महाराष्ट्रातील ही ५ शहरं नामांतराच्या राजकारणात अडकलेली आहेत…
राज्याच्या राजकारणात अहमदनगरचं अहिल्यानगर करावं अशी चर्चा तापू लागली. त्याला कारणही तसच होतं. आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अहमदनगरचं “अहिल्यानगर” करण्यात यावं अशी मागणी केली.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादचं संभाजीनगर अजून का झालं नाही? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी आपण औरंगाबादचं संभाजीनगर करावं, अशी मागणी मोदींकडे करणार आहोत असं जाहीर केलं होतं. तर उद्धव ठाकरेंनी मी म्हणतोय ना संभाजीनगर तर मग संभाजीनगरच असं प्रत्युउत्तर दिलं होतं..
थोडक्यात काय तर राज्याच्या राजकारणात नामांतराचा विषय पुन्हा गाजत आहे. पण औरंगाबाद किंवा अहमदनगर या दोन शहरांपूरताच हा वाद नाही. महाराष्ट्रातल्या इतरही शहरांची नावे नामांतराच्या रांगेत आहेत.
कोणती शहरं आहेत ती? आणि नामांतराच्या मागणीमागे कारण काय?
सुरवात नामांतराच्या राजकारणात टॉपवर असलेल्या शहरापासून…
१) औरंगाबाद
मराठवाड्यातील औरंगाबाद शहराचं नाव ‘संभाजीनगर’ असं करण्यात यावं ही शिवसेनेची बऱ्याच वर्षांची मागणी आहे. १९८८ औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर विजयाची सभा घेतली.
त्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर करून शहराचं नाव ‘संभाजीनगर’ असेल, अशी घोषणा केली होती आणि तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा केला जातो.
तेव्हा राज्यात कॉंग्रेसचं सरकार असल्यामुळे सरकार दरबारी हे नामकरण झालं नाही. त्यानंतर २००५, २०१० आणि २०१५ च्या महापालिका निवडणुकीत नामकरणाचा हा मुद्दा पुन्हा आणला गेला. पण त्यावर ठोस निर्णय झाला नाही.
२०१५ मध्ये संतसाहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर दारा शिकोह करावं अस मत मांडल होतं. तर जेष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगाबादच नाव बदलण्यापेक्षा तिथे पाणी द्या अस प्रत्युउत्तर या चर्चांना दिलं होतं.
राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आलं. त्यानंतर औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. जानेवारी २०२१ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत असताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला. याला प्रत्युउत्तर देत कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला किमान समान कार्यक्रमाची आठवण करुन दिली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात सातत्याने औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा चर्चेत येतच असतो. मात्र मुद्दा आजही भिजतच पडला आहे..
२) औरंगाबादनंतर नाव येतं ते ‘पुणे’ शहराचं…
२०२१ मध्ये जेव्हा औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी होत होत्या त्याचवेळी पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आली होती. पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव देऊन या शहराचं नामांतर ‘जिजापूर’ करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.
पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. पुणे शहर हे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून याचं नामांतर व्हावं, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले होते.
यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर औरंगाबाद ऐवजी पुणे जिल्ह्याचं नाव ‘संभाजीनगर’ करा, अशी मागणी केली होती.
३) पुण्यानंतर नंबर लागतो तो ‘उस्मानाबाद’चा…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा ‘धाराशीव’ असा उल्लेख केला गेला होता. त्यानंतर उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता.
२५ मे १९९५ रोजी उस्मानाबादच्या नामांतराची पहिली घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुण्यात पत्रकारांसमोर केली होती. औरंगाबाद इथल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झालं. तसंच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तुळजापूर इथे झालेल्या सेनेच्या महिला मेळाव्यात या नामांतराची घोषणा केलेली होती.
१९९९ साली शिवसेना-भाजप युती असलेल्या कालावधीत उस्मानाबादचं नाव बदलून ते धाराशिव करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र हे प्रकरण न्यायालयात टिकलं नाही. तेव्हापासून उस्मानाबादचं नाव बदलण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.
गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांनी परत उस्मानाबादचा धाराशिव असा उल्लेख करून हा वाद तापवला होता. मात्र नंतर तो विरून गेल्याचं दिसलं.
४) त्यानंतर नंबर लागतो तो इस्लामपूर या शहराचा..
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करावं, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेने केली होती. याप्रकरणी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदनही दिलं होतं.
इस्लामपूरचे ईश्वरपूर करावे ही मागणी फार जूनी आहे. १९७३-७४ च्या दशकात तत्कालीन नगरसेवक पंत-सबनीस यांनी सगळ्यात पहिले शहराचे ईश्वरपूर असं नामकरण व्हावं, अशी मागणी केली होती. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ईश्र्वरपूर नावाचे फलकही शहरात लावले होते. त्यानंतर १९८३ साली इथल्या यल्लाम्मा चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची जाहीर सभा झाली होती. तेव्हा त्यांनी इस्लामपूर ऐवजी ईश्वरपूर असं शहराचं नाव व्हावं, असं जाहीर केलं होतं. त्यावेळेपासून हा नामांतराचा प्रश्न चर्चेत आहे.
५) या चार शहरांनंतर आता नंबर लागतो तो ‘अहमदनगर’चा…
अहमदनगरचं नाव ‘अहिल्यानगर’ करावं अशी मागणी आता आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. मात्र त्यांनी केलेली मागणी हि काही पहिली मागणी नाही. २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अहमदनगरचे अहिल्यादेवीनगर करावे अशी मागणी केली होती.
२०२१ सालच्याच जानेवारी महिन्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अहमदनगरचे अंबिकानगर करावे अशी मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अहमदनगरचे अंबिकानगर करावे ही मागणी मनसे मार्फत देखील करण्यात आली होती.
अहमदनगरच्या नामांतरचा मुद्दा १९९७ साली अहमदनगर येथे झालेल्या साहित्य संमेलनात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आल्याचं सांगितलं जातं. तेव्हा देखील या शहराचं नाव अंबिकानगर करावे अशी मागणी करण्यात आली होती.
एकंदरीत महाराष्ट्राच्या बाकी शहरांच्या नामांतराच्या मागणीचा इतिहास बघता अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीचं काय होईल? हा प्रश्न पडतोय. आताच कुठे मुद्दा उपस्थित झालाय अजून यावर बऱ्याच गोष्टी घडतील, असंही दिसतंय.
मात्र तुम्हाला शहरांच्या नामांतराबाबत काय वाटतं? अशा प्रकारे शहरांची नावे बदलण्यावर तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा..
हे ही वाच भिडू :
- संभाजीनगरच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं कसा यु-टर्न घेतला ?
- नेते पैसे खाऊन तळ्याच नामांतर रोखत होते. अत्रेंनी अख्ख्या भागाचं नाव शिवाजीनगर केलं
- औरंगाबादचा इतिहास आहे, ज्यांनी या गावावर विजय मिळवला त्यांनी तिथलं नाव बदललं.