अजिंठ्याचा इतिहास जगासमोर आणणारा पारोचा देवदास अर्थात रॉबर्ट गिल

11 जुलै 2021च्या सकाळी जळगावमध्ये सकाळपासून पाऊस सुरू झाला होता. आम्ही निघून भुसावळला जाईपर्यंत पावसाने चांगलाच वेग पकडला होता. नव्यानेच झालेल्या चारपदरी मार्गावर सगळीकडे पाणीच पानी पसरले होते. वाहने पार्किंग लाइट लाऊन हळुवार जात होती.
 
भुसावळच्या रेल्वे डीआरएम कार्यालयाच्या थोडे पुढे गेले की रस्त्याला लागूनच कॅथॉलिक सीमेट्री आहे. ब्रिटिश कलावधीतील अनेक युरोपियनांच्या समाध्या या ठिकाणी आहेत.
आम्ही पोहचलो तेव्हा पाऊस थांबला होता. सीमेट्रीचा दरवाजा बंद होता पण आम्हाला पाहताच तेथे अनेक वर्षांपासून कामाला असणारे इंगळे नावाचे गृहस्थ लगेचच आले. दरवाजा उघडून आत गेलो. किमान मी तरी पहिल्यांदाच एखाद्या ख्रिश्चन सीमेट्रीमध्ये पाय ठेवत होतो. आत सगळीकडे गवत व झाडे वाढलेली होती. अर्थात मधला मार्ग चांगल्या स्थितीत होता. त्यावरून चालत आम्ही थोडे पुढे गेलो आणि डाव्या बाजूला असलेल्या एका कबरीजवळ थांबून इंगळे म्हटले की हीच ती कबर.
होय, हीच ती कबर होती जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील चित्रे ज्याच्यामुळे पहिल्यांदा जगापुढे आली प्रसिद्ध झाली त्या रॉबर्ट गिलची. स्थानिक पारो नावच्या आदिवासी युवतीच्या प्रेमात असणार्‍या देवदासची.
SAVE 20210716 084955
28 एप्रिल 1819 रोजी जॉन स्मिथ नावाचा एक यूरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर अजंठाच्या या परिसरात आला आणि आता प्रसिद्ध असलेल्या व्यू पॉइंटवरून त्याला 10व्या क्रमांकाच्या लेणीची कमान दिसली. ही अजिंठा लेणीच्या शोधाची सुरुवात होती. अर्थात येथील आजूबाजूच्या स्थानिकांना याची माहिती होती पण जगासाठी हा मौल्यवान ठेवा लपलेला होता. जॉन स्मिथने या लेणीचा शोध लावल्यानंतर पुढील 24 वर्ष काहीच झाले नाही. पण ब्रिटीशांच्या शिरस्त्याप्रमाणे अहवाल तयार झाले. अभ्यास झाला. अखेर 1844 मध्ये कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिलची नियुक्ती अजिंठ्यावर केली.

कोण होता रॉबर्ट गिल?

26 सप्टेंबर 1804 ला लंडनच्या बिशपगेट येथे रॉबर्ट गिलचा जन्म झाला.गिल वयाच्या 19 व्या वर्षी पी.पी.ग्रेलीमर यांच्या शिफारशीने जेम्स पॅटीस यांच्या आदेशानुसार मद्रास येथील इस्ट इंडिया कंपनीच्या ‘‘44 मद्रास नेटिव्ह या सैन्य दलात’’ भरती झाल्यानंतर भारतात आला. मद्रास आर्मीत तो एक कॅप्टन होता. 1843 पर्यन्त त्याने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी काम केले. तो लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाइड आर्टिस्ट होता.
रॉबर्ट गिलची अजिंठा येथे नियुक्ती-  कोर्ट ऑफ द डायरेक्टर्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून 1 ऑक्टोबर 1844ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली. त्यात त्याला एक सहाय्यक ड्राफ्समन व तीन स्थानिक कुशल कारागीर ठेवण्याचे अधिकार दिले. त्याने वेल्लोरमधला एक निष्णात चित्रकार सहायक म्हणून मिळविला.  रॉबर्ट गिलची या कामासाठी निवड करताना केलेला शिफारशी शेरा असा आहे,
‘‘आलेखकार म्हणून कॅप्टन गिलचे कौशल्य सर्वविदित आहे. प्रस्तावित काम जोखमीचे आहे. ते निभावताना साहसी आयुष्य जगण्याची ओढ पाहिजे. कॅप्टन गिलची कलाकारी साहसाची जी धारणा आहे त्याचा या कामगिरीशी अगदी मेळ बसतो.’’
अजिंठा येथे आगमन – 13 मे 1845 ला सतरा सुरक्षा जवानांसह रॉबर्ट गिल अजिंठ्याला आला. असाईच्या लढाईच्या वेळी जिथे ड्यूक ऑफ वेलिंग्टन राहात होता तोच बंगला निवासाकरिता गिलला दिला गेला. (काही ठिकाणी असा उल्लेख आहे की, अजिंठा येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात तो राहत असे. त्या ठिकाणी आज ग्रामीण रुग्णालय अस्तीत्वात आहे. त्यासमोरील प्रवेशद्वारावर असलेल्या इमारतीत रॉबर्ट गिल अनेक वर्ष राहिला. त्याला स्थानिक लोक गिल टोक म्हणून ओळखतात.)  तो १३ मे १८४५ रोजी पोहोचला. त्यानंतर चार महिन्यांनी सप्टेंबरमध्ये चित्रांच्या गरजेचे साहित्य पोहोचले.

रॉबर्ट गिलपुढील आव्हाने व त्याचे काम –  

गिलचा  हा मुक्काम औरंगाबादपासून ६३ मैलांवर किंवा जालन्यापासून ५४ मैलांवर होता. टपाल घ्यायला किंवा द्यायला, सामानसुमान खरेदीला, पाठविलेली वस्तू मिळवायला किंवा पाठवायला एवढे अंतर तुडविण्याखेरीज तरणोपाय नव्हता. त्याला नेमून दिलेले काम चांगलेच कठीण होते. तेही अनेक अर्थाने. उष्ण कोरडी हवा, दिवस चढावा तसतसे वाढणारे रणरण तापमान. रोज तेथून वाघिरा दरीपर्यंत यायचे. टेकाडे तुडवून लेण्यांशी पोहोचायचे. जनावरांचे भय आणि वाटेवरचा चोराचिलटांचा उपद्रव नेहमीचाच.
गिल आणि त्याचा चमू यांची तिथली रोजची हजेरी म्हणजे तर भिल्लांच्या दृष्टीने त्यांच्या मुलुखात केलेली घुसखोरीच! ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गिलबरोबर शरीररक्षक देण्याची शिफारसदेखील केलेली होतीच.
प्रवासाची यातायात इतकी की, कित्येकदा एखाद्या जरा बऱ्या गुंफेमध्येच तो आठ-दहा दिवसांसाठी मुक्काम करीत असे (फग्र्युसनने लिहिलेल्या वृत्तांतानुसार क्रमांक वीसची गुंफा). या सगळ्या जिकिरींची त्याला पूर्वकल्पना दिलेली होती. त्यात स्पष्ट लिहिले होते,
‘‘अनेक गुंफांमध्ये इतका अंधार आहे की झगमग दिव्यांखेरीज तिथले काहीही दिसणार नाही. काहींची छताची उंची इतकी आहे की शिडीवजा मचाण बांधूनच तेथील चित्रे दृग्गोचर होतील. काही गुंफांमध्ये चिखल-पाण्याचा  बुजबुजाट आहे. तिथे वायुविजन शून्यवत असते. एकूण वातावरण मलिन आणि रोगट आहे. मधमाश्यांची मोहोळे आणि वाघुळांचे थवे आहेत. भिंती आणि छतावरील ही राड आणि डागाळणाऱ्या मोहोळांचा निचरा केल्याखेरीज चित्रे दिसणार नाहीत.’’
त्याच्या हातातली चित्रसामग्री अर्थातच मूळ चित्रांपेक्षा अगदीच निराळी होती. त्याच्या किन्तानी पटाचा आकार मूळ चित्रांपेक्षा अर्थातच सरासरीने लहान होता. मूळ चित्रांबरहुकूम चित्रांमधली प्रमाणे तर राखायची, पण त्यातले तपशील सुटू द्यायचे नाहीत. (खरे तर निदान नजरेस पडू शकतात तेवढे तपशील तरी) प्रकाशाची मात्रा, रंगांची ठेवण, छटांचे मिश्रण असा सगळा तोल सांभाळण्याची बिकट कसरत साधायची होती. म्हटले तर चित्राचे चित्र, पण तरी मूळ चित्राचे लघुरूप. काही अगदी ‘लघु’ नव्हती. ९० चौरस फुटांचे किन्तान लागणारीदेखील होती.

त्याने बहुतेक गुंफांचे नकाशे बनविले. अनेक चित्र/ शिल्पांतील आकृतींचे साधे सुटे रेखाटन करून केले. 

त्याची आणखी एक अडचण होती. या चित्रांतले प्रसंग, त्यामागची प्रेरणा आणि धारणा, त्यांचा गर्भितार्थ हे उमगावे तरी कसे? त्याचे आकलन होईल असे जे काही वाङ्मय असेल ते मला पाठवा असे त्याने लिहिलेदेखील. पण त्या काळात बुद्धचरित्र, इतिहास, जातककथा, त्यातील प्रसंग असे सहजसुगम आकलन आणि माहिती तुटपुंजीच होती. जी होती ती या चित्रांत कशी उमटली याची तर सुतराम जाणीव नव्हती.
हे अवजड काम पूर्ण करायला किती काळ लागणार? प्रारंभी गिलला वाटत होते की सुमारे अठरा महिने लागतील! तिथले अडथळे आणि अडचणींचा डोंगर त्याला अजून पुरेसा कळला नव्हता! त्याचे काम हरप्रकारच्या अडचणींनी रेंगाळणार होते. 
 
तिथली साफसफाई हे पहिले काम! पावसाळ्यात वाघिरा ओलांडणे आणि वर गुंफांमध्ये पोहोचणे मुश्कील म्हणून काम ठप्प! १८५२ साली तर त्याचे किन्तानी कापडच चोरीला गेले! थंडीमुळे चोरांनी ते पळविले होते! त्यात लेण्यांचा अर्धगोली पसारा! त्यामुळे दिवस चढावा तसतशी प्रत्येक लेण्यांमधील सूर्यप्रकाशाची ठेवण बदलायची. तसे काम करण्याची गुंफा बदलणे भाग पडायचे. उंचीवरील रेखाटने मचाणावरती पाठीवर झोपूनच करावी लागायची. 
१८५३ नंतर धाडलेल्या अनेक अहवालांमध्ये थकवा, आजारपण, रोगराई, औषधांची वानवा याबद्दल अनेकवार तक्रारी आहेत. 
एकदा चित्र पूर्ण झाले की त्यांचे तेल आणि रंग वाळायला दीड-दोन महिने जायचे. मग ते गुंडाळी करून टिनच्या डब्यात भरायचे. मुंबईमार्गे मद्रासला धाडायचे. कधी मूळ ‘हात देण्या’तील कमतरता व्हायची तर कधी हवा अतिकोरडी व्हायची, कधी सुरळी डब्यात भरताना हेळसांड व्हायची यामुळे काही चित्रांना चिराळलेपणा यायचा.

गिलच्या अजंठ्याच्या चित्रांचे प्रदर्शन –

त्याने पाठविलेल्या रेखाटनांची, त्यावरून लाकडात खोदलेल्या उठावचित्रांची प्रसिद्धी आणि वाहवा होऊ लागली होती. क्रिस्टल पॅलेसमध्ये अनेक प्रकारची प्रदर्शने भरविली जात असत. नोव्हेंबर 1846 ला रॉबर्ट गिलने अजिंठ्याच्या आठ चित्रकृतींचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. लंडनच्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे सन 1851 ला त्याच्या अजिंठ्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील हा ठेवा सर्वप्रथम जगासमोर आला.
रॉबर्ट गिलच्या एकूणच कामगिरीची दखल घेऊन 1 एप्रिल 1854 ला त्याला लष्करातील मेजर पदावर पदोन्नतीही देण्यात आली.
या सर्व घडामोडींनंतर रॉबर्टने चित्रनिर्मितीच्या कामातील दुसरा टप्पा सुरू केला. त्याच्या या चित्रनिर्मितीच्या दोन वर्षांत (1854-55) भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या म्युझियमला १८५३ साली क्रिस्टल पॅलेस कंपनीच्या संचालकांनी रीतसर विनंती केली.
‘‘भारतीय कला आणि रूढींवर आधारित वेगळे दालन प्रदर्शनात असेल. त्यामध्ये कंपनीच्या संग्रहातील अजिंठा गुंफांची चित्रे प्रदर्शनामध्ये ठेवली गेली तर ती पाहण्याचा अनेकांना लाभ मिळेल. फार मोठ्या प्रमाणावर ती बघितली जातील.’’
या चित्रांचा कौतुकमय उदोउदो झाला. त्या काळात ओवेन जोन्स नावाचा ख्यातकीर्त वास्तुकार आणि नक्षीकार होता. १८५६ साली त्याने दुनियाभरच्या दागिन्यांचे सजावटी नमुने असलेले ‘ग्रामर ऑफ ऑर्नमेन्ट’ हे गाजलेले पुस्तक लिहिले. त्यातली भारतीय नक्षीकामाची उदाहरणे गिलच्या ‘अजिंठा चित्रां’वरून बेतलेली होती! त्याच सुमाराला प्रवाशांसाठी ‘भारतदर्शन’ मार्गदर्शक पुस्तक निघाले; त्यातदेखील ही लेणी आणि तेथे तळ ठोकून राहिलेल्या गिलचा उल्लेख होता.
या धाडसी कलाकारीचे आपल्याला यथोचित श्रेय मिळावे अशी गिलची स्वाभाविक इच्छा आणि आकांक्षा होती. फग्र्युसनने हे प्रदर्शन पाहिले होते. त्याला या चित्रांचे अपार मोल वाटत होते. परंतु तो प्रदर्शनातील मांडणीवर फार नाराज झाला होता. तेथील प्रकाश यथोचित नसावा. खेरीज ही कुठली चित्रे आहेत? त्यांचे मूळ प्राचीनपण किती? त्यांचा संदर्भ काय? आणि महत्त्व काय? याची काही ओळखदेख न करताच ती मांडली गेली होती, अशी तक्रार त्याने नमूद केली आहे.

चित्रे जळाली-  

१८६६ साली या क्रिस्टल हॉल नावाच्या भव्य वास्तूमध्ये मोठी आग लागली आणि गिलची ही तपश्चर्या एका फटक्यात भस्मसात झाली. त्यांचे कोठलेच छायारूपदेखील मागे शिल्लक नव्हते. कोणकोणती चित्रे गमावली हे सांगणेदेखील मुश्कील होते. हा काळ भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट होता. एकीकडे 1857 च्या उठावाने कंपनी जेरीस आलेली असतांना अखेर 1858 पासून राणीच्या जाहीरनाम्याने कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिशांची प्रत्यक्ष सत्ता अस्तीत्वात आली.
भारतात एकीकडे सुरू असणार्‍या या प्रचंड मोठ्या राजकीय सामाजिक उलथापालथीचा रॉबर्ट गिलसारख्या अवलियावर काहीही परिणाम झाला नव्हता. तो अजून अजंठ्याच्या चित्रातच बुडालेला होता.
१८५८ नंतरसुद्धा उरलेसुरले काम आणि खूप पैसे मिळतील या आशेतला बेदरकार छांदिष्टपणा यात रमलेला गिल तिथेच राहिला होता. थोडाफार कर्जबाजारी झाला होता. सन 1857 ला त्याने स्वत:हून फोटोग्राफीचा अभ्यास सुरू केला. त्याने मागविलेल्या नव्या धाटणीच्या कॅमेऱ्याने त्याने घेतलेले अनेक फोटो होते. तेही त्याला जरा पडत्या किमतीला कंपनीला विकावे लागले! काही फोटो, रेखाटने आणि अपघातवशाने मद्रास डेपोत पडून राहिल्याने दहा चित्रे बचावली

आता फोटोग्राफीकडे- 

सन 1857 ला त्याने स्वत:हून फोटोग्राफीचा अभ्यास सुरू केला. याच कालखंडात त्याने अजिंठ्याची 29 चित्रे साकारली. त्यातले शेवटचे चित्र जुलै 1863 ला त्याने पूर्ण केले. डिसेंबर 1866 ला तो अजिंठ्यात असताना त्याची चित्रे जळाली, त्यातली 1850 ते 1854 या कालखंडातील पाच चित्रे शिल्लक ती www.vam.ac.uk (http://collections.vam.ac.uk/item/O115446/oil-painting-copy-of-painting-inside-the/) वेबसाईटवर आजही पाहायला मिळतात.
अजिंठ्याची चित्रकला आणि त्या अनुषंगाने रॉबर्ट गिलच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात घडलेल्या घटना हा त्याच्या आयुष्यातील एक टप्पा आहे. त्यानंतर त्याने 1863 ला 200 स्टेरीओग्राफिक प्रकाशचित्रांची 200 दृश्ये लंडनला पाठवली होती. या फोटोग्राफीच्या माध्यमातून अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लिम वास्तुकला यांची प्रकाशचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. त्याची नोंद ब्रिटिश लायब्ररीने घेतली आहे. 
आजही ब्रिटिश लायब्ररीच्या ऑनलाईन वेबसाइटवर ही प्रकाशचित्रे हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत. रॉबर्ट गिलच्या प्रकाशचित्रांमुळे हा ठेवा ख-या अर्थाने जगासमोर आला. ज्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. 1864 साली त्याच्या या प्रकाशचित्रांचा संग्रह असलेली “One Hundred Stereoscopic Illustrations of Architecture and Natural History in Western India, photographed by Major Gill”,, शब्दांकन वास्तुरचनाकार जेम्स फर्ग्युसन व याच प्रकारचा दुसरा छोटा खंड जॉन मुरॉय यांनी प्रसिद्ध केला, त्याचं नाव होतं “The Rock-Cut Temples of India, illustrated by seventy-four photographs taken on the spot by Major Gill”, याचंही शब्दांकन वास्तुरचनाकार जेम्स फर्ग्युसन यांनी केले होते.

इतर महत्वाचे कार्य- 

अर्थातच त्याचे काम केवळ अजिंठा या विश्वविख्यात नावापुरते सिमीत ठेवणे उचित ठरणार नाही. लोणार या जगप्रसिद्ध सरोवराची, अमरावतीच्या जवळ मेळघाटात असलेल्या जैन तीर्थक्षेत्र मुक्तगीरीच्या मंदिर-शिल्पसमूहाची सचित्र ओळख जगाला करून देणारा रॉबर्ट गिल हा जगातला पहिला प्रकाशचित्रकार आहे. www.users.globalenet.co.uk वर उपलब्ध माहितीनुसार 1867 ला तत्कालीन शासनाकडून रॉबर्ट गिलवर अजिंठ्याच्या फोटोग्राफीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1868 त्याला शासनाने डेलमियर लेन्सचा कॅमेरा व केमिकल्स दिली होती. अथक परिश्रमाने त्याने मार्च 1870 ला हे काम पूर्ण केले आणि 1872-73 ला हा ठेवा त्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारला दिला.

रॉबर्ट गिल व त्याची प्रियसी पारो –

1845 मध्ये अजंठा येथे आल्यानंतर अजिंठ्यात लेण्यांच्या उत्खननाचे कामही जोरात सुरू होते. हजारो मजुर या कामात गुंतले होते. यातच एक म्हणजे लेणापुर गावची आदीवासी पारो. परिसराची माहिती असल्यामुळे पारो गिल यांना मदत करायची. हळु-हळु या संबधांचे प्रेमात रूपांतर झाले. ग्रामस्थांना यास विरोध केला. दोघांत तब्बल 10 वर्षांचे सहजीवन होते. यामुळे ग्रामस्थांनी तिला विष पाजुन मारले असे एक कथा सांगते. तर पारोचा मृत्यु आजारपणामुळे झाल्याचेही सांगीतले जाते.

ना.धॊ. महानोरांचे खंडकाव्य “अजिंठा” – 

शिक्षक म्हणून मी जिंतुर येथे असतांना कवीमित्र श्री हरिष हातवटे यांनी मला प्रथम अजिंठा हा संग्रह वाचण्यास दिला. या वेगळ्याच कविता मी प्रथमच वाचत होतो. चौरस आकाराचे हे छोटेसे पुस्तक, त्यातील कविता आणि त्यातील पद्मा सहस्रबुद्धे यांची रेखाचित्रे छानच होती. महानोरांच्या काव्यात ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे एकामागोमाग एक प्रकरणे नाहीत पण त्यांनी ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करुन, कल्पनाशक्ती वापरुन एका तरल निर्मिती केली आहे. कविवर्य कुसुमाग्रजांची प्रस्तावनाही वाचनीय आहे. महानोरांचा हा संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर ही गिल पारोची कथा अजून सर्वदूर पसरली. तो पर्यंत पारो-रॉबर्टची प्रेमकथा फारशी प्रसिद्ध नव्हती.

अजिंठा चित्रपट –

 २०१२ मध्ये नितीन देसाईंचा “अजिंठा” चित्रपट आला आणि पारोच्या कथेला अजून प्रसिद्धी मिळाली. अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात, काठाकाठातला. झाडांच्या देठातला, रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला. या ना.धों. महानोर यांच्या कविताना चित्ररूप देऊन रुपेरी पडद्यावर आणले नितिन मनमोहन देसाई यांनी.
एक आर्टिस्टची नजर घेऊन बनविलेला हा चित्रपट मराठी चित्रपटातील वेगळ्या विषयावर बनविल्या जाणार्‍या ज्या मोजक्या फिल्म्स आहेत त्यापैकि एक. मेजर रॉबर्ट गिल १९४४ मध्ये अजिंठ्याला आला. सैनिकी पेशाचा हा चित्रकार अजिंठा पाहून मंत्रमुग्ध होतो आणि त्याच बरोबर भाषेच्या पल्याड जाऊन पारो ह्या आदिवासी मुलीच्या प्रेमात पडतो त्याची ही कहाणी. 
महानोरांनी शब्दबद्ध केलेल्या ह्या शोकांतिकेत नैसर्गिक सौंदर्य आणि अजिंठ्यातील कलाकृती ह्या दोन्हींचा संयोग आहे. महानोरांच्या कविता कौशल इनामदारांनी संगीतबद्ध केल्या आहेत. यामध्ये ढोलकी आणि इतर एतद्देशीय वाद्ये वापरलेली आहेत. ही गाणी “जैत रे जैत” सारखी गळ्यात रुळली नाहीत तरी महानोरांच्या कवितेचा बाज राखून आहेत.
सिनेमाचे सेट्स आणि अजिंठ्याचे विहंगम दृश्य ह्यांचे मिश्रण चांगले झाले आहे. गिलची चित्रे आकार घेतांना छान दाखवली आहेत. पारो जंगलातील संपत्ती वापरुन रंग तयार करते ते ही सुंदर रितीने दाखवले आहे. तिला इंग्रजी येत नसले आणि गिलला मराठी येत नव्हते तरी त्या दोघांना चित्रांमधील भव्यता आणि त्यामागची शब्दातीत पार्श्वभूमी माहीत असावी.
ह्या प्रेमकथेला जातककथा आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान ह्यांची सुंदर जोड आहे.  नितीन देसाईंनी (आणि मंदार जोशी) लिहीलेल्या पटकथेमध्ये गिलच्या पाश्चात्य मनातील विचार आणि जलालचे भाषांतर छान दाखवले आहे. फ़ीलीप स्कॉट-वॉलेस आणि सोनाली कुलकर्णी आपापल्या भूमिकेत शोभून दिसले आहेत.
खरे काय आहे? रॉबर्ट- पारो यांचा विवाह झाल्याचे इतिहासात कोठेही नमूद नाही. 1854-55 मध्ये भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला. देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने या सर्वांच्या पलीकडे जावून पारोने रॉबर्टला खूप सहकार्य केले होते. पारोच्या मृत्यूनंतर रॉबर्ट गिलने ब्रश ठेऊन बंदूक हाती घेतली. 1857 च्या उठावाच्या वेळी तो सैन्यात पुन्हा दाखल झाला. पण तिथे त्याचे मन रमेना म्हणून 1861 मध्ये त्याने पुन्हा चित्रकलेला वाहून घेतले.
 सन 1845 ते 1856 या 11 वर्षांच्या सहवासातून त्यांना कुठलेही अपत्य झाले नाही किंवा होणार होते असाही उल्लेख दिसून येत नाही. परंतु पारोबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर सिल्लोड तालुक्यात अजिंठा गावात बांधली.
 ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत. 
आज या कबरीच्या बाजूला पोलीस स्टेशन आहे! पारोच्या विरहाने रॉबर्ट गिल दु:खात आरपार बुडाला हे अर्धसत्य आहे. कारण वयाच्या 52 व्या वर्षी 1856ला तो अजिंठा येथे असताना अ‍ॅनी नामक स्त्री त्याच्या सहवासात आल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. अ‍ॅनीने रॉबर्टच्या सहवासात 26 फेब्रुवारी 1866 ला मिल्ड्रेड मेरी गिल या मुलीला व त्यानंतर रॉबर्ट (बग्गी) गिल या मुलाला मुंबई येथे जन्म दिला असल्याच्या नोंदी आहेत.
चित्रपटामुळे पारोचे नाव सगळीकडे पोहचले असतांना अजिंठा गावातील तिच्या समाधीकडे मात्र दुर्लक्षच आहे. गाजर गवत, उकिरडा आणि घाणीचा सामना करत या समाधीकडे जावे लागते.

रॉबर्ट गिलचा शेवट व समाधी- 

एप्रिल 1879 च्या पहिल्या आठवड्यात खान्देशातल्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या एका दवाखान्यात रॉबर्ट गिल उष्माघाताने फणफणत होता. त्यातच 10 एप्रिल 1879 ला त्याचे निधन झाले त्याच्या निधनानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या दफनभूमीत त्याचे दफन करण्यात आले, तेथे त्याची कबर आजही आहे. तिच्या आजूबाजूला गवत, झुडपे वाढलेली आहेत. आपल्या सांस्कृतिक ठेव्याला जगात नेणार्‍या गिलची व त्याला मदत करणार्‍या पारोची किमान कबर तरी आपण सुस्थितीत  राखायला पाहिजे.
 • समाधान महाजन
संदर्भ –
1) ‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा : तपश्चर्या आणि आहुती-  प्रदीप आपटे(दै.लोकसत्ता दि. 28 मे 2021)
2) रॉबर्ट गिल; प्रियकरापलीकडचा प्रज्ञावंत – रणजीत राजपूत (दै.दिव्य मराठीतील 2012 मध्ये प्रकाशित लेख)
3) अजंठा – भुजंगराव बोबडे (अजंठा विषयीचा एक लेख)
4) अजंठा – ना.धों.महानोर
2 Comments
 1. Mayresh says
 2. Mukunda padale says

  नमस्कार
  मी आपल्या युटुब चा सस्क्राईबर आहे योग्य माहिती देता आपण पण ह्या लेखा मध्ये आपण एक चुकी केली आहे , भिल्ल हा त्या भागात आधीपासून ते आज पर्यंत नाहीयेत , तिथं मल्हार कोळी आधी पासून वास्तव्य करत आहेत , वाघिरा नदी च्या काठी एक वाडी आहे लेनापुर तेथील, त्या मूळच्या रहिवासी आता त्या वाडीच गावा मध्ये रुपांतर झालं आहे , ती प्रेम कथा सत्य आहे, पारो चा आपण उल्लेख केला तीच संपूर्ण नाव पार्वताबाई गणू सपकाळ उर्फ पारो असे होते , आता आपल्याला पुरावा लागेल बरोबर ना तर त्या आमच्या आजोबांच्या वडिलांच्या सख्या आत्या होत्या ,त्यांचा लेखी पुरावा पण आहे आमच्याकडं

  आपण ते वाक्य दुरुस्त करून ज्ञाल अशी आशा करतो

  आपलं वाचक

Leave A Reply

Your email address will not be published.