कृष्णेच्या ऊसपट्ट्यात वसलंय बासमती तांदळाचं गाव : रेठरे बुद्रुक

संथ वाहणारी कृष्णा नदी म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायनी. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये उगम पावून सांगली कोल्हापूरची शेती समृद्ध करत ती कर्नाटकात निघून जाते.

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर तेव्हाच्या नेत्यांनी अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले, यात सहकारी चळवळ ही महत्वाची ठरली. कृष्णा काठच्या सुपीक जमिनीत अनेक साखर कारखाने उभे राहिले. ऊसशेतीने या भागातल्या शेतकऱ्यांच तोंड गोड केलं. चार सुखाचे दिवस दाखवले.

यामुळेच या भागाला साखरपट्टा किंवा ऊस पट्टा म्हटल जात.

मात्र याच साखर पट्ट्यात कृष्णा काठी एक गाव अस आहे ज्यांनी ऊस सोडून बासमती तांदूळ लावण्याचा प्रयोग केला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले.

रेठरे बुद्रुक. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात वसलेलं हे गाव.

सहकारमहर्षी यशवंतराव मोहितेंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली रेठऱ्याला कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारला. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९६१ साली झाला होता. तेव्हा पासून आजतागायत कृष्णा साखर कारखाना या भागातील शेतकऱ्यांचा कणा बनला आहे.

खर तर रेठरे हे प्रगतीशील शेतकऱ्यांच गाव. खुद्द यशवंतराव मोहितेंच घराणं शेतकरी कुटुंबाचं.

या गावात मोटेच पाणी सोडून विहिरीवर पहिली मोटर त्यांनी बसवली म्हणून त्यांना इंजिनवाले मोहिते अस म्हटलं जाई.

शेती हाच इथला प्रमुख व्यवसाय. या गावाला तीन बाजूंनी कृष्णामाईने वेढा घातला आहे. त्यामुळे पाण्याची जराही कमतरता नाही. जवळपास ३ हजार एकर काळी सुपीक जमीन गावात शेती योग्य आहे.

गावातच कारखाना असल्यामुळे रेठऱ्यात प्रत्येक शेतकरी उसलागवड करायचा. बागायती शेतीत रिस्क कमी व परतावा मिळण्याची जास्त शक्यता असल्यामुळे उसकडेच अनेकांचा भर असायचा. स्वातंत्र्यापूर्वी काही देशी वाणाचे भातपिक घेतले जाई पण कृष्णा कारखाना उभा राहिल्यापासून मात्र फक्त गावात नजर जाईल तिथे ऊस पिक दिसू लागला.

साधारण सत्तरच्या दशकात रेठरेचे कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते उत्तराखंड येथील नैनिताल येथे गेले असता त्यांना बासमती तांदळाचे पिक दिसले. जिथे जाईल तिथे शेतीचा विचार हा रेठरेकरांच्या रक्तात भिनलेला गुण.

आबासाहेब मोहितेनी तिकडून येताना बासमती तांदळाचा ३७० वाण आणला व आपल्या शेतात पेरला.

रेठऱ्याच्या मातीत तो रुजू झाला. बासमती तांदळाच्या सुवासाने परिसर भरून गेला. मोहितेंच्या शेतातील बासमती तांदळाचे पिक पाहण्यास आसपासचे शेतकरी येऊ लागले. आबासाहेबांचा प्रयोग यशस्वी ठरला. पुढच्याच वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी हे पिक घेण्यास सुरवात केली.

हळूहळू गावातील ऊस कमी होऊन तिथे बासमती पिकू लागला. आसपासच्या गावातही हे लोण पसरल. रेठरे येथील काही तरूणांनी यात आणखी प्रयोग केले. वडगाव मावळ येथील कृषी विद्यापीठातून इंद्रायणी तांदळाचे बियाणे आणले. बासमतीपेक्षा जास्त उत्पन्न निघत असल्यामुळे याला देखील प्रचंड मागणी निर्माण झाली.

आज इथली बासमती व इद्रायणी रेठरा तांदूळ म्हणून प्रसिद्ध आहे.

खरतर तांदूळ हे समुद्रकिनारपट्टीच्या भागातील पिक मानले जाते. महाराष्ट्रात कोकणात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.

तरीही पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णानदी काठच्या ऊसपट्ट्यात कोकणच्या तांदळाच्या तोडीस तोड तांदूळ पिकतो हे आश्चर्यच मानल जातं.

शास्त्रज्ञांच्या मते रेठरेच्या तिन्ही बाजूनी वाहणाऱ्या कृष्णा नदीतील बाष्पीभवनामुळे तांदूळ पिकासाठी लागणारी आर्द्रता निर्माण होते व याचा फायदा तांदळाच्या चवीला व सुवासिकपणाला होतो. रेठरे गावात प्रवेश केला की घराघरातून हा तांदळाचा खास वास नक्की अनुभवता येतो.

आज फक्त सातारा सांगलीच नाही तर पुण्यामुंबईला देखील दुकानाबाहेर रेठरा तांदूळ मिळेल अशी जाहिरात दिसते. रेठरेमधील तांदळाच्या यशामुळे कराड तालुक्यात अनेक गावात इंद्रायणी तांदूळ उत्पादन घेतले जाते. इथला तांदूळ फक्त महाराष्ट्रातच नाही तर अटकेपार दुबईपर्यंत जाऊन पोहचलाय.

संदर्भ- दैनिक सकाळ 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.