तासभर मारलेल्या गप्पांनी त्यांना ऑस्कर जिंकणारा सिनेमा मिळवून दिला.

इंटरनॅशनल स्तरावर मराठी कलाकारांनी स्वतःची जी वेगळी ओळख निर्माण केली, त्यामध्ये रोहिणी हट्टंगडी यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. गांधी सारख्या भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमात त्यांनी अभिनय केला. कस्तुरबा गांधींची भूमिका करायची संधी त्यांना मिळाली. या संधीचं त्यांनी खऱ्या अर्थाने सोनं केलं. गांधी ला पुढे ऑस्कर सारखा सर्वोच्च बहुमान मिळाला. यामुळे रोहिणी हट्टंगडी सारख्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक झालं.

मराठी रंगभूमीवर काम करणाऱ्या रोहिणी ताईंना इतक्या मोठ्या सिनेमाचा भाग होण्याची संधी कशी मिळाली, त्याची ही कहाणी.

रोहिणी ताईंच्या सुरुवातीच्या आयुष्याकडे थोडी नजर मारू. १९५५ साली पुण्यात रोहिणी चा जन्म झाला. पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल हाय स्कूल मध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. रोहिणी ला अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिने पुण्यातील FTII ला जावं, असं सर्वांचं मत होतं. परंतु रोहिणी ला मात्र रंगभूमीचा अभ्यास करायचा होता. तिला त्याच विषयात रस होता. त्यामुळे दिल्ली येथील NSD मध्ये रोहिणी १९७१ साली दाखल झाली.

NSD मध्ये असतानाच त्यांची जयदेव हट्टंगडी यांच्याशी ओळख झाली. आणि पुढे जयदेव सोबत लग्न करून रोहिणी ओक ची रोहिणी हट्टंगडी झाली. रोहिणी हट्टंगडी यांनी स्वतःच्या अभिनयाने रंगभूमी आणि सिनेमे गाजवले.

रोहिणी हट्टंगडी मराठी नाटकांचे प्रयोग करत होत्या. त्याचवेळी कास्टींग एजंट डॉली ठाकोरे यांनी रोहिणी सोबत संपर्क साधला.

“तू आत्ताच्या आता रिचर्ड सरांना भेट. ते लंडनला जायला निघणार आहेत. आणि त्यांचं फ्लाईट मुंबई वरून आहे. तर तू तातडीने त्यांना भेट.”

असं डॉली रोहिणी ताईंना म्हणाली. पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या रोहिणी नशिबाने त्या वेळी मुंबईत होत्या. त्यामुळे घाईगडबड करून रोहिणी ताई रिचर्ड सरांना भेटल्या.

एव्हाना तुम्हाला कळलं असावं.. रिचर्ड म्हणजे रिचर्ड ओटेनबरो. गांधी सिनेमाचे दिग्दर्शक. ते त्यावेळी भारतात आले होते. रोहिणी रिचर्ड सरांना जाऊन भेटली. ही कोणत्याही प्रकारची ऑडिशन नव्हती. रिचर्ड सरांनी रोहिणी ला भेटून तिच्याशी रंगभूमी या विषयावर मनसोक्त गप्पा मारल्या. जवळपास एक तास हे दोघे या विषयावर बोलत होते. रोहिणी NSD पास आऊट असल्याने आणि त्यांच्याकडे मराठी रंगभूमीचा दांडगा अनुभव असल्याने त्यांनी सुद्धा रिचर्ड सरांशी या विषयावर बोलताना हात आखडते घेतले नाहीत.

एक तासानंतर निघण्याची वेळ जवळ आल्याने रिचर्ड सरांनी रोहिणी चा निरोप घेतला.

गांधी सिनेमा मोठा होता. आणि या सिनेमातील कस्तुरबा गांधीं च्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्री शर्यतीत होत्या. त्यामुळे रोहिणी हट्टंगडी यांनी इतकी आशा ठेवली नव्हती. पुढच्याच दिवशी डॉली ने रोहिणी ताईंशी संपर्क केला.

“तुला लवकरात लवकर शूटिंग साठी लंडनला जावं लागणार आहे.”

असं सांगून डॉली ने रोहिणी ताईंना खुशखबर दिली. सर्व इतकं अचानक घडलं होतं की रोहिणी ताईंचा विश्वास बसत नव्हता.

संधी मिळाली होती. परंतु त्यावेळेस लंडनला जाण्यासाठी रोहिणी कडे पासपोर्ट नव्हता. तसेच त्यांच्या नाटकांचे आगामी प्रयोग ठरले होते. वेळ दवडला तर इतकी मोठी संधी निघून जाण्याची शक्यता अधिक होती. शाहरुखच्या ओम शांती ओम सारखं रोहिणी ताईंच्या बाबतीत घडलं.”अगर किसी चीज को पुरी दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है”. डॉली च्या मदतीने पासपोर्ट चा बंदोबस्त झाला.

नाटकाचे पुढचे प्रयोग रद्द झाले. आणि रोहिणी हट्टंगडी गांधी च्या शूटिंग साठी लंडनला रवाना झाली.

लंडनला आल्यावर सुद्धा कस्तुरबा गांधीं ची भूमिका करणं सोप्पं काम नव्हतं. रिचर्ड सरांनी सर्वांना संपूर्ण स्क्रिप्ट दिली होती. शूटिंगला येण्याआधी प्रत्येकाने स्वतःच्या भुमिकेचा अभ्यास करून यावा, असं सांगण्यात आलं होतं. रोहिणी ताईंना कस्तुरबा गांधीं विषयी असलेली केवळ दोनच पुस्तकं मिळाली. तसेच रोहिणी ताईंच्या इंग्रजीला महाराष्ट्रीयन लहेजा होता. त्यामुळे इंग्रजी सुधारण्यासाठी त्यांनी एका शिक्षकाकडून ट्रेनिंग घेतली.

तसेच रोहिणी आणि गांधींची भूमिका करणारे बेन किंगस्ले हे दररोज चरखा चालवायला शिकत. दोघांनी जवळपास २ – ३ महिने या गोष्टीचा सराव केला. रोहिणी ताई भारतीय असल्याने त्या भारतीय संस्कृती बद्दल दिग्दर्शकांना अनेक गोष्टी सांगायच्या.

१९८२ साली गांधी सिनेमा रिलीज झाला. मराठमोळ्या रोहिणी हट्टंगडी यांचं जगभरात कौतुक झालं. इतकी सुंदर भूमिका केल्यामुळे त्यांच्यासाठी बॉलिवूडची दारं सुद्धा उघडली. अग्निपथ, सारांश, अर्थ, मुन्नाभाई एम बी बी एस सारख्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी छाप पाडली. आजही रोहिणी ताई मराठी मालिका आणि सिनेमात सळसळत्या ऊर्जेने काम करत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.