महाराष्ट्रातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठासाठी फडणवीसांनी ‘रिद्धपुर’ असंच निवडलं नाही तर…

काल ३० ऑगस्टला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित अखिल भारतीय महानुभाव संमेलनात एक महत्वाची घोषणा केली आहे. ती म्हणजे…

“अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं जाणार.”

गेल्यावेळी जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार होतं तेव्हा ‘रिद्धपूर विकास आराखडा’ तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव गेल्या अडीच वर्षात त्याला निधी मिळाला नाही. आता मात्र आपल्या महानुभाव पंथाचा आशीर्वाद लाभलेलं सरकार राज्यात आहे. त्यामुळे रिद्धपूर विकास आराखड्याला लवकर मंजूरी दिली जाईल आणि तिथली कामं तात्काळ करण्यात येईल, असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय.

इथे लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे… जर रिद्धपूरमध्ये हे विद्यापीठ साकारण्यात आलं तर पहिल्यांदाच राज्यात मराठी भाषा विद्यापीठ असणार आहे. 

म्हणून विषय समजून घेऊया.. 

 हा निर्णय का घेण्यात आला आहे ?

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून द्यायचा असेल तर सर्वप्रथम मराठीचं विद्यापीठ महाराष्ट्रात असायला हवं. रामटेक इथे संस्कृत विद्यापीठ आहे, वर्ध्यात हिंदीचं केंद्रीय विद्यापीठ आहे तर कर्नाटकातही कन्नड भाषेचं विद्यापीठ आहे. मग मराठीचं विद्यापीठ का असू नये? या विचाराने गेल्या अनेक वर्षांपासून महानुभाव पंथाकडून मराठी विद्यापीठाची मागणी केली जात होती.

मराठी विद्यापीठाची सर्वप्रथम कल्पना १९३३ साली नागपुरमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आली. त्यानंतर महानुभाव साहित्य संमेलन, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, भानुकवी मराठी साहित्य संमेलन, चक्रधरस्वामी मराठी साहित्य संमेलन, रुद्धपुर इथली धर्म परिषद, महदंबा साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही हे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला होता. 

सरकार दरबारी अशी मागणी करण्यात आली आणि त्यानुसार सरकारने प्रोसेस सुरु केली असल्याचं खुद्द फडणवीसांनी सांगितलं.

रिद्धपूर हेच ठिकाण का निवडण्यात आलं?

रिद्धपूरला महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखलं जातं. कारण महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी वास्तव्य केलेली ही भूमी आहे. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये चक्रधर स्वामी गुजरातमधून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी या पंथाचा प्रचार केला. हा पंथ भगवान कृष्ण आणि चक्रधरांची वचनं प्रमाण मानतो. चक्रधरांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे या समाजातील लोक आचरण करतात. 

मात्र रिद्धपूरची अजून एक ओळख म्हणजे, रिद्धपूरला मराठी वाङ्मयाची काशी म्हणलं जातं. 

श्रीचक्रधर स्वामी हे स्वतः गुजराती भाषिक असले तरी ते मराठी भाषा अगदी उत्कृष्ट बोलायचे. आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रचार त्यांनी मराठी या लोकभाषेतच केला. यातून त्यांच्या अनुयायांनी मराठीचा प्रसार सुरु केला. त्याचा भाग म्हणजे मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ रिद्धपूरमध्ये लिहिला गेला. 

श्रीचक्रधर स्वामी यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या लीळा केल्या त्या त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला होता. पुढे यातून प्रेरणा घेऊन रिद्धपूमध्येच स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकार यासारखे ग्रंथ लिहिले गेले. 

सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहले गेल्याने रिद्धपूरला विशेष महत्व आहे. 

मराठीतील आद्य कवयित्री महदाईसांंनी ज्यांना महदंबा म्हणूनही ओळखलं जातं त्या रिद्धपूरलाच धवळे (१३ व्य शतकातील कविता) रचले. ज्ञानेश्वरीच्या चार वर्ष अगोदर ‘महादंबेचे दोहे’ हा पहिला मराठी पद्यग्रंथ रिद्धपूरला रचला गेला होता. शिशूपाल वध, रुक्मिणी स्वयंवर या काव्यरचानाही रिद्धपूरलाच रचल्या गेल्या आहेत.

पुढे नागदेवाचार्यांनी लीळाचरित्र केवळ आद्य मराठी भाषेतच नाही तर मराठीच्या वऱ्हाडी बोलीत देखील लिहून घेतलं. रिद्धपूरमधूनच मराठी भाषेला ‘शास्त्रभाषेचा’ दर्जा प्राप्त करून देण्यात आला. ही फार मोठी वाङमयीन भाषिक क्रांती होती.

सर्वात महत्वाचं म्हणजे याच महानुभाव पंथातील एका संताने महाराष्ट्राची व्याख्या केली होती. डिंभ कृष्णमुनी असं या संतांचं नाव.

विंध्यांचलापासोनी दक्षिणेसी, कृष्णातटापासोनी उत्तरेसी 

झाडीमंडळापासोनी पश्चिमेसी, महाराष्ट्र बोलिजे ।।

महाराष्ट्राला ज्या पंथाने मराठी दिली त्यांची रिद्धपुर ही कर्मभूमी भूमी होती. याच भूमीत मराठीची साहित्य निर्मिती झाली, त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.  

मराठी विद्यापीठासाठी सर्वप्रथम मागणी केली गेलेलं ठिकाणंही रिद्धपुर हेच होतं.

जेव्हा मराठी विद्यापीठासाठी इतर कोणीही मागणी केली नव्हती तेव्हा केवळ रिद्धपूरमधून ही मागणी करण्यात आली होती. शिवाय मराठी साहित्य संमेलनांमध्ये जेव्हा मराठी विद्यापीठाचा प्रश्न निघाला तेव्हा साहित्यिकांनी अभ्यास करून सर्वानुमते रिद्धपुर हे नाव ठरवलं. 

रिद्धपूरचं स्थानमहात्म्य अजून नीट समजून घेण्यासाठी बोल भिडूने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मराठी विभागाचे निवृत्त प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. अविनाश आवलगावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 

“मराठीतील पहिला गद्यग्रंथ आणि पहिला पद्यग्रंथ हा महानुभावांनी निर्माण केला. याशिवाय मराठीतील पहिला व्याकरण ग्रंथ देखील महानुभावांनी लिहिला. मराठीतील पहिली समीक्षा देखील महानुभावांनी लिहिली. एकेका शब्दाचे अनेक ग्रंथ त्यांनी आपल्या भाष्यग्रंथात, टीकाग्रंथात दिलेले आहेत. म्हणजेच मराठीतील पहिला शब्दकोश देखील महानुभावांनी दिला. 

आणखी म्हणजे महानुभावांच्या ग्रंथांमध्ये भूगोल देखील आहे. 

म्हणजेच महानुभावांनी मराठी भाषेची सर्वांगाने सेवा केली आहे आणि या सर्व गोष्टी त्यांनी केल्या त्या ‘रिद्धपुर’मध्ये. 

दुसरी गोष्ट म्हणजे रिद्धपुरमधून सामाजिक परिवर्तनाचे अनेक प्रकल्प सुरु झाले.

उदाहरणार्थ, महानुभाव पंथातील गोविंदप्रभू यांनी रिद्धपुरमध्येच सर्वप्रथम स्रियांना त्यांचे हक्क दिले, त्यांना पुरुषांप्रमाणे मानलं. जातीय भेदला पहिल्यांदा विरोधही गोविंदप्रभूंनी इथेच केला. भाकरीला जात नसते असं सांगत अस्पृश्यांच्या घरी जाऊन जेवण करणारा ब्राम्हण म्हणजे गोविंदप्रभू आपल्याला रिद्धपूरला पाहायला मिळतात. 

८०० वर्षांपूर्वी मातंगांसाठी पहिली विहीर कुणी खणली असेल तर ती गोविंदप्रभूनी खणली, तीही रिद्धपूरलाच ! 

अशाप्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचं काम रिद्धपूरला सुरु झालं. मग ते वाङ्मयाच्या क्षेत्रात असेल किंवा सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात. 

म्हणून रिद्धपुरमध्ये जर मराठी विद्यापीठ झालं तर महानुभावांच्या कार्याला न्याय मिळू शकेल. जमेची बाजू म्हणजे रिद्धपूरने महाराष्ट्राला काय दिलं, हे अभ्यासकांच्या आणि महाराष्ट्राच्या समोर येईल हि महत्वाची गोष्ट डॉ. अविनाश आवलगावकर यांनी लक्षात आणून दिली.  

मराठीचं स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झालं तर सर्व विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आयुर्विज्ञान असे विषय हे मराठी भाषेतून शिकण्याचा एक चांगला पर्याय नवीन युवा वर्गापुढे राहू शकतो. पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचं शिक्षण आणि संशोधन यांना चालना मिळू शकते. तसंच यामुळे मराठीतील शब्दसंग्रह वाढीला शकतो.

जागतिक पातळीवरील साहित्याचा अनुवाद करून त्या-त्या भाषेतील वाङ्मयीन अनुभव अभ्यासता येऊ शकतो. इतर भाषेतील शब्दांना पर्यायी शब्द शोधता येईल आणि भाषेची शब्द-संपत्ती वाढण्यास मदत होईल, अशा आशयाने मराठी भाषा विद्यापीठाचा प्रस्ताव सरकार दरबारी मांडण्यात आला आहे.

फडणवीसांनी या विद्यापीठाच्या मागणीला पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखवला आहे. तेव्हा आता या मागणीचं काय होईल? शिंदे-फडणवीस सरकारमध्ये विद्यापीठ उभारणी सुरु होईल की पुन्हा प्रस्ताव धूळखात पडेल, हे लवकरच कळेल. 

पण राजकारणाच्याही पलीकडे जाऊन विचार केला तर राज्यात पहिलं मराठी भाषा विद्यापीठ व्हावं अशी तुम्हा-आम्हा सर्वांचीच इच्छा आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.