कर्नाटक टिपूचा गौरव करणारा इतिहास काढणार, पण टिपूची ही गोष्ट गौरव करण्यासारखीच आहे

कर्नाटकातल्या निवडणूका जवळ आल्या आहेत. हे यासाठी सांगतोय कारण हिजाब असो नाहीतर टिपू सुलताना. तुम्ही या गोष्टींकडे धार्मिक अस्मिता म्हणून बघत असला तरी हा मुद्दा निवडणूकांसाठी महत्वाचा आहे.

तर विषय असा आहे की, कर्नाटक शासनाने आत्ता शालेय अभ्यासक्रमातून टिपू सुलतानचा इतिहास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधित कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश म्हणालेत की, 

आत्तापर्यन्त टिपू सुलतानबद्दल खोटा इतिहास शिकवला जात होता. आत्ता खरा इतिहास सांगितला जाणार आहे. यातून नव्या पिढीला खरा इतिहास समजेल. यासाठी कर्नाटकात रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने टिपू सुलतानाचे गौरवशाली साहित्य कमी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील प्रकरणे कायम ठेवावीत पण गौरव करणारा मजकूर कमी करावा अस समितीने सुचवलं होतं.

साहजिक या निर्णयावर वेगवेगळ्या पक्षांकडून समर्थन व टिका होत आहे. भाजप व हिंदूत्ववादी पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलय तर कॉंग्रेस व पुरोगामी पक्षांनी शिक्षणांच भगवीकरण होत असल्याची टिका केलीय.

आत्ता टिपू सुलतानचा गौरव करणारा इतिहास काढण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी टिपू सुलतानचं कर्तृत्व काय होतं हे त्याच्या रॉकेटच्या गोष्टींवरून समजतं..

आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल पण अठराव्या शतकातील कर्नाटकमधील म्हैसूर साम्राज्याचा शासक टिपू सुलतान याने देशातलं पहिलं रॉकेट बनवलं होतं.

विशेष म्हणजे फक्त रॉकेट बनवून तो थांबला नव्हता, तर या रॉकेट्सचा इंग्रजांविरुद्धच्या अँग्लो-म्हैसूर युद्धात यशस्वी वापर करून टिपू सुलतानने ब्रिटिशांना घाम फोडला होता.

रॉकेट्स किंवा अग्निबाण यांचा वापर तसा पंधराव्या शतकापासून केला जातो, पण टिपू सुलतानने बनवलेली रॉकेट्स यापूर्वीच्या रॉकेट्स पेक्षा कितीतरी पटींनी अधिक विकसित आणि प्रभावी होती.

लोखंडाच्या सिलेंडरमध्ये दारुगोळा भरून त्याच्या मागून तलवारी किंवा लोखंडाच्या सळया वापरून हे रॉकेट्स बनवण्यात आले होते. हैदर अली ने सर्वप्रथम या रॉकेट्सचा प्रोटोटाईप तयार केला होता आणि मग टिपू सुलतानने त्यावर अधिक काम करून रॉकेट्स विकसित केले.

या रॉकेट्सच्या माध्यमातून साधारणतः २ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शत्रूला लक्ष्य बनवणं शक्य होतं.

१७८० साली झालेल्या पहिल्या ‘अँग्लो-म्हैसूर’ युद्धात टिपू सुलतानच्या सैन्याने इंग्रजांच्या दारूगोळ्याच्या साठ्याला याच रॉकेट्सच्या माध्यमातून आपलं लक्ष्य बनवलं होतं.

दारूगोळ्याच्या साठ्यावर झालेल्या हल्यात ब्रिटीशांचं मोठं नुकसान तर झालंच होतं, पण टिपू सुलतानकडच्या या विनाशकारी रॉकेट्स विषयीच्या दहशतीने ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या झोप उडाली होती.

ब्रिटीश अधिकाऱ्यांची झोप उडणं सहाजिकच होतं, कारण यापूर्वीच्या कुठल्याच युद्धात अशा प्रकारच्या रॉकेट्सचा उपयोग झाला नव्हता. या हल्ल्यामुळे ब्रिटीश सैनिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.

ब्रिटिशांना रॉकेट्स माहित नव्हते, असं काही नव्हतं. पण त्यांना माहित असलेल्या रॉकेट्सच्या तुलनेत टिपू सुलतानने बनवलेले रॉकेट्स कितीतरी अधिक प्रभावशाली होते, असं मत वैज्ञानिक रोद्दम नरसिम्हा यांनी आपल्या ‘रॉकेट्स इन म्हैसूर अँड ब्रिटन’ या लेखात नोंदवलंय.

चौथ्या ‘अँग्लो-म्हैसूर’ युद्धात ब्रिटीश सैन्यात कर्नल पदावर असलेल्या रिचर्ड बेयली याने देखील आपल्या डायरीमध्ये ‘म्हैसूरीअन रॉकेट्स’च्या परिणामकारकतेविषयी लिहिलंय. रिचर्ड बेयली लिहितो,

“त्यांनी आमच्यावर केलेल्या शेकडो रॉकेट्सच्या हल्यात आमचे कितीतरी बंदुकधारी सैनिक मृत्युच्या थारोळ्यात पडले होते. रॉकेट्सच्या हल्याचं दृश्य एकाचवेळी विलोभनीय आणि परिणामांच्या दृष्टीने भीषण होतं”

१७९९ सालच्या लढाईत श्रीरंगपट्टणचा पाडाव झाला त्यावेळी ब्रिटिशांना टिपू सुलतानच्या किल्ल्यातून ६०० रॉकेट लोंचर्स आणि ९०० रॉकेट्स मिळाले होते, जे ब्रिटिशांनी वूल्वीच येथील रॉयल ‘आर्टिलरी म्युझियम’मध्ये पाठवले होते.

याच रॉकेट्सने ब्रिटिशांना अजून संशोधन करण्याची प्रेरणा दिली आणि विल्यम्स कॉन्ग्रेव्हने अधिक संशोधनांती ‘कॉन्ग्रेव्ह रॉकेट’ विकसित केले आणि त्यांच्याच मदतीने वेलेस्लीने १८१५ सालच्या वाटर्लुच्या लढाईत नेपोलिअनचा पराभव केला.

२०१८ च्या जुलै महिन्यात कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील बिदानुरू गावातील सुपारीच्या शेतात एका जुन्या विहिरीच्या खोदकामाच्या वेळी कामगारांना  साधारणतः १००० रॉकेट्स सापडले. पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांनी हे टिपू सुलतानकालीन रॉकेट्स असल्याची माहिती देताना २०१२ साली सुद्धा अशीच रॉकेट्स सापडल्याची माहिती दिली होती.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.