शेवटच्या निजामाचं निधन झालं, त्यांचे आजोबा पृथ्वीवरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते…

गुरुवारी रात्री इस्तंबुलमध्ये एका माणसाचं निधन झालं, अंतिम संस्कार करण्यासाठी त्या माणसाचं पार्थिव भारतात हैदराबादमध्ये आणण्यात येईल. या माणसाचं नाव नवाब मीर बरकत अली खान वलशन मुक्करम जहाँ बहादूर, हैदराबाद संस्थानचा शेवटचा निजाम अशी त्यांची ओळख.

अर्थात शेवटचे निजाम असल्यानं यांचा वारसाही तगडा होता, ज्यात महत्त्वाचं नाव येतं त्यांचे आजोबा मीर उस्मान अली खान.         

भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची नावं तुम्ही काढायला गेलात तर टाटा, अंबानी, अदानी असे अनेक नावं तुम्ही घ्याल. फार तर फार तुम्ही कदाचित चंगेज खान यांचं नाव घ्याल. कारण चंगेज खान हा आतापर्यंतचा सर्वात श्रीमंत शासक असल्याचं ऐकण्यात येत असतं. पण मीर उस्मान अली खान हा असा माणूस होता ज्याने या सगळ्यांनाच पाणी पाजलंय. 

भारताच्या आजवरच्या इतिहासात त्यांच्या सारखा धनवान व्यक्ती झालेला नाहीये. त्यांची श्रीमंती अशी होती की त्यांच्या श्रीमंतीच्या चर्चा अमेरिकेपर्यंत व्हायच्या. मौल्यवान हिऱ्यांना देखील ते पेपरवेट सारखं वापरायचे. 

मीर उस्मान अली खान यांचा जन्म ६ एप्रिल, १८८६ चा आणि मृत्यू २४ फेब्रुवारी १९६७. 

ते महबूब अली खानचे दुसरे पुत्र होते. १९११ मध्ये ते हैदराबादचे निजाम म्हणून त्यांच्या वडिलांचे उत्तराधिकारी बनले आणि सुमारे चार दशके या पदावर राहिले. भारतात लोकशाही येण्यापर्यंत म्हणजे १९४८ पर्यंत ते हैदराबादचे शासक म्हणून कार्यरत होते. म्हणजे जवळपास ३७ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ राहिला. त्यानंतर अनेक वर्ष ते नाममात्र निजाम राहिले.

मात्र या दरम्यानची त्यांची श्रीमंती कल्पनेपलीकडील होती. 

WhatsApp Image 2022 03 30 at 8.58.30 PM

२०२१ च्या आकडेवारीनुसार, मीर उस्मान अली खान यांची एकूण संपत्ती १७.४७ लाख कोटी म्हणजे तब्बल २३० बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त असेल. तेही महागाईचं गणित जोडून. एलॉन मस्कच्या तुलनेत या निजामाची संपत्ती जवळपास आहे. 

असं म्हणतात, मीर उस्मान अली खान पेपरवेट ऐवजी हिऱ्याचा वापर करायचे. त्यांची स्वतःची हैदराबाद स्टेट बँक होती, जी त्यांनी १९४१ मध्ये स्थापन केली होती. त्यांची खासियत होती भव्य भेटवस्तू देणं. त्यांनी ब्रिटिश राजकुमारी एलिझाबेथला तिच्या लग्नात हिऱ्यांचे दागिने भेट म्हणून दिल्याचं सांगितलं जातं. मात्र असं असताना ते स्वतः ३५ वर्ष जुने दागिने घालायचे. कारण त्यांना त्याची विशेष आवड आणि ओढ होती.

त्यांनी त्यांच्या राज्यात वीज, रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग असं सगळं काही विकसित केलं होतं. शिवाय ते शिक्षणाला खूप महत्व देणारे होते. त्यांनी जामिया निजामिया, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि दारुल उलूम देवबंद यासारख्या काही आघाडीच्या विद्यापीठांना भरघोस देणगी दिली होती.

हैदराबाद हायकोर्ट, सेंट्रल लायब्ररी जी आधी असफिया लायब्ररी म्हणून ओळखली जायची, असेंब्ली हॉल, स्टेट म्युझियम आणि निजामिया वेधशाळा यासह हैदराबादमधील अनेक मोठ्या सार्वजनिक इमारतींच्या विकासाचं श्रेय नवाबांच्या राजवटीला दिलं जातं. शहरात येणारा मोठा पूर टाळण्यासाठी उस्मान सागर आणि हिमायत सागर हे दोन जलाशय त्याच्याच कारकिर्दीत बांधले गेले.

त्यांना ‘नाईट ग्रँड कमांडर ऑफ द स्टार ऑफ इंडिया’ ही पदवी प्रदान करण्यात आली होती.

मीर उस्मान अली खान यांना CelebrityNetWorth ने सध्याची महागाई लक्षात घेऊन सर्व काळातील २५ श्रीमंत लोकांच्या यादीत सहावं स्थान दिलं होतं. तर त्यांच्या २३० बिलियन डॉलर नेट-वर्थचा विचार केल्यास २०१८ मध्ये फोर्ब्सने या संख्येचा अंदाज लावला होता. त्यावेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती ११२ होती  बिलियन डॉलर आणि मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ४९ बिलियन डॉलर होती. 

त्‍यामुळे २०१८ मध्‍ये मीर उस्मान यांना पृथ्‍वीवरील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍ती सांगण्यात आलं होतं. तर आता २०२२ मध्‍ये सुमारे २५० बिलियन डॉलरसह केवळ एलन मस्‍क निजामाच्या जवळ पोहचू शकले आहेत.

इतिहासानुसार स्वातंत्र्यानंतर काही संस्थानं सोडून इतर राहिलेल्या संस्थानांचा भारतात समावेश केला. ज्यातील एक हैद्राबाद संस्थान होतं. निजामांना हैद्राबाद हे स्वतंत्र संस्थान ठेवायचं होतं. त्यावर ते अडून होते. मात्र, नंतर त्यांना हैद्राबाद संस्थान भारतात सामिल करावं लागलं. तेव्हा भारत सरकारने त्यांना हैद्राबादचा राजप्रमुख बनवलं होतं.

असं सांगितलं जातं की, त्यांनी भारत सरकारला ५ हजार किलो सोनं दान दिलं होतं.

१९६५ मध्ये भारत-पाक युद्ध झालं. भारताला यात विजय मिळाला पण या युद्धामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. तेव्हा लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते. त्यांनी अर्थव्यवस्था जागेवर आणण्यासाठी पैसा उभारणीसाठी आवाहन केलं होतं. यादरम्यान त्यांनी हैद्राबादच्या निजामांचीही भेट घेतल्याचं  सांगितलं जातं.

WhatsApp Image 2022 03 30 at 8.57.38 PM 1

मीर उस्मान अली खान यांनी बेगमपेट एअरपोर्टवर लाल बहादूर शास्त्री यांचं स्वागत केलं. दोघांमध्ये बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर उस्मान अली यांनी तब्बल पाच हजार किलो सोनं सरकारला दिलं.

मात्र यासंबंधी RTI मध्ये माहिती मिळाली की, उस्मान अली खान यांनी सोनं दान केलं नव्हतं तर National Defense Gold Scheme मध्ये आपलं ४२५ किलो सोनं गुंतवलं होतं. ज्याचं त्यांना ६.५ टक्के दराने व्याजही मिळणार होतं.

शिवाय भरभरून दान करणाऱ्या मीर उस्मान अली खान यांच्याबद्दल असंही म्हटलं जातं की, ते थोडे कंजूस स्वभावाचे होते. याचा किस्सा असा…

जेव्हा हैद्राबादहून लोखंडी बॉक्समध्ये भरून सोनं दिल्लीला नेण्यात आलं, तेव्हा उस्मान अली यांनी सांगितलं होतं की, ‘आम्ही केवळ सोनं दान करत आहोत. हे लोखंडी बॉक्स नाही. ते परत पाठवा.’ आणि त्यानुसार ते बॉक्स परत पाठवण्यात आले होते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.