अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या क्रांतिकारकाने जेलमध्ये आत्महत्या केली होती

निळाशार बंगालच्या उपसागरात बारीक ठिपक्याप्रमाणे असणारे अंदमान निकोबार बेट. आधुनिकतेचा गंधही न पोहचलेल्या या बेटांवर काही आदिवासी जमाती वगळता कोणताही मानवी वावर नव्हता.

अशा या घनदाट जंगल असलेल्या अंदमान बेटांवर इंग्रजांनी एक राक्षसी जेल उभा केला होता,

त्याच नाव सेल्युलर जेल.

स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले क्रांतिकारक, कठोर गुन्ह्यात शिक्षा झालेले गुन्हेगार यांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून येथे आणले जायचे.

साधारणपणे बाराही महिने पडणार्‍या पावसामुळे येथे हवामान दमट असते. ते रोगटही आहे अशा कल्पनेमुळे अंदमानला काळे पाणी म्हणत.

इथे कैद्यांना घाण्याला बैला प्रमाणे जोडून तेल गाळले जाई.

मानवी अत्याचाराची परिसीमा म्हणजे हे सेल्युलर जेल. या जेलची तुलना काहीजण हिटलरच्या छळछावणीशी करतात.

१९०६ साली हे जेल बांधून तयार झाले. सेल्युलर जेलमध्ये ६९४ कोठड्या होत्या. कैद्यांचा एकमेकांशी संवाद होऊच शकणार नाही, सूर्यप्रकाश येऊ अशा पद्धतीने काळ कोठड्यांची उभारणी करण्यात आली होती.

अशाच एका कोठडी मध्ये एका युवा क्रांतिकारकाला डांबण्यात आलं होतं.

इंदूभूषण रॉय. मूळचा बंगालचा. वय असेल सतरा अठरा वर्ष. घरची परिस्थिती चांगली होती. आज बांगलादेशामध्ये असलेल्या खुलना येथे त्याचे वडील ताराचंद रॉय हे छोटे जमीनदार होते.

पण हायस्कुलमध्ये असतानाच इंदूभूषणने भारत मातेला ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी क्रांतिकार्यात उडी घेतली. इंदूभूषण अभ्यासात खुप हुशार नव्हता मात्र इतिहासात त्याला खूप रस होता.

आनंदमठ सारखी कादंबरी वाचून त्याच्यातील देशभक्त पेटून उठला होता.

शाळेत नापास झाल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याच लग्न करायचं ठरवलं. ही नवी बेदी पायात नको म्हणून तो घरातून पळून गेला

त्याला समविचारी मित्र भेटले. ते अरविंद घोष यांच्या अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेमध्ये सामील झाले.

इंदुभूषण देशासाठी जीव द्यायला सुद्धा तो तयार होता. ही समर्पण वृत्ती बघून त्याची एका महत्वाच्या मिशन साठी निवड झाली.

चंद्रनगरच्या मेयर वर बॉम्बहल्ला.

अनुशीलन समितीच्या खुदिराम बोस व इतर अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजसत्तेला हादरवण्या मोठ्मोठे प्लॅन आखले होते. याला अलीपुर कॉन्स्पिरसी केस म्हणतात.

११ एप्रिल १९०८ रोजी चंद्रनगरच्या इंग्रज मेयर वर बॉम्ब टाकण्याची जबाबदारी इंदूभूषणवर देण्यात आली.

पण दुर्दैवाने हा प्लॅन उघडकीस
आला. अरविंदबाबूंपासून सगळे अनुशिलनसमितीचे क्रांतिकारक अटकेत सापडले. यात इंदूभूषण देखील होता. इंदूभूषणला झालेल्या १० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी त्याची अंदमानला रवानगी करण्यात आली.

अंदमानमध्ये तेव्हा डेव्हिड बॅरी नावाचा एक क्रूर जेलर होता.

त्याला तिथले भलभलेे खुुनी बलात्कारी खुंखार कैदी देखील बारी साहेब आला या हाकेने थरथर कापायचे. हे भारतीय म्हणजे ब्रिटिश राजसत्तेचे द्रोही आहेत व त्यांना गुलामाप्रमाणे वागवले पाहिजे या विचाराने त्यांच्यावर हा बारी साहेब गुराप्रमाणे अत्याचार करायचा.

रोज सकाळी सगळे कैदी तेल काढण्याच्या घाण्याला जुंपले जायचे आणि बारी साहेब बाल्कनीत खुर्ची टाकून सिगार ओढत ते दृश्य पहात बसायचा.

राजद्रोही असलेल्या इंदूभूषणला जेलच्या बाहेरची कष्टाची कामे लावली जात.

एकवेळ तेलाचा घाणा परवडला पण हे काम नको असं इंदूभूषणला वाटायचं. दिवसभर उपाशीपोटी काम करून पायातल्या बेडयांसह अनेक मैल तुडवून परत तुरुंगात येणे हे मरणप्राय यातनेपेक्षाही भयानक होतं.

नाजूक शरीर यष्टीचा इंदूभूषण कायम आजारी पडायचा. मात्र त्याचा आजार हे काम चुकवण्यासाठी कारण आहे असं समजून तुरुंगातले कर्मचारी त्याला प्रचंड मारहाण करायचे.

याला वैतागून इंदूभूषण याने वरच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

पण तिथेही त्याचं राजकीय वजन नसल्यामुळे कोणतीही दया दाखवली गेली नाही. उलट त्याच काम वाढवण्यात आलं.

अखेर इंदूभूषणने सेल्युलर जेलमध्ये सत्याग्रह सुरू केला. त्याने जेल बाहेरच्या कामाला नकार दिल्यामुळे त्याच्यावर थर्ड डिग्रीचा प्रयोग केला गेला. अमानुष अत्याचाराननंतर त्याला उभा राहण्याचेही बळ नव्हते. त्या दिवसापूरते इंदूभूषणला जेमध्येच काम लावण्यात आले.

मात्र रात्री जेवताना इंदूभूषणच्या थाळीत मुद्दामहून तिखट जास्त घालण्यात आल. त्याच्या जखमा जास्त वेदनेने ठणकू लागल्या. इतर कैद्यांनी विनंती करूनही त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवल गेलं नाही.

२९ एप्रिल १९१२ रोजी पहाटे सेल्युलर जेल मध्ये गोंधळ सुरू झाला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देखील तेव्हा जेल मध्ये होते. त्यांनी जेव्हा खिडकीतून पाहिलं तेव्हा इंदू भूषण रॉयचा देह त्याच्या कोठडीच्या खिडकीतून लटकत होता.

त्याने स्वतःच्याच कुर्त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.

सावरकर म्हणतात, इंदूभूषण एक तेजस्वी तरुण होता, भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी त्याने प्राण अर्पण केले. अंदमान मधले अत्याचार पाहिले तर माझीही गत याहून वेगळी होणार नव्हती.

आजही अंदमान जेलच्या बाहेर शहीद इंदूभूषण रॉयचा पुतळा उभारण्यात आला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.