen-Z ज्यांचं बालपण हे स्मार्टफोनपाशी सुरु होतं आणि तिथेच संपतं अशी तक्रार प्रत्येक 90s मध्ये जन्माला आलेल्यांची असते. 90s मध्ये जन्मलेले नेहमीच आपलं बालपण केवढं बाप होतं असं सांगताना दिसत असतात. लगोरी, कबड्डी, लपाछपी, पैसे पाणी, पकडा पकडी असे मैदानात खेळलेले खेळ, अगदी आईची हाक ऐकू येईपर्यंत रंगलेले क्रिकेटचे डाव, तासंतास केलेला कल्ला आजही आठवणीत तसाच जपून आहे.
90s मध्ये जन्मलेल्या मुलामुलींची करमणुकीची साधनं सुद्धा वेगळीच होती.
पुस्तकं, कॉमिक्सपासून टाईमपास करायला बऱ्याच गोष्टी उपलब्ध होत्या. आजच्या काळातल्या मुलांना ही मजा कळायची नाही हे खरंय. पण 90s मध्ये जन्माला आलेल्यांचं मनही आठवणींच्या पुढं काही सरकत नाही. त्या काळाचा फील घ्यायचा असला तर त्यातल्या कित्येक क्लासिक गोष्टी आजही उपलब्ध आहेत.
१. राज कॉमिक्स
कॉमिक्स हा 90s मधल्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. उन्हाळाच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कॉमिक्स वाचत निवांत पडून राहणं हा एकमेव उद्योग असायचा. ९० च्या दशकात काही टीव्ही नव्हते ना स्मार्टफोन होते त्यामुळे मनोरंजनाचं साधन असायचं कॉमिक्स.
चंपक, चांदोबा, टिंकल, चाचा चौधरी याचसोबत अजून एक कॉमिक होतं ज्याने 90s च्या पोरापोरींचं मन जिंकलं होतं ते म्हणजे राज कॉमिक्स.
आजच्या काळात कॉमिक्स दुर्मिळ झाले असताना राज कॉमिक्स चक्क ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. राज कॉमिक्सने फॅन्सना नागराज, सुपर कमांडो ध्रुव, डोगा, परमाणू, शक्ती, भेडिया, भोकाल अशी पात्र दिली. त्यावेळी कॉमिक्सची नावं आणि कथा एकदम हिट असायची.
१९८६ साली राजकुमार गुप्ता यांनी हे कॉमिक सुरु केलं आणि त्यानंतर त्यांची मुलं संजय, मनीष आणि मनोज यांनी ही जबाबदारी सांभाळली. 90s च्या काळातले आठवणीत असलेले हे कॉमिक्स केवळ ७९५ रुपयात ऍमेझॉनवर उपलब्ध आहेत.
२. ऑरेंज लिम्लेटच्या गोळ्या
शाळेची सहल जाताना हल्लीची पोरं काय काय फॅन्सी बिस्किटं, चॉकलेटं आणि खाऊ नेत असतात पण हे कितीही भारी असलं तरी 90s मध्ये मिळणाऱ्या या लिम्लेटच्या गोळीला तोड नाहीये. तेव्हा एका रुपयात १० लिम्लेटच्या गोळ्या मिळायच्या आणि त्या खाऊन केशरी रंगात रंगलेली जीभ दाखवत तुमच्यातल्या अनेकांनी मित्र मैत्रिणींना नक्कीच चिडवलं असेल.
लिम्लेटच्या गोळ्या येतात दोन रंगात एक केशरी एक पिवळी. आणि नेमकी कोणती गोळी यावरून शाळेत हमखास भांडणं झाली असणारेत. आता लई रंगीत संगीत चॉकलेटं आली आणि आपली साधी गोड लिम्लेटची गोळी दिसेनासी झाली. सध्याच्या काळात लिम्लेटची गोळी मिस करणाऱ्यांना आता ऑनलाईन ही गोळी मागवता येणं शक्य होणार आहे.
ऑनलाईन वेबसाईटवर अगदी २५० रुपयांच्या आतमध्ये लिम्लेटच्या गोळ्या विकत मिळत आहेत, तसं कुठल्याही दुकानात गेलं तर ५-१० रुपयालाही मिळून जातील. पण ऑनलाईनचा नाद असेल तर विचार करा.
३. मालगुडी ऍडव्हेंचर
सुप्रसिद्ध लेखक आर. के नारायण यांनी अनेकांचं लहानपण ज्या कथांनी उजळून टाकलं ती गोष्टींची सिरीज म्हणजे मालगुडी स्कुलडेज. मालगुडी डेज ही मालिका 90s च्या कुठल्याही व्यक्तीला माहित असेलच. ती मालिका असेल किंवा त्यांची पुस्तकं असतील सगळ्याच गोष्टी आज नॉस्टॅलजिक करणाऱ्या आहेत.
मालगुडी स्कुलडेज या पुस्तकानंतर आर. के नारायण यांनी मालगुडी ऍडव्हेंचर नावाचं पुस्तक लिहिलं जे सुद्धा प्रचंड गाजलं. आजच्या काळात जर तुम्हाला परत लहानपणीच्या आठवणींत रमायचं असेल तर हे पुस्तक फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवर उपलब्ध आहे.
४. विंटेज क्लॉक
लहानपणी पाहिलेल्या अनेक गोष्टींमध्ये एक खास गोष्ट होती घड्याळ. घड्याळाचा विंटेज फील, ते प्रत्येक तासाला वाजणारे टोले, काही ठराविक वेळेला छोट्या दारातून बाहेर येणारी चिमणी अशी घड्याळं सध्या बाजारात उपलब्ध तर आहेत का असा प्रश्न आहे.
हां! आता कोणी जर प्रत्येक चोर बाजार, जुना बाजार धुंडाळून काढायचं ठरवलं तर एखादं घडयाळ मिळून जाईलही पण ते चांगल्या स्थितीत असेलच याची शाश्वती नाही. पण ऑनलाईन वेबसाईटवर मात्र हे घडयाळ अगदी आरामात मिळून जाईल.
अगदी ६०० रुपयांपासून सुरु होणारी ही विंटेज घड्याळं घराची शोभा एका झटक्यात वाढवू शकतात.
५. फ्रायम्स
शाळेच्या बाहेर मिळणारे पोंगा पंडित आणि रंगीबेरंगी कुडुम कुडुम आवाज असलेले हे फ्रायम्स आठवतात का? शाळेच्या मधल्यासुट्टीत चिंचा, बोरं, दाणे आणि फ्रायम्स विकणारे दुकानदार आवारात गर्दी करून उभे असलेले हमखास दिसायचे.
पाच बोटांत पाच पोंगा पंडित लावून तुम्ही सुद्धा नक्कीच आनंद लुटला असणारे हे नक्की आहे पण हेच फ्रायम्स आत्ताच्या काळात सुद्धा विकत मिळाले तर? जर तर कशाला हे फ्रायम्स ऍमेझॉनवर स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
६. विंटेज पोस्टर
90s च्या दशकात तरुण वयात आलेल्या मुलामुलींनी कलाकारांचे फोटो घराच्या भिंतीवर लावले नसतील तरच नवल. शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन हे आणि असे असंख्य कलाकार आणि त्यांचे जबरा फॅन. 90s च्या काळात अशा बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांचे वर्तमानपत्रात आलेले फोटो आणि पोस्टर लावायची क्रेझ होती.
आपल्यातल्या अनेकांच्या घरात भिंती, कपाटं या पोस्टरनी भरलेला असणार आहेत. तुम्हाला जर पुन्हा ही पोस्टर हवी असतील तर ऑनलाईन बरेच पर्याय उपलब्ध आहेत. अगदी इंस्टाग्रामवर सुद्धा अनेक स्मॉल बिजनेस आहेत जे तुम्हाला सिनेमांचे पोस्टर सुबक आणि सुंदर फ्रेम बनवून देत असतात. त्यामुळं जुनं काही हरवलं असेल, तर ते या पोस्टरमधून शंभर टक्के सापडू शकतं.
८. ब्रिक गेम
एक उभा फोन ज्यावर असलेले खेळ खेळण्यात 90s च्या काळातल्या मुलामुलींचं आयुष्य गेलं तो गेम म्हणजे ब्रिक गेम. यामध्ये रिमोट कंट्रोलसारखी बटणं असायची, आणि एक स्क्रीन असायची ज्यामध्ये स्नेक, टॅंक, कर रेसिंग, ब्रिक ब्रेकर, टेट्रिस सारखे एकदम सोपे, बेसिक खेळ असायचे. खरंतर हे गॅजेट ८० च्या दशकातलं पण याची क्रेझ ९० च्या दशकात जास्त होती.
त्यावेळी हा खेळ घरात असावा अशी इच्छा प्रत्येक लहान मुलाची होती आणि त्या आठवणी पुन्हा अनुभवायच्या असतील तर त्या काळात असणाऱ्या किमतीपेक्षा अगदी स्वस्तात हा खेळ ऍमेझॉनवर उपलब्ध आहे.
हे ही वाच भिडू:
- पबजीच्याही आधी दोन पिढ्यांची मेहबूबा GTA Vice City होती…
- तेव्हा फुल कॉन्फिडन्स होता, या गेमच्या जीवावर आमच्या भावकीनं रशियापर्यंत रान हाणलं असतं
- आज बुडाखाली सुपरबाईक आली असली, तरी गाड्या पळवण्यातलं खरं सुख ‘रोडरॅश’मध्ये होतं