देशद्रोहाचे आरोप झालेल्या शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची सत्यकथा..

“जर मी तुम्हाला सांगितलं की हे अभियान २० वर्षांपूर्वीच यशस्वी होऊ शकलं असतं, तर?

माझं नाव नंबी नारायण आहे.

मी माझ्या आयुष्यातील ३५ वर्ष रॉकेट्रीमध्ये घालवलेत आणि ५० दिवस जेलमध्ये. मी जेलमध्ये घालवलेल्या ५० दिवसांची जी किंमत माझ्या देशाला मोजावी लागली, त्याचीच ही गोष्ट आहे. ना की माझी”

४ वर्षांपूर्वी जवळपास सव्वा मिनिटांचं एका चित्रपटाचं टीजर रिलीज झालं होतं आणि एकंच कल्ला झाला होता. ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटातून कित्येकांचा लाडका अभिनेता ‘आर माधवन’ खूप वर्षांच्या ब्रेकनंतर परत चित्रपट सृष्टीत पदार्पण करत होता. तोही फक्त अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून सुद्धा. २०२२ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. खूप कल्ला झालेला. 

हा चित्रपट अशा एका खऱ्या स्टोरीवर आधारित आहे, जी क्लेम करते की ‘फक्त एका खोट्या आरोपामुळे भारताचं अंतराळ क्षेत्र १५ वर्ष मागे पडलंय. जर हा आरोप झाला नस्ता तर भारताचं मंगळयान अभियान १५ वर्षांपूर्वीच यशस्वी झालं असतं’  म्हणून या चित्रपटाची रिअल स्टोरी काय आहे, हेच बघूया…

आज भारताचं इस्रो इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात सॅटेलाईट लॉन्च करतो, मिशन मंगल हा चित्रपट तर तुम्ही बघितला असेलच, त्यात हे सर्व दाखवण्यात आलंय. मात्र हे सगळं जमतं ते भारताच्या काही प्रतिभावंत शास्त्रज्ञांमुळे. 

नंबी नारायण हे असेच एक शास्त्रज्ञ. 

रॉकेट प्रॉपल्शन म्हणजेच असा फोर्स जो रॉकेटला जमिनीवरून उड्डाण करण्यासाठी मदत करतो, त्याच्या अभ्यासात नंबी यांनी मास्टर्स केलं होतं. त्यानंतर त्यांना नासाची ऑफर आली होती पण ती धुडकावून त्यांनी देशासाठी काम करण्याचं ठरवलं आणि इस्रो जॉईन केलं. इस्रोमध्ये असताना त्यांनी ‘विकास इंजिन’चा शोध लावला, ज्याच्या माध्यमातून आजही PSLV  सॅटेलाईट लॉन्च केले जातात. 

जर भारताला माणसांना अंतराळात पाठवायचं आहे तर लिक्विड फ्युएल इंजिनवर काम करावं लागेल, असं त्यांनी ओळखलं होतं. त्यानुसार १९९२ मध्ये इस्रोने रशियाबरोबर हे इंजिन तयार करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान खरेदी करण्याचा करार केला होता. पण काही काळाने अचानक रशियाने तो रद्द केला होता. यामागे अमेरिका कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं.

कारण भारताला हे तंत्रज्ञान मिळालं तर भारत अमेरिकेच्या पुढे जाऊ शकत होता.

या धक्क्यानंतर देखील नंबी यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले. पण १९९४ मध्ये मालदीवमधून एका महिलेला अटक करण्यात आली. मरियम रशिदा असं तिचं नाव होतं. इस्रोच्या रॉकेट इंजिनचं चित्रण ही बाई करायची. तिच्यावर आरोप करण्यात आला होता, की हे चित्र ती पाकिस्तानला विकणार होती.

त्यावेळी नंबी नारायण इस्रोच्या क्रायोजेनिक विभागाची जबाबदारी सांभाळत होते. मरियम रशिदाच्या अटकेनंतर दुसऱ्याच महिन्यात नंबी नारायण यांना देखील अटक करण्यात आली. 

त्यांच्यावर क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीसंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली असं म्हणत  देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता. नंबी यांच्यासोबत  इस्रोतील अजून दोन संशोधक डी.शशीकुमारण आणि के.चंद्रशेखर यांना देखील अटक करण्यात आली होती.

पूर्ण ५० दिवस नंबी यांना जेलमध्ये काढावे लागले. कोणताही पुरावा नसताना नंबी यांच्याबद्दल माध्यमांमध्ये चुकीचं छापण्यात आलं. काही पैशांसाठी त्यांनी हे केलं, असं बोललं जाऊ लागलं. त्यांना कोणत्या तरी देशाने हेर म्हणून वापरलं, असं देखील पसरवण्यात आलं, ज्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली.

फक्त ५० दिवसांत नंबी यांचं सगळं आयुष्य बदललं होतं, त्यांच्या कुटुंबाला देखील अनेकांनी बहिष्कृत केलं होतं.

गुन्हा दाखल झाल्यानंतर २० दिवसांतच हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. पण सीबीआयने १९९६ मध्ये एक रिपोर्ट सादर केला, ज्यात म्हटलं होतं – नंबी यांच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप चुकीचे आहेत. न्यायालयाने हा रिपोर्ट मान्य करत नंबी यांच्यासोबत या प्रकरणात अडकलेल्या इतर सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती.

१४ सप्टेंबर २०१८ रोजी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायलयाच्या बेंचने केरळ राज्य सरकारला नंबी नारायणन यांना ५० लाखांची नुकसानभरपाई आणि नियमानुसार लागू होणारे सगळे लाभ देण्याचे आदेश दिले होते. 

तेव्हा नंबी यांना आनंद नाही तर खंत वाटत होती की….

१९९४ च्या या खोट्या आरोपाची देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागली. भारताच्या अंतराळक्षेत्रात होणाऱ्या सगळ्या प्रोजेक्ट्सला धक्का लागला. १९९९ पर्यंत जे इंजिन तयार होऊ शकत होतं, ते १५ वर्ष पुढे ढकललं गेलं. भारताचं अंतराळक्षेत्र खूप पटीने मागे पडलं होतं. 

अशा या सगळ्या प्रकरणावर आर. माधवनने रॉकेट्री चित्रपटातून प्रकाश टाकला आहे. आज १ जुलैला हा चित्रपट रिलीज झालाय. जिकडे तिकडे त्याच्याच चर्चा सुरु आहेत. ट्विटरवर तर #NambiNarayan ##RocketryTheNambiEffect ट्रेंडिंगवर आहे. बाकी या चित्रपटाचा आशय तर त्याच्या पहिल्या झलकमध्ये म्हणजेच टीजरमध्येच स्पष्ट करण्यात आला होता.. 

कभी कभी एक व्यक्ति के साथ नाइंसाफी

पुरे देश के साथ गद्दारी होती है। 

तुम्ही हा चित्रपट बघितला आहे ना? नसेल बघितला तर तुम्ही चित्रपटासाठी एक्सायटेड आहेत की आर माधवनला स्क्रीनवर बघण्यासाठी, कमेंटमध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.