सेनेतून एक बंडखोर बाहेर पडला आणि थेट शिवसेनेवरच क्लेम केला, “मीच खरा शिवसेनेचा संस्थापक”
विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि शिवसेनेचे नेते, राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. जवळपास ३५ आमदारांना घेऊन ते गुजरातला गेल्याच्या बातम्या पुढं आल्या. एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
त्यातच त्यांनी एक ट्विट केलं…
या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा उल्लेख केला पण उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळं एकनाथ शिंदे सेनेला जय महाराष्ट्र करणार की, समर्थक आमदारांचा गट घेऊन भाजपला जाऊन मिळणार की आणखी वेगळी चाल खेळणार याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत.
असंही म्हणलं जातंय, की मोठ्या प्रमाणावर आमदार फोडत एकनाथ शिंदे विधानसभेत शिवसेनेच्या गटावर क्लेम करु शकतील.
इतिहासात एक किस्सा असा सापडतो की,
एका शिवसैनिकांनं थेट आपणच शिवसेनेचे खरे संस्थापक आहोत असा दावा केला होता.
त्यांचं नाव माधव देशपांडे. शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा बाळासाहेबांसोबत असणारे जे शिलेदार होते, त्यात माधव देशपांडेंचं नाव घेतलं जातं. अगदी सुरुवातीपासून त्यांनी शिवसेनेचा प्रवास पाहिला.
पण माधव देशपांडे यांची खऱ्या अर्थानं चर्चा झाली ती जुलै १९९२ मध्ये.
त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आरोप केला की, ‘शिवसैनिकांनी निष्ठेने उभ्या केलेल्या संघटनेचा नाश, ठाकरे हे पुत्र आणि पुतण्याच्या नादी लागून करू पाहत आहेत. ठाकरे हे २५ वर्ष कण्या टाकून कोंबड्या झुंझवण्याचा खेळ खेळत आहेत.’ सोबतच त्यांनी असाही दावा केला की, ‘शिवसेनेमध्ये कोणत्याही कर्तृत्ववान नेत्याला मोठं होऊ दिलं गेलं नाही आणि एखादा नेता मोठा होऊ लागला की त्याचं खच्चीकरण करुन त्याच्यासमोर दुसरा नेता उभा केला जातो.’
याचे संदर्भ देण्यासाठी त्यांनी एक पुस्तिका काढली, ज्यात सतीश प्रधान, आनंद दिघे, छगन भुजबळ, मनोहर जोशी, शिशिर शिंदे अशा नेत्यांसोबत काय झालं, त्यांच्यामोर दुसरा नेता कसा उभा राहिला याचा उल्लेख केला.
थेट बाळासाहेबांवरच त्यांनी घराणेशाहीचे आरोप केले. त्यामुळं बाळासाहेब काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं.
बाळासाहेबांनी १९ जुलै १९९२ रोजीच्या सामन्यात अग्रलेख लिहिला, ज्याचं शीर्षक होतं,
‘अखेरचा जय महाराष्ट्र!’
शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्या कुटुंबियांसोबत अखेरचा जय महाराष्ट्र! असं लिहीत बाळासाहेबांनी त्या अग्रलेखातून शिवसैनिकांच्या भावनांना हात घातला. शिवसेनेत कुठल्याही प्रकारची घराणेशाही नाही असंही ते म्हणाले आणि माधव देशपांडेवर टीका केली.
आपलाच कधीकाळचा सहकारी आपल्याविरुद्ध देत असलेली चिथावणी त्यांनी अशाप्रकारे मोडून काढली होती.
मात्र माधव देशपांडे यांनी बंड करण्याची किंवा शिवसेनाप्रमुखांविरुद्ध जाण्याची ही एकमेव वेळ नव्हती.
त्यांनी एकदा बंड केलं आणि समांतर किंवा प्रति शिवसेना उभी करण्याऐवजी ‘सच्च्या शिवसैनिकांची’ सभा बोलावली आणि दावा केला की, आपण स्वतःच शिवसेनेचे खरे संस्थापक आहोत. त्यांनी स्वतःला ‘सर-सेनापती’ असं घोषित केलं. (आजही त्यांच्या ट्विटर बायोमध्ये Founder Shiv Sena असा उल्लेख आढळतो.)
बाळासाहेबांनी मात्र अवघ्या चार दिवसांच्या आत माधव देशपांडेंचं बंड मोडून काढलं.
एका बाजूला शिवसेना आपलीच आहे, असा क्लेम करणारे माधव देशपांडे होते, तर दुसऱ्या बाजूला प्रतिशिवसेना स्थापन करणारे बंडू शिंगरे होते.
बंडू हे शिवसेना नगरसेवक भाई शिंगरे यांचे बंधू. १९७० मध्ये शिवसेनेनं कांदा-बटाट्याची गोदामं फोडून लोकांना स्वस्तात कांदे-बटाटे उपलब्ध करुन दिले. मात्र या सगळ्यात बंडू शिंगरे यांच्यावर पैशांची अफरातफरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना एका बैठकीतून बाहेर काढलं.
यामुळं बंडू शिंगरे चिडले, त्यांनी बाळासाहेबांवर थेट टीका करण्यास सुरुवात केली, एवढंच नाही तर त्यांनी प्रतिशिवसेना स्थापन केली आणि स्वतःच्या नावापुढं स्वतःच पदवी लावली, ‘प्रतिशिवसेनाप्रमुख.’
शिवसेनेची स्थापना होऊन अवघी चार वर्षच झाली असली, तरी बाळासाहेबांचा करिष्मा मोठा होता. त्याच्यापुढं शिंगरे यांचा निभाव लागला नाही. अशा प्रकारे शिवसेनेतून प्रतिशिवसेना उभी करण्याचा प्रयत्न आणि शिवसेना स्वतःची असल्याचा दावा बाळासाहेबांनी हाणून पाडला होता.
आता एकनाथ शिंदेंचं बंड नेमकं काय रुप घेणार? ते मोठा गट घेऊन भाजपसोबत जाणार की स्वतःचा नवा पक्ष स्थापन करणार ? असे बरेच प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत.
हे ही वाच भिडू:
- भुजबळ ६ ; नारायण राणे १० ; राज ठाकरे १ : कोण किती आमदार घेवून बाहेर पडलं..
- उद्धव यांनी बाळासाहेबांना वचन दिलेलं, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेल मग आता?
- अविश्वास ठराव न आणता देखील सरकार पाडता येतं, पवारांनी तसच केलं होतं…