फॅशन टिव्हीचं सॉफ्ट व्हर्जन म्हणून आमच्यासाठी चॅनल [V] होतं

चौकातल्या एका पोरानं खेळून दमल्यावर पेप्सीकोला खाता खाता हळूच बॉम्ब फोडला. “भावांनो टीव्हीवर एक चॅनेल ए, घरात कोण असलं की अजिबात बघू नका.” आता बघू नका सांगितल्यावर सगळ्या मंडळाची उत्सुकता वाढली. त्यानं सांगितलेलं नाव लक्षात ठेवून एकेकानं हळूच कल्टी मारली…

Channel [V]

घरात कोण नसताना एकदिवस हे चॅनेल लाऊन बघितलं, कुठलं तरी गाणं सुरू होतं. गाण्यावर नाचणाऱ्या नटीचे कपडे आपण आयुष्यात पहिल्यांदा बघत होतो, एवढेच कपडे घातलेलं चालतं, हे सुद्धा आपल्याला पहिल्यांदा कळलं. फॅशन टीव्हीवर जे बघायला रात्री चोरुन जागं रहावं लागायचं, तसलंच मटेरियल दिवसा ढवळ्या दाखवणं म्हणजे विषय हार्ड झालेला… चॅनेलचा.

दाराची कडी-बिडी चेक केली, परत येऊन बसलो तेवढ्यात कसलं तरी वेगळंच गाणं लागलं. यात सगळं सभ्य चित्र होतं. फॅशन टीव्हीवरुन एकदम झी टीव्हीचा फिल आल्यानं आपण गंडलो असं वाटलंच होतं, मग समजलं हे एफ टीव्ही नाय हे गाण्यांचं चॅनेल ए.

आपल्याला एक शब्द न कळणारी पण बघायला भारी वाटणारी गाणी, टिपिकल बॉलिवूड सॉंग्सला कल्टी देऊन मार्केट गाजवणारी इंडी पॉप.. असा सगळा कारभार होता.

चॅनेल व्ही मार्केटमध्ये आलं, ते स्टार इंडियामुळं. MTV ला टक्कर देण्यासाठी स्टारनं १९९४ मध्ये आपलं २४ तास गाणी वाजवणारं चॅनेल सुरू केलं. नुसती बॉलिवूडची गाणी दाखवण्यात तशी काय मजा नव्हती, मग चॅनेल व्हीनं त्याला तडका दिला. अध्येमध्ये आपल्या फ्युजा उडवणारं एखादं इंग्लिश गाणं वाजू लागलं, इंडीपॉपला मार्केट कुणी दिलं असेल, तर चॅनेल व्ही.

लेसली लुईस आणि हरिहरनचं ‘काय झालं’ असेल किंवा कवळ्या शाहिद कपूरचं ‘आँखो में’… आपली गाण्यातली टेस्ट चॅनेल व्ही मुळंच सुधारली.

आता नुसती गाणी वाजवली असती, तर काय वेगळं बघण्याची फिलिंग आली नसती. त्यामुळं चॅनेल व्हीनं नवे कॅरॅक्टर्स आणले. कुठलीही जाहिरात लागायच्या आधी, Brought to you Bai असं म्हणत एका मराठमोळ्या बाईचं कार्टून यायचं (पण ही बोलायची हिंदीत.)

WhatsApp Image 2022 03 30 at 8.58.09 PM
चॅनेल व्हीची बाई

जाहिराती संपल्या की बाईच्या आवाजात एक लाईन यायची, ‘इतने पैसे में इतनाहीच आता है..’

खुंखार आंटी 303, हरियाणवी बोलणारा उधम सिंग, साऊथ इंडियन काउबॉय (त्यात हा गडी शाकाहारी) क्विक गन मुर्गन, आपल्या दिलीप प्रभावळकरांनी साकारलेला ‘घेऊन टाक’ म्हणणारा डिटेक्टर  जावळकर, माचो आणि बँजो नावाचे पंजाबी बोलणारे कार्टून्स, चष्मा, साडी आणि गजरा अशा टिपिकल लूकमध्ये समोर येणारी लोला कुट्टी असा भरपूर मसाला चॅनेल व्ही कडे होता.

त्यांची कॅरॅक्टर्स इतकी गाजली, की उधम सिंग आणि क्विक गन मुर्गनवर नंतर पिक्चरही निघाले.

WhatsApp Image 2022 03 30 at 8.49.34 PM
लोला कुट्टी

लोला कुट्टी तरी कॅरॅक्टर होतं, पण चॅनेल व्हीमध्ये व्हिडीओ जॉकी म्हणून काम करणारे अनेक कार्यकर्ते पुढं जाऊन सुपरहिट ठरले. उदाहरण म्हणून ही नावंच बघा- आता क्रिकेटवाला झालेला गौरव कपूर, आशिकी टू मधला राहुल- आदित्य रॉय कपूर, पार हॉलिवूडपर्यंत पोहोचलेला पूरब कोहली, छान सुंदर अँकर श्रुती सेठ… अशी लय मोठी लिस्ट ए.

‘चॅनेल व्ही’नं गाणी आणि काही मिनिटांचे शो दाखवण्याची आपली परंपरा कायम ठेवली होती. मात्र त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला, की आपलं चॅनेल आता तरुणांना आकर्षित करेल असे (म्हणजे तशा आशयाचे) शोज दाखवणार.

पुढच्या चार वर्षात त्यांनी असे कित्येक शोज आणले. ज्याचा सगळ्यात मोठा चाहतावर्ग होता, नुकतीच मिसरूड फुटलेली पोरं आणि जिंदगीत पहिल्यांदा ब्युटी पार्लरच्या खुर्चीवर बसलेल्या पोरी. ‘गुमराह’ या शो मधून कितीही प्रेमात फसवून मडर झालेल्या स्टोऱ्या दाखवल्या, तरी दिल दोस्ती डान्समध्ये स्वयम आणि शॅरॉनचा रोमान्स बघून पोरा-पोरींचा केमिकल लोचा व्हायचाच.

WhatsApp Image 2022 03 30 at 8.55.40 PM
स्वयम आणि शॅरॉन

डेअर टू डेट मधून त्यांनी लोकांच्या खुंखार डेट्स दाखवल्या, सड्डा हक होतं, पण दिल दोस्ती डान्स लई गाजलं. कित्येकांनी त्यातली स्टाईल कॉपी केली, पोरी पटवण्याचे अपयशी प्रयत्न केले आणि आठवण म्हणून आपल्या पोरांची नावं रेयांश ठेवली.

पुढं साधारण २०१६ च्या दरम्यान चॅनेल व्हीनं पुन्हा गाण्यांचं चॅनेल म्हणून मार्केटमध्ये उतरायचं ठरवलं, इथं मात्र त्यांचा कार्यक्रम गंडला.

पोरांच्या हातात मोबाईल आले होते, मनात येईल ते गाणं लावता येणं शक्य होतं. त्यामुळं कोण गाण्यांची वाट बघंना, हळू हळू चॅनेल व्हीचा टीआरपी ढासळत गेला आणि जशी आपल्या आयुष्यातून आयेशा चिनॉय गेली, तसंच चॅनेल व्ही सुद्धा.

जाहिराती मिळत नव्हत्या, अर्थकारण गंडलं आणि चॅनेल व्ही बंद झालं. आता हॉटस्टार आणि युट्युबवर काही कार्यक्रम असतात पण ते बघायला फील येणार नाय…

चॅनेल व्ही वर एखादं कडक गाणं किंवा शो लागलाय, आपला एक डोळा टीव्हीत आणि दुसरा कोण येतंय का बघण्यात गुंतलाय आणि सहीसलामत बघून झालंच तर जे पाहिलं ते मीठमसाला लावून मित्राला सांगण्यात जी जन्नत होती, ती आता कशालाच येत नसते… लोला कुट्टीची शप्पथ!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.