सगळ्यांना वाटायचं हा फुटबॉल स्टार होणार पण हातात टेनिसची रॅकेट घेऊन तो लेजंड बनला

टेनिस हा खेळ आपल्या देशाला सानिया मिर्झामुळे परिचित झाला असला तरी भारतात या खेळाला तितकं महत्व दिलं जात नाही. क्रिकेटवर आपला देश भरपूर पैसे खर्च करतो पण इतर खेळ आपल्या नजरेतून सुटतात. टेनिसचा बादशहा असलेला रॉजर फेडरर हा एकमेव असा खेळाडू होता जो या खेळातून सगळ्यात जास्त कमाई करायचा.

८ ऑगस्ट १९८१ रोजी रॉजर फेडररचा स्वित्झर्लंडमध्ये जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड दिसून आली. रॉजर फेडररची आई हि साऊथ आफ्रिकेची तर वडील हे स्विस होते, यामुळे दोन्ही देशातले संस्कार आणि खेळ फेडररच्या परिचयाचे होते. शिवाय तो दोन्ही देशाचा नागरिक आहे. 

फ़ुटबॉल हा फेडररचा आवडता खेळ होता, तो फुटबॉल इतका उत्तम खेळायचा कि लोकांनी ठरवून टाकलं होतं कि तो पुढे फुटबॉल मधला मोठा खेळाडू होणार.

स्वित्झर्लंडमध्ये एक नियम आहे कि मिलिट्रीमध्ये जाणं कंपल्सरी असतं. त्यावेळी रॉजर फेडररने स्विस आर्म फोर्स सर्व्हिस जॉईन केली होती. पण फेडररच्या पाठीच्या दुखण्यामुळे त्याला त्यातून काढून टाकण्यात आलं. रॉजर फेडरर खेळात उत्तम होता, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल अशा खेळात तो मास्टर होता. वयाच्या १२ व्या वर्षी फेडररने ठरवलं कि तो आता पूर्णपणे टेनिसवर फोकस करणार आहे.

वयाच्या १४ व्या वर्षी रॉजर फेडरर हा स्वित्झरलँडचा नॅशनल ज्युनिअर चॅम्पियन बनला होता. पुढे फेडररने टेनिस अकादमी जॉईन केली. वयाच्या केवळ १६ व्या वर्षी रॉजर फेडररला स्पॉन्सरशिप मिळाली होती.

हार न मानण्याची क्षमता आणि खेळावर मेहनत यामुळे फेडरर ज्युनिअर विम्बल्डन टायटल आणि ऑरेंज बॉलचा विजेता बनला.

२००३ साली फेडररने विम्बल्डन जिंकलं. या नंतर फेडररची गाडी सुसाट सुटली. ऑस्ट्रेलियन ओपन, यूएस ओपन, ATP मास्टर्स स्पर्धा खिशात घातल्या. फेडरर नावाचं वादळ टेनिस कोर्टावर घोंगावू लागलं.

२००५ च्या काळात रॉजर फेडरर हा जागतिक रँकिंगमध्ये १ नंबरवर पोहचला. २००४ ते २००८ पर्यंत फेडरर हा टेनिसचा बादशहा बनला होता. या काळात तो कायम नंबर एकला राहिला. लौरेस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर या पुरस्काराने फेडररला सन्मानित करण्यात आले.

अँडी मरेला पराभूत करून फेडररने हवा केली मात्र पुढे राफेल नदालने फेडररला चांगलीच टक्कर दिली. जोकोविचनेसुद्धा फेडररला चांगलीच शिकस्त दिली. २००९ नंतर फेडरर सतत पराभूत होऊ लागला. अगदी आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये खालचं स्थान असलेल्या खेळाडूंना पराभूत करणंसुद्धा फेडररला जड जाऊ लागलं. हि पीछेहाट फेडररला रिटायर व्हायला भाग पाडते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

दुखापती आणि बराच काळ मैदानावर नसल्याने फेडरर वर्ल्ड रँकिंगमध्ये सुद्धा खाली जाऊ लागला. पण २०१५ आणि २०१७ मध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकून त्याने आपली क्षमता पुन्हा दाखवून दिली. खुद्द सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोघेही रॉजर फेडररचे फॅन आहेत.

सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुद्धा रॉजर फेडररचं नाव होतं. जगभरात त्याचे असलेले फॅन्स हा कायम त्याच्यासाठी आधार आहेत. टेनिस हेच आपलं आयुष्य रॉजर फेडररने वयाच्या १२ व्या वर्षांपासून ठरवलं होतं आणि पुढे तो जगजेत्ता बनला.

ज्या वयात इतर खेळाडू कोचिंग करत असतात त्या वयात फेडरर पुन्हा जगज्जेता बनण्यासाठी लढत होता, टेनिसमध्ये अनेक खेळाडू पुढे येतील, स्टार बनतील.. पण दुसरा फेडरर होणे नाही. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.