मनमर्जिया: काहीसा ‘एक फुल दो माली’ टाइप्स !

यह इश्क नहीं आसान, बस इतना सम लिजिये..

एक आग का दरिया है, डूब के जाना है..

मन मर्जिया काहीसा असाच आहे.  एक फूल दो माली टाईप्स..

रुमी ( तापसी पन्नू) आणि विकी संधू ( विकी कौशल) या दोघांचं अस्सल पंजाबी असं प्रेम आहे. अगदी जीवापाड. पण प्रकरण ज्यावेळी घरी त्यावेळी विकीला जबाबदारी घ्यायची नाहीये. रुमीनं ३ वेळा संधी देऊनही तो त्यावर खरा उतरत नाही. शेवटी आपल्या अस्सल पंजाबी रागामुळे ती कोणाशीही लग्न करायला तयार होते आणि सिनेमात रॉबी (अभिषेक बच्चन) ची एन्ट्री होते.

mmz

रुमी- रॉबीचं लग्न होतं, पण ना विकी रुमिला विसरतो ना  रुमी विकीला. मग सुरू होतात सियापे… पुढे काय होतं? हा भाग थेटरात जाऊन बघितलेला बरा. वर म्हटल्याप्रमाणे हा एक ‘लव ट्रँगल’ आहे. रुमी आणि विकीचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यात रॉबीची एन्ट्री होते. रॉबीचं रोमिवर प्रेम आहे आणि रुमिला सुद्धा रॉबी आवडतो. मग रुमी नक्की कोणाची निवड करते या प्रश्नाच्या उत्तराचा संगीतमय प्रवास म्हणजे ‘मनमर्जिया’.

अनुराग कश्यपवर तो एकसुरी होत असल्याचा आरोप सातत्याने होत असताना त्याचा मुक्काबाज प्रदर्शित झाला आणि त्यानं आपलं वेगळेपण सिद्ध केलं. पण त्याचं कॅलीबर काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ‘मनमर्जिया’ नक्की बघा. हार्डकोअर ड्रामा + टिपिकल भारतीय मानसिकतेची मांडणी + अस्सल पंजाबी बाज +अनुरागच्या पोतडीतल्या वास्तववादाची फोडणी म्हणजे ‘मनमर्जिया’ होय.

सिनेमाचा बांबू हा स्क्रिप्ट ( लेखन+दिग्दर्शन) अभिनय आणि संगीत या तीन बांबुंवर टिकून असतो, असं का म्हणतात याची प्रचीती हा सिनेमा बघताना येते. कनिका धिल्लोनची कथा – पटकथा आणि संवाद लेखन चांगलं आहे. या आधी प्रेक्षकांनी बरेच प्रेम त्रिकोण पाहिले असले आणि त्यांना शेवट ठाऊक असला तरी ती अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत खुर्चीत बसवून ठेवते, हे पटकथेचं यश. अर्थात त्यात अनुरागचाही वाटा आहे.

सिंबॉलिक लेवलवर केलेलं काम पाहून कोणीही सांगू शकतं की हा अनुरागचा सिनेमा आहे, इतकं ते स्पष्ट आहे. चित्रपटातल्या काही फ्रेम्स आणि  काही सांकेतिक रचना तर अनुरागने फार सुंदर पद्धतीने वापरल्यात. विशेष म्हणजे चित्रपटात वापरलेल्या जुळ्या बहिणी आणि भावांच्या पात्रांचा वावर. मनाच्या दोन बाजू  दाखवण्यासाठी इतका सुंदर सांकेतिक प्रयोग कुणी केल्याचं निदर्शनात नाही.

अभिनय ही या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू आहे.  रोमी हे पात्र सिनेमाच्या  मध्यवर्ती भूमिकेत आहे. तिला हॉकीचा बेस आहे. संपूर्ण कथा ही तिच्या निवडी आणि निर्णयाभोवती फिरते. रोमी जर दुबळी असेल तर सिनेमा तिथेच संपून जाईल. पण तापसी पन्नू ही रोमी प्रचंड ताकदीनं उभी करते. गेल्या काही चित्रपटांमधूनचा  तिचा आलेख चढता आहे ही समाधानाची गोष्ट.

अभिषेक बच्चन बऱ्याच काळानंतर पडद्यावर दिसत असला तरी त्यांच्यात फार काही बदल झालेला दिसत नाही. अर्थात त्याच्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार रॉबीच्या भूमिकेसाठी मनात येत नाही हा प्लस पॉइंट आहे. सभोवतालच्या पात्रात अरुण बाली, अशनूर कौर किंवा मग अगदी नीलू कोहली सुद्धा आपापली कामं सुंदरपणे करतात. त्यातल्या त्यात सौरभ सचदेवाचा काकाजी लक्षात राहतो. एकूण सगळ्यांची काम अगदी छान झालीयेत.

या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं चित्रपट आहे तो विकी कौशलचा. अगदी काल-परवा चित्रपटसृष्टीत आलेला हा मुलगा सातत्याने वेगळं काहीतरी करतोय. विकीचा मसानमधला इंटेंस लूक ते आजचा एकदम डिजे असणारा, चित्रविचित्र हेअरस्टाईल करणारा, बालिश असा अस्सल धाकड पंजाबी हा प्रवास थक्क करणारा आहे. मनमर्जियाचा खरा नायक कोण असेल तर विकी कौशलच. विकी संधू साकारताना त्यानं अक्षरशः जीव ओतलाय.  कुठलाही विचार न करणारा विकी फक्त तिच्यासाठी तिच्या नवऱ्याकडे सगळं कबुल करणारा विकी प्रचंड भावतो.

अमित त्रिवेदी हा अस्सल हिरा आहे पण त्याचं तुम्हाला सोनं करून घेता आलं पाहिजे. चित्रपटाच्या १५७ मिनिटांपैकी जवळपास ५४ मिनिटे फक्त आणि फक्त अमित त्रिवेदी आपल्या समोर असतो. चित्रपटामध्ये तब्बल चौदा गाणी आहेत. मुळात ही सगळी गाणी स्वंतत्र ट्रॅक्स म्हणून प्रचंड लोकप्रिय झाली असली तरी चित्रपटामध्ये त्याचा वापर करून घेण्यात दिग्दर्शक कमी पडतो असं राहून राहून वाटतं.  एका वेळेनंतर तर सतत १० मिनिटांनी येणारी गाणी चीड आणू शकतात. पण तरीही अल्बम म्हणून विचार केल्यास अमित त्रिवेदीला तोड नाही.  अर्थात ‘सब मर जायेंगे लेकीन अकेला त्रिवेदी बच जायेगा’ हे पटावं इतकं सुंदर काम अमितनं आपल्या संगीताच्या माध्यमातून केलंय.

भारतीय प्रेक्षकांना रॉम-कॉम चित्रपट किंवा लव्ह ट्रँगल नवीन नाहीत. फिल्म पाहत असताना राहून राहून ‘हम दिल दे चुके सनम’ची आठवण येत राहते. शेवटी ‘there is no original story under the sky of the story‘  हे सत्य आहे. खरं तर हा सिनेमा हा नव्या बाटलीतली जुनी दारू असाच आहे. पण मनमर्जिया त्याच्या अस्सल पंजाबी पणामुळे लक्षात राहतो. त्याला दिलेल्या हाताळणीमुळे लक्षात राहतो. मीडियामधल्या अभिषेक बच्चनच्या कमबॅकच्या वावड्यांना काहीही अर्थ नाही, हे इथे नमूद करणं महत्वाचं. पण अनुराग त्याच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडतोय ही मात्र आनंदाची बाब.

एकूण सगळ्या गोष्टी लक्षात घेता ३ गोष्टींसाठी ‘मनमर्जिया’ बघायला हरकत नाही १. उत्तम कथा- पटकथा २. तापसी – विकीचा अभिनय ३. अर्थात अनुराग कश्यप. पण इतकं असूनही मनमर्जिया हा वन टाईम वंडर आहे हे मात्र नक्की.

अनिरुद्ध प्रभू

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.