शेतकऱ्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उभे राहिल्यामुळे ओलोंगाला देश सोडायला लागलं होतं.

हेन्री ओलोंगा आठवतोय? हा तोच झिमाब्वेचा फास्ट बॉलर ज्याने सचिनशी पंगा घेतला होता आणि पुढे सचिनने न भुतोनभविष्यती अशी त्याची पिटाई केली होती.त्याकाळची झिम्बाब्वेची टीमच भारी होती. अँडी फ्लॉवर ग्रँट फ्लॉवर बंधू, अलिस्टर कम्पबेल, हिथ स्ट्रीक असे अनेक दिग्गज या टीम मध्ये होते. अचानक काय झालं की ही टीम दिसेनाशी झाली?

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. आफ्रिकेच द्वार म्हणून ओळखला जाणारा, सोने, हिरे यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असणारा ऱ्होडेशिया ब्रिटीश वसाहतवाद्यांपासून स्वतंत्र होऊन झिम्बाब्वे बनला होता. गेली कित्येकवर्षे गोऱ्या जमीनमालकांशी लढा यशस्वी झाला यामागे एक हिरो होता नाव रॉबर्ट मुगाबे.

एकेकाळचा शिक्षक. अतिशय जिद्दी. आफ्रिकेत नेल्सन मंडेलानी कृष्णवर्णीयांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून सत्याग्रही आंदोलन सुरु केले, त्याचवेळी याने मिळेल तो मार्ग पत्करून देशाला स्वातंत्र्य मिळवले होते आणि स्वतंत्र झिम्बाब्वेचा पहिला पंतप्रधान बनला.

ब्रिटीशांचे राज्य संपले पण नेहमी प्रमाणे जाताना ते आपली छाप सोडूनच गेले होते. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे क्रिकेट.

प्रत्येक वसाहतीप्रमाणे झिम्बाब्वेमध्ये देखील क्रिकेट जोरात खेळल जात होतं.

एकेकाळी प्रत्येक वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेला डार्क हॉर्स असंचं समजल जायचं. कधी कोणता चमत्कार करून दाखवतील सांगता यायचं नाही. ९२च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि ९९ वेळी भारताला हरवल होतं. १९९२मध्ये त्यांना कसोटीचा दर्जा देखील मिळाला होता. 

नव्वदच्या दशकात झिम्बाब्वेची टीम खऱ्या अर्थाने ताकदवान बनली होती. याच दरम्यान ओलोंगा टीम मध्ये आला.

देशाला स्वतंत्र होऊन पंधरा वर्षांनी पहिल्यांदा एक कृष्णवर्णीय खेळाडू टीममध्ये खेळणार होता. त्याकाळातला सर्वात फास्ट बॉलर अशी त्याने ख्याती निर्माण केली होती. त्याचे विचित्र केस, त्याची अॅक्शन यावरून बऱ्याचदा समोरच्या टीमचे चाहते त्याच्यावर चिडून असायचे.

ओलोंगाची टीममध्ये इंट्री झाली तेव्हाच झिम्बाब्वेने त्याकाळच्या बलाढ्य पाकिस्तानला हरवून कसोटीमध्ये सुद्धा आपला नाद करायचा नाही असा इशारा दिला होता. ओलोंगाने यासामन्यात सईद अन्वरला पहिल्याच ओव्हर मध्ये आउट करून हवा केली होती पण या मचचे खरे हिरो होते फ्लॉवर बंधू. ग्रांट फ्लॉवरने डबल सेंच्युरी मारली होती तर अडीने १५६ धावा काढल्या.

पुढच्या दोन वर्षापासूनचा काळ झिम्बाब्वेच्या टीमचा सुवर्णकाळ म्हटला जातो. सगळे खेळाडू फॉर्ममध्ये होते. फास्ट बॉलिंग, स्पिन दोन्हीला ते आरामात खेळू शकत होते. अँडी फ्लॉवरला त्याकाळातला बेस्ट बट्समन समजल जात होतं. त्यांची बॉलिंग तगडी होती, खेळात देखील प्रोफेशनलीजम होतं.    

याच्याच जोरावर त्यांनी अनेक कसोटी सामने देखील जिंकले. १९९९ आणि २००३ च्या वर्ल्डकपमध्ये सुपरसिक्स मध्ये गेले. २००३च्या वर्ल्डकपचे तर सहयजमान होते. पण हाच वर्ल्डकप त्यांच्यासाठी दुःखद स्वप्न बनून गेला, वेगळ्याच कारणासाठी.

ज्या रॉबर्ट मुगाबेनी त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलेलं तेच देशाच्या स्वातंत्र्यावर टपून बसले होते. त्यांच्या करिश्माई लोकप्रियतेमुळे मुगाबे म्हणजेचं झिम्बाब्वे अशी घोषणा तिथे फेमस होती. पंतप्रधानपदाची  सुरवातीची काही वर्षे सोडली तर त्यानी स्वतःचा राष्ट्रपती म्हणून राज्याभिषेक करून सगळी सत्ता ताब्यात घेतली.

आधी तर समाजवादाची स्वप्ने दाखवणारे मुगाबे हळूहळू आपल्या विरोधकांना संपवू लागले. में २००० मध्ये तर त्यांनी गोऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन कोणतीही नुकसानभरपाई न देता ताब्यात घेण्याचा कायदा बनवला. ज्या शेतकऱ्यानां नुकसानभरपाई हवी त्यांनी ब्रिटीश सरकारकडून घ्यावी अस मुगाबे यांचं म्हणण होतं.  

झिम्बाब्वेच्या कोर्टात हे कायदे टिकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने देखील मुगाबे यांच्या विरोधात निर्णय दिल्यावर त्यांनी थेट न्यायाधीशांवरच कारवाई केली. त्यांनी गोऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन सरकार जमा करण्याचा धडाका लावला. प्रसंगी रक्तपात करण्यासही मागे पुढे पाहिले नाही.

असं सांगितलं जात की त्यांनी जवळपास वीस हजार विरोधकांचा खून घडवून आणला होता. भ्रष्टाचाराने सारा देश त्रासला होता. पण त्याच्याविरुद्ध बोलण्याची कोणाची टाप नव्हती.

पण मुगाबेच्या यांच्या शेतकऱ्यांवरच्या दडपशाहीचा विरोध म्हणून म्हणून दोन झिम्बाब्वेचे क्रिकेटर्स उभे राहिले.  ओलोंगा आणि अँडी फ्लॉवर

२००३ च्या वर्ल्डकपमध्ये  ओलोंगा आणि अँडी फ्लॉवर यांनी लोकशाहीचा मृत्यू म्हणत निषेधात्मक काळी पट्टी बांधली.  हे कृष्णवर्णीय सरकार गोऱ्या लोकांवर अन्याय करते असा आरोप करत इंग्लंडने वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेशी खेळण्यास नकार दिला. 

ओलोंगा आणि अँडी फ्लॉवरच्या या कृत्याचा मुगाबे यांना राग आला. जिथे जिथे विरोध दिसेल तो चिरडायचा असच धोरण असलेल्या रॉबर्ट मुगाबे यांनी क्रिकेट मध्ये लक्ष गुंतवल. आपल्याप्रमाणेच कृष्णवर्णीय असलेला ओलोंगा गोऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजूने लढतो याचा राग मुगाबेला जास्त आला होता.

ओलोंगावर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर अटक वॉरंट निघालं. ठार मारण्याच्या धमकी आल्या. जीव वाचवून लपून बसलेल्या ओलोंगाला पुढे देश सोडावा लागला.

 ओलोंगा गेला तसं झिम्बाब्वे क्रिकेटचा सुवर्णकाळदेखील संपला.

सरकारचा क्रिकेटमधला हस्तक्षेप वाढतचं होता. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डने कॅप्टन हिथ स्ट्रीकला टीममधून काढलं आणि त्याच्या ऐवजी तातेंदा तैबूला कप्टन बनवलं. त्याला पाठींबा म्हणून इतर चौदा खेळाडूंनी राजीनामा दिला. नव्या टीममध्ये सगळे कृष्णवर्णीय खेळाडू भरण्यात आले.

अखेर आयसीसीने झिम्बाब्वेवर कसोटी खेळण्याची बंदी आणली.

काही वर्षात देशातल फर्स्टक्लास क्रिकेट देखील बंद झाले. हळूहळू खेळाडू देशातून बाहेर पडू लागले. मुगाबे यांच्या मुळे झिम्बाब्वेचं क्रिकेट संपलं अशी टीका जगभरातून झाली. काही वर्षांनी कसोटीचा दर्जा त्यांना परत मिळाला, बांगलादेशला त्यांनी हरवले देखील पण परत ती चमक दिसली नाही. खेळाडूना सामन्यासाठीचे पैसेदेखील दिले जात नव्हते. आर्थिक डबघाई व इतर अनेक कारणानी झिम्बाब्वे टीम संपून गेली.

याचं कारण समजले जाणाऱ्या रोबर्ट मुगाबेनां २०१७साली झिम्बाब्वेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. पण तोवर झिम्बाब्वे व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. मागच्या वर्षी त्यांच निधन झालं.

त्यांच्या विरोधाच प्रतिक समजल्या जाणाऱ्या ओलोंगाला लोकांनी प्रतिक्रिया विचारली. ओलोंगा म्हणाला,

“माझा त्यांच्या धोरणांबद्दल आयुष्यभर विरोध राहिलं. त्यांनी झिम्बाब्वे क्रिकेटचं नुकसान केलं हे ही खरच आहे. पण ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हिरो होते हे मी कसं अमान्य करणार. पुढे जाऊन त्यांनी देशाच्या लोकशाहीचा गळा घोटला मात्र त्यांचं कार्य महान होतं आणि त्यांच्या मृत्यू बद्दल मला दुःखचं आहे.”

अजूनही ओलोंगा ऑस्ट्रेलियाच्या अॅडेलेडमध्ये राहतो. तिथेच त्याचे लग्नही झाले आहे. ऑस्ट्रेलियन टीव्हीवरच्या एका टलेंटशोमध्ये त्याने भाग घेतला आणि त्याचा विजेतादेखील ठरला. पण त्याचे क्रिकेट करीयर तर कधीच संपले. कधी कधी कोमेंट्रीमध्ये त्याचा आवाज ऐकायला मिळतो.

आज जगभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने सुरु आहेत. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटल जात होतं पण मोठे नोठे सेलिब्रिटी कधी सरकारबद्दल एक चकार काढत नाहीत .

त्यांच्यासाठी आपलं करीयरपणाला लावणारा, देश सोडणारा ओलोंगा प्रत्येक ठिकाणी जन्माला येत नाही हेच खरं.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Akshay Kondar says

    भारी लेख…..बोल भिडु

Leave A Reply

Your email address will not be published.