३० हजार रुपयांची लाच देवून ऋषी कपूरने फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला होता

चित्रपटातील कलावंत ज्यावेळी आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे आत्मचरित्र लिहितात; त्या प्रत्येक वेळी त्यांचे आत्मचरित्रा मध्ये सर्व कथन प्रामाणिकपणाने केलेले असतेच असे नाही. परंतु काही कलाकार मात्र आपल्याकडून कळत-नकळतपणे झालेल्या चुकांची कबुली देतात.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लमखुल्ला’ या आत्मचरित्रात अशीच एक कबुली दिली होती.

त्याचाच हा किस्सा.

ऋषी कपूर राज कपूर यांचे द्वितीय सुपुत्र ! रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून झाला. या चित्रपटात त्यांनी बालपण आणि तारुण्य या मधल्या अडनिड्या वयाच्या मुलाची अतिशय सुंदर अशी भूमिका केली होती.

पौगंडावस्थेतील प्रेम ऋषी कपूर ने फार सुंदर रीतीने दाखवले होते. या प्रसंगात त्याच्यासोबत अभिनेत्री सिमी गरेवाल होती. विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यातील नाजूक नात्याचा वेध राज कपूर यांनी फार सुंदर रीतीने घेतला होता.

ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे तर या टेकिंगवर इतके खुश झाले होते त्यांनी राजकपूर सुचवले होते,’मेरा नाम जोकर’ च्या सुरुवातीच्या या कोवळ्या वयातील प्रेम कहाणीला तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर पडद्यावर आणले तर जगावेगळी एक अनोखी प्रेम कहानी होईल! अर्थात राज कपूर तसे केले नाही पण ‘टीनएज लव्ह स्टोरी’ हा विषय त्यांच्या डोक्यात फिट्ट झाला.

अतिशय मनापासून बनवलेला त्यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला. करोडो रुपयांचे नुकसान झालं त्यामुळे त्यांचा आर के स्टुडिओ गहाण ठेवावा लागला.

त्याच्यापाठोपाठ आलेला ‘कल आज और कल’ हा चित्रपट रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट देखील बर्‍यापैकी बनला होता पण भारत-पाकिस्तानचे १९७१ सालचे युद्ध झाल्याने, त्या वर्षी रात्रीचा शो सर्व देशभर बंद असल्यामुळे या सिनेमाला देखील अपयशाला सामोरे जावे लागले.

या चित्रपटात रणधीर कपूरला सहाय्यक म्हणून ऋषी कपूर याने दिग्दर्शनात साथ दिली होती. यानंतर राजकपूर यांच्यापुढे आरपारची लढाई होती. त्यांना पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचे होते आणि त्यातूनच ‘बॉबी’ या चित्रपटाची निर्मिती झाली.

 ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया हि तरुण फ्रेश जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

पहिल्यांदाच शंकर-जयकिशन चे साथ सोडून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना आर के कॅम्पसमध्ये आणले होते. त्यांची गाणी देखील तुफान लोकप्रिय ठरली होती. १९७३ साली राज कपूरच्या ‘बॉबी’ ने मोठा तहलका निर्माण करून प्रचंड असे यश मिळवले होते. या चित्रपटाच्या वेळी ऋषी कपूर यांचे वय अवघे २१ वर्ष होते. (जन्म ४ सप्टेंबर १९५२) चित्रपट प्रदर्शित झाला हिट झाला आणि नाही म्हटलं तरी ऋषी कपूर च्या डोक्यात यशाची हवा गेली होती.

चित्रपटाला लोकमान्यता मिळाली होती आता त्याला राजमान्यता हवी होती. त्यावेळी फिल्मफेअर पुरस्काराची मोठी हवा असायची. आपल्याकडचे ऑस्करच त्याला समजले जायचे ! याच काळात ऋषी कपूर यांना एक व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने “तुम्ही मला तीस हजार रुपये द्या मी तुम्हाला ॲवॉर्ड मिळवून देतो” असे सांगितले.

ऋषी कपूर चे वय त्यावेळी सारासार विचार करणारे नव्हतेच. त्याने त्याच्या पीए ला याबाबत विचारले त्याने देखील “पैसे द्या आणि अवार्ड घ्या” असा सल्ला दिला. ऋषी कपूर ने त्या व्यक्तीला तीस हजार रुपये दिले. आता त्या व्यक्तीने खरोखरच ते पैसे त्या संस्थेला देऊन अवार्ड विकत घेतले की पैसे स्वत:च्या खिशात घातले नाही हे कुणालाच माहिती नाही.

कदाचित ऋषी कपूरला हा पुरस्कार मिळणार हे त्या व्यक्तीला खात्रीने ठाऊक झाले असावे आणि या निमित्ताने ऋषी कडून पैसे वसूल करता येतील असाही विचार त्या व्यक्तीच्या डोक्यात आला असावा!

खैर, यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारासाठी जी नामांकन होती त्यामध्ये ‘यादोंकी बारात’ साठी धर्मेंद्र , ‘जंजीर’ करिता अमिताभ बच्चन, ‘कोशिश’ या चित्रपटा करीता संजीव कुमार आणि ‘दाग’ या चित्रपटासाठी राजेश खन्ना असे तगडे स्पर्धक ऋषीकपूर समोर होते. अमिताभ बच्चन यांना ‘जंजीर’ करिता हा पुरस्कार मिळेल असे सर्व रसिकांना वाटत होते.

पण या सर्वांवर मात करीत ऋषी कपूर यांना त्यांच्या ‘बॉबी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला !

ऋषी कपूर यांना मात्र ही खंत कायम सलत होती आपण पैसे देऊन हा पुरस्कार विकत घेतला ही जाणीव त्यांना कायम टोचत होती.

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या नात्यांमध्ये देखील काही काळ यामुळे दुरावा आला होता. या दोघांचा एकत्रित पहिला चित्रपट ‘कभी कभी’ हा १९७६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे परस्परांशी चकार शब्द बोलत नव्हते..! पण नंतर काही वर्षांनी यांच्यातील दुरावा मिटला आणि पुढे ‘अमर अकबर अँथनी’, ‘नसीब’ आणि ‘कुली’ या चित्रपटात या दोघांनी बहारदार अभिनयाची जुगलबंदी केली!

अगदी अलीकडे ‘ १०२ नॉट आऊट’ या चित्रपटात देखील या दोघांचा एकत्रित अभिनय पाहायला मिळाला. हे सर्व काही होत असताना कुठेतरी ऋषी कपूरला आपण आयुष्याच्या सुरुवातीला एक मोठी चूक केली आणि पैसे देऊन पुरस्कार विकत घेतला हे टोचणी मनाला खात होती.

२०१६ साली ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या नावाने आपले आत्मचरित्र लिहिले.

या आत्मचरित्राच्या लिखाण मीना अय्यर यांनी केले होते. या पुस्तकात त्यांनी आपल्याकडून नकळतपणे झालेल्या चुकीचा उल्लेख केला असून याची टोचणी आपल्याला कायम होत असते असे लिहिले आहे आणि या कृत्याचा मला आता पश्चाताप होतो असे देखील सांगितले आहे. अजाणतेपणे अविचाराने लहान वयात त्याच्याकडून ही चूक झाली.

पण ऋषी कपूरचे मन मोठे म्हणायला पाहिजे कारण त्यांनी शेवटी आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख करून आपल्याला पश्चाताप होतो आहे या भावना व्यक्त केल्या.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.