विरोधक असून देखील सांगतो, रोहित पवारांनी तयार केलेलं वातावरण विचार करायला लावतं. 

रोहित पवार हे नाव गेली वर्षभर माहिती नव्हतं. शरद पवारांचे नातू इतक काय तो संबंध. ते जिल्हापरिषदेचे सदस्य असल्याने चर्चेत राहण्यासारख काहीच नव्हतं. पण विषय क्रिकेटचा आला. शरद पवारांच्या नातवाने पुणे जिल्ह्यात देशातील सर्वात मोठ्या हापपीच क्रिकेट स्पर्धांच आयोजन केलं असल्याचं सांगण्यात आलं.

तिथूनच रोहित पवारांना फॉलो करण्याची वेळ आली. 

लोकसभेच्या इलेक्शनवेळी रोहित पवार कर्जत जामखेडमधून लढणार असल्याच पत्रकार परिषद घेवून त्यांनीच डिक्लेर केलं आणि अजून एक घराणेशाही लादली जाणार म्हणून आम्ही सुस्कारा सोडला. 

दरम्यानच्या काळात राज्यातलं वातावरण पुर्णपणे राष्ट्रवादीच्या विरोधात गेलं. शरद पवारांनी निवडून येणाऱ्या लोकांची मोळी विस्कटू लागली आणि एकएक करुन प्रत्येकजण पक्षातून बाहेर उड्या मारू लागला. अशा वेळी रोहित पवार लढण्याचा आपला निर्णय मागे घेतील अस वाटू लागलं पण रोहित पवारांनी कर्जत जामखेडकडे आपला मोर्चा वळवलाच.

काही दिवसांपुर्वी कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांच तिकीट कन्फर्म झालं. चंद्रकांत पाटलांना बाहेरचा उमेदवार म्हणून विरोध झाला. भाजपच्या हक्काचा आणि सेफ मतदारसंघ म्हणून चंद्रकांत दादांनी निवड केली खरी पण अनपेक्षित विरोध त्यांना पहावा लागला.

कर्जत जामखेडमध्ये मात्र याच वेळीच चित्र उलट होतं.

मुख्यमंत्र्यांनी बाहेरचं पार्सल असा उल्लेख करुन देखील लोकच टिव्हीवरील मुलाखतीत त्यांचा विरोध करु लागले. रोहित पवारांनी इथल वातावरण बदलवलं हे स्पष्ट चित्र निवडणुकीला काही दिवसं शिल्लक असताना दिसू लागलं. 

कर्जत जामखेड हा मतदारसंघ तसा रोहित पवारांसाठी कुठल्याच बाजूने सेफ नव्हता. एकतर या मतदारसंघात मंत्रीपद असल्याने लोक भाजपच्या पारड्यात मत टाकणार हे स्पष्ट होतं. मतदारसंघात जातीची समीकरणं जोरात चालत असल्यामुळे त्याचा प्रभाव रोहित पवारांच्या मतांवर पडणार हे देखील स्पष्ट होतं.

पण रोहित पवारांनी कर्जत जामखेडच्या चक्करा सहा महिन्यापुर्वीच वाढवल्या.

चार महिन्यांपुर्वी कर्जत जामखेडमध्ये त्यांनी कायमचा तळ ठोकल्याचं सांगण्यात येत. त्यांना विरोध करण्यासारखा पहिला मुद्दा होता तो बाहेरचा उमेदवार. रोहित पवारांनी योग्य टायमिंगमध्ये कर्जत जामखेडमध्ये तळ ठोकल्याने हा मुद्दा मागे पडला. अगदी मुख्यमंत्र्यांनी टिका केल्यानंतर देखील या विषयाचा फायदा विरोधकांना झाला नाही. 

दूसरा मुद्दा होता तो म्हणजे मतदारसंघातल्या जातीय समीकरणाचा.

इथे रोहित पवारांनी संपुर्ण इलेक्शन कशाप्रकारे फक्त विकासावर राहिल याकडे लक्ष दिलेले दिसून येते. जातीचा विषय न काढता पवार नेहमीच कर्जत जामखेडच्या समस्येदबद्दल माध्यमांसोबत बोलत राहिले. पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न लोकांपर्यन्त घेवून जाण्यात आले. या दरम्यान रोहित पवारांनी लोकांनी प्रत्यक्ष संपर्क साधण्यास सुरवात केली. मागच्या चार ते पाच महिन्यांपासून रोहित पवारांची फेसबुक वॉल पाहिली तर लक्षात येत की मतदारसंघ सोडून रोहित पवार कुठेच फिरले नाहीत. सांगलीच्या महापुराचा अपवाद सोडला तर रोहित पवारांनी एकही दिवस मतदारसंघ सोडल्याचं दिसत नाही.

या दरम्यान रोज दहा ते पंधरा गावांचा ठरवून संपर्क दौरा करण्यात येत होता.

भविष्याची दिशा म्हणून रोहित पवार विकासकामांबद्गल बोलू लागले. मध्यंतरी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. कर्जत की जामखेड शहरात एक बाई आपल्या घराच्या बाहेर असणारं गटारीच पाणी रोहित पवारांना दाखवत होती. मुळात या समस्या ऐकून घेण्यासाठी उमेदवाराने लोकांपर्यन्त पोहचणं गरजेचं असतं ते रोहित पवारांनी सक्षमरित्या केलं. त्यामुळे जातीवर मतदान न करता कर्जत जामखेडमध्ये पहिल्यांदा जातीच्या बाहेर जावून विकासाबद्दल लोकांमध्ये चर्चा होवू लागली.

प्रत्येक गावात दहाहून अधिक वेळा जाण्याचा विक्रम रोहित पवारांनी केला आणि हिच गोष्ट रोहित पवारांच वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरली.

मतदारांपर्यन्त पोहचणं म्हणजे त्यांच्या घरांपर्यन्त जाणं.

घरातील महिला आणि मुलांना देखील नाव माहिती होणं. बाहेरचे असल्याने रोहित पवारांपुढे ही सर्वात मोठ्ठी समस्या होती.  पण आई सुनंदा पवार यांच्यामार्फत रोहित पवारांनी ही चौकट मोडली. वारी पासून ते छोटेमोठ्ठे समारंभ आखत महिलांसोबत संपर्क वाढवण्यात आला. त्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. आपल्या समस्येबद्दल कोणीतरी बोलत आहे हा विचार करून महिलांचा मोठ्ठा पाठिंबा रोहित पवारांनी मिळवला.

या दरम्यानची एक गोष्ट नमुद करण्यासारखी आहे ती म्हणजे,

आपल्या भाषणात रोहित पवारांनी कुठेही प्रा. राम शिंदे यांच्यावर खालच्या शब्दात टिका केली नाही. विरोधकांकडून टिकाच होतं नसल्याने राम शिंदे निष्प्रभ ठरत गेले.  राम शिंदेनी टिका केल्यानंतर देखील संयमीत उत्तरे देत गेल्याने म्हणावं अस विरोधाच वातावरण तयार करण्यास मर्यादा पडत गेल्या. 

त्यानंतरचा आणि सर्वात शेवटचा मुद्दा असतो तो लोक नेहमी जिंकणाऱ्या उमेदवाराला मत देतात. नाहितर आपलं मत वाया जात असा त्यांचा समज असतो. पण रोहित पवारांनी आपली सर्व ताकद अर्ज भरताना वापरली. याच वेळी विरोधी पक्षातील जास्तीत जास्त लोकं आपल्या बाजूने कसे येतील याकडे जाणिवपुर्वक लक्ष देण्यात आले. त्यातून लोकांपर्यन्त रोहित पवार विजयी होवू शकतात हा संदेश गेला.

एकंदरीत आज रोहित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये निर्माण केलेलं वातावरण अभ्यासाचा विषय आहेच पण राष्ट्रवादीसारख्या बुडत्या पक्षाला देखील या रोहित पॅटर्नला अभ्यास करण्याची गरज आहे. पण अद्याप निवडणूका आणि रिझल्ट यायचा बाकी आहे. 

  • जयंत इंगळे 9422782361

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.