सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस गळ्यात सोन्याच्या चेन घालून बीएमडब्ल्यू उडवत फिरत नाही.

आपल्या मराठी माणसाला एक खंत असते की भारतातल्या सगळ्या श्रीमंतांची यादी काढली की त्यात गुजराती पारशी सिंधी माणसांचीच नावे दिसतात. या सगळ्यांच्या तुलनेत संपत्तीच्या बाबतीत मराठी माणूस कुठे आहे? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो.

सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस गळ्यात सोन्याच्या चेन घालून गाड्या उडवत फिरत नाही. तो गुटखा किंग, बिल्डर, पेट्रोल पंप धारक, रस्ते कॉन्ट्रॅक्टर नाही. तो कुठलाही भाई नाही गेला बाजार राजकारणी देखील नाही. हा माणूस भारताच्या फोर्जिंग इंडस्ट्रीचा बाप आहे. त्यांनी भारताची बोफोर्सपेक्षाही शक्तिशाली तोफ बनवली आहे. चुकीच्या मार्गाने नाही तर अस्सल खणखणीत वाजवून पैसे कसे कमवायचे याच उदाहरण हा मराठी माणूस आहे.

त्यांचं नाव बाबा कल्याणी

बोफोर्स तोफ म्हटलं की भारतातील संरक्षण क्षेत्रातील सर्वात जुना वाद आठवतो. राजीव गांधींच्या काळात भारताने स्वीडन कडून बोफोर्स कंपनीचे हॉवित्झर तोफा खरेदी केल्या. या खरेदीसाठी आपल्या सरकारने क्वात्रोची नावाच्या एका दलालाला मोठी रक्कम दिली असे आरोप झाले. प्रचंड खळबळ झाली. पंतप्रधानांच नाव या घोटाळ्यात आलं. निवडणुकीत सरकार पडलं.

बरच काय काय या बोफोर्स तोफेमुळं झालं.

हे सगळे वाद सोडले तर बोफोर्स तोफ चांगली होती. कारगिलच्या युद्धात याच तोफांनी पाकिस्तानी आर्मीचे कंबरडे मोडून काढले. आजही भारताच्या प्रमुख शस्त्रांमध्ये या हॉवित्झर्स तोफांचा समावेश होतो.

बोफोर्स तोफेचा खरा प्रॉब्लेम त्याच्या खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्यात होता. जर हि तोफ भारतात तयार झाली असती तर इतकं सारं रामायण महाभारत घडलंच नसतं. सध्या सुरु असलेल्या मेक इन इंडियाच्या कार्यक्रमांतर्गत हे स्वप्न साकार झालंय.

बोफोर्स पेक्षाही शक्तिशाली तोफ भारतात तयार झाली आहे. ती बनली आहे पुण्यात ! बाबा कल्याणी यांच्या भारत फोर्जमध्ये.

कोण आहेत बाबा कल्याणी ? कशी झाली भारत फोर्जची सुरवात ?

भारत फोर्जचे स्थापना निळकंठ कल्याणी यांनी केली. खरं तर कल्याणी हे सातारा जिल्ह्यातील कोळे गावचे शेतकरी कुटुंब. त्यांचे वडील हळदीचा व्यापार करायचे. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर निळकंठ यांना शिक्षण निम्म्यात सोडून घरची जबाबदारी उचलावी लागली.

याच काळात निळकंठ कल्याणी यांचा महाराष्ट्रातील दिग्गज नेते यशवंतराव चव्हाणांशी संपर्क आला. कल्याणी कुटुंबाने यशवंतरावांना साताऱ्यात त्यांच्या लहानपणीच्या काळात मोठी मदत केली होती. स्वातंत्र्यलढ्या वेळी देखील त्यांची मोठी मदत झाली होती. यशवंतराव त्यांचे उपकार विसरले नव्हते. निळकंठ कल्याणी यांना शंतनुराव किर्लोस्कर यांच्याकडे पाठवून दिले.

पुढे निळकंठ कल्याणी यांनी किर्लोस्करांच्या मदतीने पुण्याच्या मुंढवा येथे फोर्जिंगचा कारखाना सुरु केला. ते साल होतं १९६१.

नुकताच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. राज्यात औद्योगिकीकरणाचे प्रयत्न सुरु होते. यात कल्याणी यांचे भारत फोर्ज देखील आघाडीवर होते. नीलकंठ कल्याणी हे कल्पक उद्योगपती असल्याने त्यांनी कल्याणी उद्योग समूहाच्या विस्ताराला सुरुवात केली. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून (कल्याणी शार्प) ते कृषी क्षेत्राला लागणाऱ्या विविध उत्पादनांपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश होता. याशिवाय त्यांनी ‘कल्याणी फोर्ज’, ‘कल्याणी ब्रेक’ हे उद्योग स्थापन केले.

निळकंठ कल्याणी यांचे सुपुत्र बाबासाहेब कल्याणी यांनी वयाच्या २३ व्या वर्षी या क्षेत्रात उडी घेतली.

बाबा कल्याणी यांचे शालेय शिक्षण बेळगाव इथल्या मिलिटरी स्कुल मध्ये झाले. सैनिक गणवेशाचे त्यांना आधीपासून आकर्षण होते. मात्र कॉलेजसाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा कल इंजिनियरिंगकडे वळला. कॉलेजमध्ये त्यांचे सोबती होते शरद पवारांचे धाकटे बंधू प्रताप पवार आणि पृथ्वीराज चव्हाण. त्यांचा सबंध ग्रुप अभ्यासात हुशार होता.

त्यांनी सर्वानी ठरवून इंजिनियरिंग साठी पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतला.

बाबा कल्याणी यांनी बिट्स पिलानी येथे मेकॅनिकल इंजिनीरिंग पूर्ण केले व उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील एमआयटी येथे प्रवेश मिळवला. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हि संस्था जगात अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सर्वोत्तम समजली जाते. या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यावर अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्या तुमच्या दारात हात जोडून उभ्या असतात.

मात्र ही प्रलोभने सोडून बाबा कल्याणी वडिलांच्या भारत फोर्जमध्ये परत आले.

१९७२ साली बाबा कल्याणी यांनी भारत फोर्ज जॉईन केले. मात्र आल्या आल्या त्यांना एका वेगळाच संकटाला सामोरे जावे लागले. बाबा कल्याणी यांचे आगमन कंपनीतल्या काही जणांना आवडले नाही. त्यांनी राजीनामा दिला. कल्याणी याना हा मोठा धक्का होता. मात्र शंतनुराव किर्लोस्कर त्यांच्या पाठीशी उभे राहिले. अशा संकटातच खरी परीक्षा असते हे त्यांनी समजावलं.

शंतनुराव किर्लोस्कर यांच्या शब्दांनी बाबा कल्याणी यांना धीर आला.

पुढच्या काळात त्यांनी भारत फोर्जचा आक्रमकपणे विस्तार केला. त्याकाळच्या लायसन्स राजशी ताकावर घेत त्यांनी भारताबाहेर भारत फोर्जचे पंख पसरले. अमेरिकेतील ब्रेक उत्पादन करणारी कंपनी, जपानमधली कंपनी अशा अनेक कंपन्यांशी त्यांचे करार झाले होते. जर्मनीतील सीडीपी ही सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी ताब्यात घेऊन कल्याणी यांनी देशाचे नाव जागतिक उद्योगविश्वात अधोरेखित केले.

कारखाना देवालय, मशीन देव व उत्पादन ही भक्ती या त्रिसूत्रीवर त्यांनी कंपनीचा कारभार चालवला.

नव्वदच्या दशकात आलेल्या ग्लोबलायजेशनचा फटका भारत फोर्जला देखील बसला. मात्र त्यांनी दूरदृष्टी दाखवत काही पावले मागे आले. इतर व्यवसायांना थोडासा ब्रेक लावत आपल्या फोर्जिंग उद्योगावर लक्ष केंद्रित केले. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. मारुतीपासून ते मर्सिडीज पर्यंत जगभरातल्या प्रत्येक गाडीत भारत फोर्जचे कंपोनंन्ट वापरले जातात. भारताबाहेर भारत फोर्जचे कारखाने उभे आहेत.

खऱ्या अर्थाने भारत फोर्ज हीच भारतातली पहिली मल्टिनॅशनल कंपनी बनली. अगदी अमेरिकेतल्या मोठमोठ्या ट्रकचं ऍक्सेल मेड इन भारत फोर्ज असते.

कल्याणी ग्रुपचे हजारो कोटींचे साम्राज्य उभे आहे. दहा हजार पेक्षा अधिकजण या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. बाबा कल्याणी यांचं नाव भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केले जाते. भारत सरकारचा २००८ साली पद्मभूषण हा मानाचा सन्मान त्यांना देण्यात आला. त्यांच्या  वडिलांच्या विठ्ठल कल्याणी यांच्या नावावरून पुण्यात एका उपनगराला कल्याणीनगर असे नाव मिळाले आहे.

भारतात अंबानी, अदानी वगैरे श्रीमंत माणसं असली तरी सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस म्हणजे बाबा कल्याणी. 

आयुष्यातली सगळी सुखं बाबा कल्याणी यांच्या पायाशी लोळण घालत होती. तरीही बाबा कल्याणी यांनी एक मोठं धाडस करायचं ठरवलं,

बोफोर्स पेक्षा भारी तोफ बनवायचं.

लहानपणी सैनिकी शाळेत शिक्षण झालं असल्यामुळे बाबा कल्याणी यांचे मशीनगन्स, रायफल यांच्याविषयी खास प्रेम होतं. भारताला संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत इतर अवलंबून राहावे लागते याच त्यांना वाईट वाटायचं. पूर्वी भारतात संरक्षण साहित्य बनवायची जबाबदारी फक्त सरकारी कंपन्यांकडे होती. पण नवीन सरकारने हि बंधने शिथिल केली. प्रायव्हेट स्केटरलाही हे क्षेत्र खुले केले.

भारत फोर्जने डीआरडीओच्या मदतीने हे १५५ एमएम तोफ बनवण्याचं शिवधनुष्य उचललं.

यापूर्वी पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्डाच्या (ओएफबी) गन कॅरेज फॅक्टरीने २०१० साली धनुष या मूळ बोफोर्स हॉबिट्झ एफएच-७७-बी या स्वीडिश तोफेवर आधारित तोफ बनवली. या तोफेच्या निर्मितीत कल्याणी ग्रुप आणि टाटा ग्रुप सहभागी होते.

अनुभवावर बाबा कल्याणी यांनी आपल्या पुण्याच्याच भारत फोर्जच्या फॅक्ट्रीमध्ये अ‍ॅडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टिम (एटीएजीएस) नावाची हॉवित्झर तोफ विकसित केली. मोदी सरकारच्या काळात सुरु झालेल्या मेक इन इंडिया योजनेचा या तोफेच्या निर्मितीमध्ये फायदा झाला.

या तोफेला नाव देण्यात आले भारत ५२

तिचे वजन १५ टन आहे आणि तोफेचे मारक क्षमता ही ४८ किमीपेक्षा अधिक आहे. ही तोफ ३० सेकंदात सहा तोफगोळे डागू शकते. ATAGS ही जगातील सर्वात प्रगत फील्ड तोफखाना प्रणाली मानली जाते. पण भारत अद्याप या प्रणालीचा समावेश सैन्यात करू शकलेला नाही. २०१६ मध्ये भारताने अमेरिकेकडून १४५ हॉवित्झर तोफा घेतल्या होत्या. ७५० दशलक्ष डॉलर्समध्ये ही डील झाली होती. अमेरिकेकडून घेतलेली १५५ मिमी x ३९ कॅलिबर अल्ट्रा लाईट हॉवित्झरची मारक क्षमता ही २४ ते ३९ किमी आहे. तर भारत ५२ एटीएजीएसपेक्षा खूपच कमी आहे.

येत्या काही दिवसातच या तोफेच्या सर्व चाचण्या पूर्ण होऊन ती भारतीय सैन्यदलात सामील होईल.

बोफोर्स पेक्षा कितीतरी पट अधिक शक्तिशाली व अत्याधुनिक असणाऱ्या भारत ५२ या तोफेला सौदी अरेबिया सारख्या देशातूनही मागणी आहे. आजवर संरक्षण साहित्य बाहेरच्या देशातून आयात करणारा आपला देश आत्मनिर्भर तर बनलाच आहे शिवाय आता निर्यातक्षमता प्राप्त करून महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

याच श्रेय जाते बाबा कल्याणी यांच्या सारख्या काळाच्या पुढे नजर असलेल्या उद्योगपतीला, त्यांच्या समूहात काम करत असलेल्या असंख्य इंजिनियर्स आणि संशोधकांना. शत्रूला धडकी भरवणारी भारत ५२ तोफ जेव्हा रणभूमीवर उतरेल तेव्हा तो फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी गौरवशाली दिवस असेल.

हे ही वाच भिडू.

 

 

1 Comment
  1. Harish. Rawal. says

    I am an ordinary Gujarati sr. Citizen. Some how having little knowledge of Marathi language. I can speak& read Marathi. After reading this article on Shri, Baba Kalyani I was very much impressed. I wonder why I never heard of him? Anyway salute to Baba Kalyani & family. Our country should be proud of this family. Wishing them all the best.

Leave A Reply

Your email address will not be published.