राज कपूरने सुरु केलेला आरके स्टुडिओचा गणेशोत्सव ७० वर्षे टिकला….

बॉलिवूड आणि सणवार यांचं एक वेगळं  कॉम्बिनेशन आहे. गणपतीची भव्य दिव्य स्वरूपातली गाणी, ढोल ताशांवर फिरणारे कॅमेरे, सगळीकडे एक वेगळाच माहोल असतो. यात बॉलिवूड सेलेब्रिटींचा बाप्पा हा ट्रेंड भयंकर फिरत असतो. कोणत्या सेलिब्रिटीने गणपती बसवला, कोणत्या सेलिब्रिटीने मोदक केले, कोणत्या सेलिब्रिटीने मराठीत शुभेच्छा दिल्या हे सगळं आपण वाचत पाहत असतो.

यात सगळ्यात मोठी गणेशोत्सवाची परंपरा कुणाला असेल तर ती म्हणजे आर के स्टुडिओला. राज कपूर यांनी १९४८ साली चेंबूर, मुंबईत आर के स्टुडिओ उभारला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एक वर्षानंतर राज कपूर यांनी आर के फिल्म कंपनीचं आर के स्टुडिओमध्ये रूपांतर केलं. त्यावेळी आर के स्टुडिओ म्हणजे दर्जेदार सिनेमे आणि हिट कन्टेन्ट यावर आधारित होता. त्यामुळे तिथले सिनेमे सुपरहिट होऊ लागले होते. 

राज कपूर यांनी चेंबूरमध्ये हा स्टुडिओ सुरु केला आणि इथल्या मराठी भाविकांची गणपतीवरची श्रद्धा बघून त्यांनीही आर के स्टुडिओचा गणपती बसवायला सुरवात केली. एकदम मराठमोळ्या पद्धतीने इथे श्रीगणेशा झाला. आपलं स्टारपण बाजूला सारून यात राज कपूर गणपतीच्या बाबतीत स्वतः आघाडीवर होते. गणपतीच्या दिवसात गणपतीपूजा वैगरे मोठ्या धुमधडाक्यात चालायची.

पुढे कपूर कुटुंबियातील लोकं यात ऍड होत गेली आणि पिढी दर पिढी हि परंपरा जोपासली जाऊ लागली. राज कपूर गेल्यानंतर पुढे राजीव कपूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि नंतर रणबीर कपूर यांनी हि परंपंरा पुढे चालू ठेवली. आर के स्टुडिओच्या गणेशोत्सवाला होणारी गर्दी हा कायम लोकांसाठी आकर्षणाचा विषय असायचा. तुफ्फान गर्दी गणपती आणतानाही असायची आणि गणपती विसर्जनाच्या दिवशीही असायची.

राज कपूर यांचे चाहतेसुद्धा भरपूर होते आणि नंतर नंतर जसा जसा कपूर कुटुंबाचा उत्कर्ष होत गेला तसं तसं आर के स्टुडिओमधील गणेशोत्सवाचं स्वरूपही बदलत गेलं. ७० वर्षांची हि दीर्घकाळ चालणारी परंपंरा आर के स्टुडिओला होती. आर के स्टुडिओच्या गणपतीशी अनेकांचं जवळच नातं होतं. दरवर्षी अनेकजण बाहेरून आर के स्टुडिओच्या गणपतीच्या दर्शनाला यायचे. 

पण २०१८ साली आर के स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतला आणि हि ७० वर्षांची गणेशोत्सवाची परंपंरा थांबली. आर के स्टुडिओची पडझड आणि त्यानंतर तो सांभाळण्याचा काहीच प्रयत्न झाला नाही त्यामुळे आर के स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतलेला होता. २०१८ सालच्या आर के स्टुडिओच्या शेवटच्या गणेश चतुर्थीला आणि विसर्जनाला सगळं कपूर कुटुंबीय जमा झालं होतं. या कपूर फॅमिली तर होतीच शिवाय आर के स्टुडिओजची तंत्रज्ञ टीम, कामगार सुद्धा यात सामील होते. 

राज कपूर यांनी सुरु केलेला ७० वर्षांच्या परंपरेचा हा २०१८ साली शेवट झाला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.