पावसाला बोलवण्यासाठी कोणकोणत्या प्रथा महाराष्ट्रात आहेत?

जून सुरु झालाय, पावसाळा तोंडावर येऊन उभा राहिलाय. काल तशी काही ठिकाणी वळीवाने एंट्री मारली पण अजून महाराष्ट्रभर अत्तराची कुपी सांडायची आहे. खरिपाच्या तयारीला लागलेला शेतकरी आभाळाकड डोळे लावून बसलाय. धरण आटली आहेत, पुण्यामुंबईसारख्या शहरात पाणीकपातीची वेळापत्रक बघून चाकरमान्याना घाम फुटतोय. नळावरच्या बायकांपासून ते मोठमोठे पुढारी पाण्याच्या प्रश्नावरून भांडत आहेत.

अशात सध्या मार्केट मध्ये तेजी आहे ती हवामानतज्ञ आणि ज्योतिषविशारदाची.

पोरग नोकरीला कधी लागणार, पोरगीच लग्न चांगल्या घरात होणार का याच्या आधी यंदा पाउसपाणी कसं होणार हा प्रश्न पोपटवाल्याला विचारला जातो. गावातले म्हातारे भिडू पारावर बसून ७२च्या दुष्काळातन आम्ही काय काय सोसल होतं याच्या स्टोऱ्या रंगवून रंगवून सांगत असतात. गल्लीबोळातले हवामानतज्ञ पाउस आता केरळात आला वगैरे लाईव्ह लोकेशन सांगत असतात पण पावसाची गाडी काय लवकर पुढ सरकतच नाही.

मग गोरगरीब जनतेचा पेशन्स संपला की सुरु होतात पावसाला बोलवायच्या प्रथा. रुसून बसणाऱ्या बायकोपेक्षा जास्त समजूत या पावसाची काढावी लागते. या समजूत काढायच्या पद्धती जिल्हावार बदलतात. कालच कर्नाटकाच्या हळसुरु येथे पाऊस यावा म्हणून केलेल्या यज्ञाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यात दोन भटजी पाण्याच्या भल्यामोठ्या पातेल्यात बसून मोबाईलवर मंत्र म्हणताना दिसले.

मग आम्हालासुद्धा वाटलं कोणत्या प्रथेमुळे वरुणराजा खुश होतोय हे काय आपल्याला माहित नाही पण त्यातल्या काही मजेदार प्रथा कोणत्या हे मात्र आपल्या लाडक्या भिडूनां सांगितलंचं पाहिजे.

१.गाढवाचं लग्न-

पन्नालाल सोडला तर बाकीच्या सगळ्या गाढवानां जगभराने मूर्ख म्हणून शिक्का मारला आहे. पण हेच गाढव पावसाला बोलवायच्या कामी येतो. त्याच गाढवीणीचं लग्न लावून देण्यात येत. साध नाही तर भटजींनी मंगलाष्टका म्हणून अक्षता टाकून लग्न लावून देण्यात येत. डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या गाढवाची आणि त्याच्या बायकोची वाजंत्री लावून वरात काढण्यात येते.

कुठे कुठे गाढवाच्या ऐवजी बेडकांच लग्न लावतात, तर कुठे झाडांचं लग्न लावतात. आता ही लग्नं बघून पावसाला पडावस का वाटेल याच लॉजिक आम्हाला माहित नाही तुम्हाला माहित असेल तर भिडू वाचकांना नक्की कळवा.

(आजकाल मुलींची लोकसंख्या कमी झाल्यामूळ आमच्या वयाच्या पोरांच्या नशिबात लग्नाचा योग येईना आणि या पावसाच्या कृपेमूळ गाढवाच लग्न मात्र होऊन चाललय याचा णीशेध काही जणानी केलाय. )

२.शंकोबा-

ही प्रथा आढळते आमच्या पश्चिम महाराष्ट्रात. आता तुम्ही म्हणालं की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पाण्याच्या बाबतीत सगळ्यात सुखी, तर तसं काही नाही. आमच्या इथ पण विटा आटपाडी, माण खटाव, सांगोला सोलापूर अशा ठिकाणी बक्कळ दुष्काळ असतो. दुष्काळ आला की मग या प्रथा आल्या. यातलीच एक फेमस प्रथा आहे शंकोबा.

या शंकोबा मध्ये काय असत की एखाद्या वात्रट पोराला पकडलं जात, त्याचे सगळे कपडे काढून त्याला पूर्ण भोंगळा केला जातो. त्याच्या डोक्यावर पाट देतात, त्या पाटावर शेणाचा बनवलेला शंख असतो त्याला शंकोबा म्हणतात. आता या शंकोबाची गावभर वरात काढली जाते. ही प्रत्येकाच्या दारात थांबते, तिथे त्या घरची गृहलक्ष्मी त्याच्यावर पाणी घालते आणि पावसाला लवकर ये रे बाबा म्हणून साकड घालते.

३. होम हवन यज्ञ भंडारा-

याचा कॉपीराईट कोणाकडेच नाही. क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकाव म्हणून यज्ञ करणारे आपण भारतीय पावसासाठी तर सगळ्यात पहिला यज्ञ मांडतोय. पूर्ण देश भर याचे वेगवेगळे वर्जन्स तुम्हाला बघायला मिळतील. पण सगळ्यात फेमस आहे “पर्जन्य याग” उर्फ इंद्र यज्ञ. ऋग्वेदाच्या काळापासून म्हणे हा यज्ञ केला जातो. गुरुजी येतात, होम हवन करतात, त्यात तूप वगैरे आहुती करतात. कुठे कुठे भंडारा होतो, देवाबरोबर गावकरी सुद्धा चार घास खातात.

४.महादेवाला कोंडणे-

काही काही ठिकाणची लोक लई अग्रेसिव्ह. ते असल यज्ञ, नैवेद्य, भंडारा च्या नादी लागत नाहीत. ते डायरेक्ट देवाला पाण्यात कोंडतात. यात बहुतांशी सापडतो म्हणजे भगवान शम्भो महादेव. काही काही वेळा विठोबा, मारुती पण असतात पण भक्तांना पण माहित असत की असा हट्ट फक्त भोलेबाबा कडेच करता येऊ शकतो.

 प्रथेनुसार सगळ्यात आधी मंदिराचा गाभारा चिखलाने लिपून काढला जातो. तिथे पिंड बुडेपर्यंत पाणी सोडलं जात, अख्खा गाभारा पाण्याने भरला जातो. देवळाची दारखिडक्या लॉक करतात आणि देवाला ब्लकमेलिंगच्या शब्दात सांगतात की,

 “बाबा पाउस पाड नाही तर तुला पाण्यातून बाहेरच काढणार नाही.”

नुसता म्हणत नाहीत तर खरोखर महादेवाची पिंड पाउस पडे पर्यंत पाण्यात ठेवली जाते. भोलेबाबा अखेर प्रसन्न होउन म्हणा किंवा वैतागून म्हणा त्या गावावर पाउस पाडतात.

५.धोंडी धोंडी पाणी दे-

विदर्भामध्ये धोंडी हा प्रकार पाहायला मिळतो. यात काय होतं गावातील दोनजण अंगावर फक्त लिंबाचा पाला गुंडाळतात, हातात एक काठी घेतात, त्याला एक बेडूक उलटा लटकवून खांद्यावरून त्याची वरात काढतात.

“धोंडी धोंडी पाणी दे , धोंडीचं दिवस पाणी मोठ हिवस,

साळ सुकं, कोंबड भूकं इच्केल बेडकी पाणी दे   “

हे गाण गात ही वरात गावभर हिंडते. ते जिथे जातील तिथे या वरातीवर पाणी टाकलं जातं. शेवटी गावच्या मंदिरात देवावर पाण्याचा अभिषेक करून भंडारा घातला जातो. जुनी माणस म्हणतात की धोंडी मागितली की त्याच्या दुसऱ्या दिवशी पाउस येतो.

dhondi dhondi 2017083932
सौजन्य लोकमत

अशा अनेक प्रथा महाराष्ट्रभर आहेत. आता या प्रथामुळे पाउस पडतो का हे माहित नाही पण अजून थोडे दिवस पावसाची वाट बघायची हिमंत तरी येते हे नक्की. काही जण आजही म्हणतात एवढे अंधश्रद्धावाले उद्योग करण्यापेक्षा पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, पाणी फौंडेशन असल्या प्रथा पाडा, नक्की पाउस येईल.

बाकी सगळ्यात चाप्टर तर आपण बारक असताना होतो . पाउस येत असलेला दिसला की लगेच त्याला लाच देत होतो आणि तो पण बिचारा गंडत होता.

“येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाउस आला मोठा”

(या लेखासाठी जेष्ठ पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे यांच्या ‘हवा पाणी आणि अभि’ या ब्लॉगवरून संदर्भ घेण्यात आले आहेत. )

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.