दर्ग्याच्या दारात गाणाऱ्या बंजारा मुलीनं जगाला “लंबी जुदाई” दिली.

टॅलेंट कधी तुमचा पैसा, धर्म, जात, भाषा , देश यासोबत येत नाही. तो एक चमत्कार असतो आणि तो कोणावर कधी कुठे प्रसन्न होईल ते ठाऊक नसते. काही दिवसांपूर्वीचं पश्चिम बंगालच्या स्टेशनवर लता मंगेशकरांची गाणी गाणाऱ्या आजीबाई राणू मंडल यांचा हिमेश रेशमियाच्या सिनेमात गाणी गाण्यापर्यन्तचा प्रवास आपल्या डोळ्यादेखत घडून गेला. एका रस्तावर जगणाऱ्या आजीबाईचं आयुष्य त्यांच्या टॅलेंटमूळ बदलून गेलं.

असे नशीबवान या जगात फारच थोडे आहेत यामध्ये सर्वात वर नाव येते गायिका रेश्मा यांचं.

आपल्या भिडू जॅकी श्रॉफचा हिरो सिनेमा आठवतोय? हा तोच ज्यात तो बासरी वाजवत असतोय तो. यातली सगळीच गाणी भारी आहेत पण एक गाण कोणीच विसरू शकत नाही,

“बिछड़े अभी तो हम बस कल परसों जिऊंगी मैं कैसे इस हाल में बरसों

मौत ना आई तेरी याद क्यों आई हाय लम्बी जुदाई

चार दिनों का प्यार हो रब्बा बड़ी लम्बी जुदाई, लम्बी जुदाई”

खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्याशेजारी उभी असलेली मीनाक्षी शेषाद्री आणि तिथेच एका दगडामागे हे गाण गात असलेली एक बंजारण. कधीच डोळ्यासमोरून न हलणार हे दृश्य. कोणतेही कृत्रिम संस्कार नसलेला शुद्ध आणि प्रामाणिक आवाज काळजाला चरे पाडत जातो. तो आवाज होता रेश्माचा.

रेश्माचा जन्म राजस्थानमधल्या लोहा या गावी एका बंजारा कुटुंबात झाला. वाळवंटात उंटावर आपल सामान लादून भटकत असणारं हे गरीब कुटुंब. रेश्माचा जन्म झाला आणि त्याच वर्षी देश स्वतंत्र झाला. पण त्याबरोबर फाळणीदेखील झाली. एका फटक्यात देश तिथे राहणारे लोक दोन हिस्स्यात वाटले गेले. रेश्माच्या कुटुंबाला देखील भारत सोडावा लागला, ते कसेबसे मजल दरमजल करत जीव वाचवत पाकिस्तानमधल्या कराचीला येऊन पोहचले.

तिथे आले खरे पण काम काय करणार? 

अगदी रस्त्यावर आलेलं हे कुटुंब. रेश्माला गाण्याची आवड होती.   शास्त्रीय संगीत वगैरे दूर तिला शाळेत घालण्याएवढे देखील पैसे घरच्यांजवळ नव्हते. मोठी होत होती. गरिबीने तिला गाण शिकवलं. अर्धवट पोटी भटकताना तिला सूर गवसले. आणि म्हणूनच तिच्या आवाजात दर्द उतरला. वेगवेगळ्या दर्ग्याच्या दाराशी ती गाणी गायची,

एकदा सिंध मधल्या सुप्रसिध्द लाल शाहबाझ कलंदर दर्ग्यामध्ये गात असताना तिला सलीम गिलानी नावाच्या एका रेडीओ साठी गाणी बनवणाऱ्या प्रोड्युसरनी पाहिलं. चाकू सारखा धारदार आवाज ऐकून त्याने पाकिस्तान रेडियोपर्यंत तिची तारीफ पोहचवली.  रेश्माला रेडियो साठी गाण गाण्यासाठी बोलवण आलं. तेव्हा ती फक्त बारा वर्षाची होती. रेडियोवर तिने बाबा शाहबाझ कलंदरचंचं गाण गायलं.

“दमादम मस्त कलंदर”

जे आजही कोणी विसरू शकत नाही. सुफी संगीत गाणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाला या गाण्याने एक वेगळीच अनुभूती दिली आहे. या गाण्यानंतर रेश्माच नाव पाकिस्तानातल्या घराघरात गेलं. पण रेश्मा कुठ होती? ती वाळवंटातल्या वाळू प्रमाणे कधीच हातातून सुटून गायब झाली होती. गिलानीसाहेबांनी जंगजंग पछाडल आणि तिला शोधून काढलं. रेश्मा पाकिस्तानात सुपरस्टार झाली होती.

तिच्या गाण्याची रेकोर्डिंग बनू लागली. फक्त पाकिस्तानचं नाही तर भारतातूनही तिला गाण्यासाठी बोलवण येऊ लागल.

सत्तरच्या दशकात राज कपूर बॉबी बनवत होते तेव्हा त्यांनी रेश्माचं एक गाण अखीयोंके रेहने दे अखियो के आस पास हे हिंदीत अनुवादित करून लता मंगेशकर यांना गायला दिल. जगातला सर्वोत्तम आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लताबाई बन्जारण रेश्माच गाण गाणार हा एकार्थे तिच्यासाठी सन्मानचं होता. खास तिच्यासाठी भारतात पाकिस्तानी कलाकारांवर असलेली गाण्याची बंदी उठवण्यात आली,

पुढे ऐंशीच्या दशकात सुभाष घईनी हिरो सिनेमा बनवला. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी रेश्माला लंबी जुदाई गाण्याची संधी दिली. हे गाण प्रचंड सुपरहिट झालं. त्याची प्रसिद्धी इंदिरा गांधी यांच्या पर्यंत पोहचली. त्यांनी रेश्माला भेटायला बोलावलं आणि दोन्ही देशांच्या भाईचारयाच तिला प्रतिक मानलं.

तसही रेशमाचा आवाज कोणत्याही सीमारेषेला मानणारा नव्हता. आयुष्यभर तिला कधी पैसे मिळवणे जमले नाही. अक्षर अडाणी असल्यामुळे कधी राजकारण तिला कळलच नाही. प्रामाणिकपणे समोर जे येतंय ते गायचं एवढचं तिला ठाऊक होतं. तिच्या आवाजाचे आशिक दोन्ही देशात होते. ती शेवटपर्यंत म्हणायची,

“इंडियाने मुझे जनम दिया है और पाकिस्तान ने मुझे दुध पिलाया है. मै किसी एक की नही. दोनो मुल्क मेरे दो आंखे है”

जेव्हा लाहोर-अमृतसर अशा दोन देशातल्या बस प्रवासाला सुरवात झाली तेव्हा उद्घाटनाच्या वेळी पाकिस्तानी ऑफिसर्स सोबत त्या बसमध्ये रेश्मा आणि तीचे कुटुंबीय होते. दोन्ही देश एक होतील ही तिची वेडी आशा कधीच पूर्ण झाली नाही.

भारतीय सिनेमामध्ये देखील तिने कित्येक गाणी गायली. मात्र स्वतःचं मार्केटिंग करायचं असत हे माहित नसल्यामुळे सिनेमाच्या चमचमत्या दुनियेमध्ये देखील सलवार कमीज, डोक्यावर दुपट्टा अशी साधी भोळी राहिली. तिचा आवाज तसेच काळानुरूप बदलत गेलेल्या गायकीच्या स्पीडशी स्पर्धा न करता आल्यामुळे ती मागेदेखील पडत गेली.

आयुष्याच्या उत्तरार्धात गळ्याच्या कॅन्सरने तिला घेरलं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एका हॉस्पिटलमध्ये तिला अॅॅॅडमिट करण्यात आलं. तिच्या गाण्याचे फॅन असणाऱ्या पाकिस्तानचे भूतपूर्व लष्करप्रमुख हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांनी तिला १० लाखांची मदत केली. शिवाय सरकारने तिला दर महिना दहा हजाराचे पेन्शन मंजूर केली.

३ नोव्हेंबर २०१३ रोजी तिचा मृत्यू झाला. कुठलाही राग ठाऊक नसलेली, देशाचा पत्ता नसलेली निर्वासित भटकी बंजारन गायिका आपल्या शेवटच्या प्रवासाला निघून गेली.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Dhanaji jadhav Phutane says

    Amazing info, love u bhidu

Leave A Reply

Your email address will not be published.