त्या दिवशी रोहित शर्मा सर जडेजाला बुक्कीत गार करणार होता.
काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली होती. तीन टेस्ट, ६ वनडे आणि 3 टी-२० असा भरगच्च दोन महिन्यांचा कार्यक्रम होता. बीसीसीआयने खेळाडूना त्यांच्या परिवाराला सुद्धा दौऱ्यावर नेण्याची परवानगी दिली होती. सिरीज दरम्यान मॅच नसेल तेव्हा निसर्गसंपन्न आफ्रिका पाहता येईल, एखादी छोटीशी व्हेकेशन साजरी करता येईल म्हणून बरेच खेळाडू आपल्या पत्नीसोबत आले होते.
यातच होते मुंबईकर रोहित शर्मा आणि अजिंक्य राहाणे !!
अंडर १६च्या वेळेपासून रोहित शर्मा आणि रहाणे हे दोस्त आहेत. रोहितची बायको रिद्धीमा आणि अजिंक्यची बायको राधिका या दोघी देखील चांगल्या मैत्रिणी आहेत. एकदा त्यांनी प्लन केला की जंगल सफारीला जायचं. व्यवस्थित नियोजन बुकिंग वगैरे केलं. रोहित शर्माची जोडी, अजिंक्य रहाणेची जोडी, टीमचे डाटा अनालिस्ट सीकेएम धनंजय.
या पाच जणांनी एक चूक केली म्हणजे श्रीश्री सर रविंद्र जडेजाला सोबत घेतलं.
सफारीवाल्यांनी या सहा जणांसाठी एक छोटी जीपसारखी गाडी दिली होती. आफ्रिकेची जंगले ही सगळ्या जगभरात प्रसिद्ध आहेत ती तिथल्या हिंस्र प्राण्यांसाठी. जेवढे जंगलात आत जातील तेवढे या भारतीय खेळाडूना वेगवेगळे प्राणी दिसत होते. हरणांचा कळप तर अगदी त्यांच्या गाडीजवळून जात होता. सगळे एकदम खुश होते. मस्त ट्रीप सुरु होती.
अचानक एका लांबचक पसरलेल्या गवताच्या कुरणाजवळ गाडी थांबली. आफ्रिकन गाईडने त्यांना सांगितलं की आता आपल्याला चित्ता वॉकसाठी जायचं आहे.
आपल्या खेळाडूना वाटल की ठीक आहे, काही पाळीव चित्ते असतील त्यांच्या सोबत वॉक करायचा असेल. पण तस नव्हतं.
भर जंगलात काहीवेळ चालल्यावर त्यांना दिसल की अगदी जवळ दोन पूर्ण वाढलेले तगडे जंगली चित्ते आपली शिकार फाडून खात बसलेले आहेत. कधीही न पाहिलेलं हे थरारक दृश्य बघून रहाणे वगैरे सगळेजण भारावून गेले. गाईड सोबत असल्यामुळे भीती नव्हती. सगळ एकदम व्यवस्थित चालू होतं अचानक आपले श्रीश्री जडेजा साहेबांना खुमखुमी आली.
काही वात्रट मुलं प्राणीसंग्रहालयात गेल्यावर पिंजऱ्यातल्या वाघाला बघून जशा खोड्या काढतात तशा खोड्या रविंद्र जडेजाला सुचू लागल्या. तो चित्रविचित्र आवाज काढून त्या चित्त्याला हाका मारू लागला. फरक एवढाच होता की हे चित्ते पिंजऱ्यात नव्हते, आणि अगदी काही फुटांवर आपली शिकार खात होते.
त्या चित्त्यानी हा विचित्र आवाज ऐकून आपल खाण थांबवल आणि आवाजाच्या दिशेने कान टवकारून पाहू लागले. गाईडसकट इतर पाचजणांची टरकली. जडेजाच आवाज काढण सुरूच होतं. रोहित शर्मा म्हणतो की,
“वो मेरी जिंदगी का सबसे डरावना पल था. उसी के साथ मुझे जडेजा पे बहुत गुस्सा भी आ रहा था. मुझे तो लगा उसे एक पंच लगाके चूप बिठाऊं.”
पण काहीही करणे हे त्या क्षणाला योग्य नव्हते म्हणून रोहित शर्मा आपला राग आवरून शांत उभा राहिला. चित्त्याने थोडी फार हालचाल केली होती. तो त्यांच्या दिशेनेच रोखून बघत होता. गाईडने भारतीय टीमला सांगितले की,
“जरी चित्त्याने हल्ला केला तर कोणीही गाडीच्या दिशेने पळू नका. आहे त्या जागी स्थिर थांबा.”
गाईडचा सल्ला ऐकून सगळेच्या सगळे आणखी हादरले.
रोहित शर्मा म्हणतो काही बरा वाईट प्रसंग आला तर याचा विचार करून मी सगळ्यात जास्त घाबरलो होतो. आमच्या पत्नी आमच्यावर विश्वास ठेवून या सफारीवर आल्या होत्या. त्यांची जबाबदारी देखील आमच्यावर होती. मात्र त्या दोघीही धैर्याने शांत उभ्या होत्या.
एव्हाना जडेजाच्या पण डोक्यात प्रकाश पडला होता आणि तो घाबरून बर्फाप्रमाने थंड पडला होता.
काही क्षण तसेच गेले आणि मग चित्त्यानी त्यांच्यावरचे लक्ष हटवले आणि आपली पकडलेली शिकार खायला सुरवात केली. हळूच मग ही पूर्ण टीम आवाज न करता आपल्या गाडीकडे आली आणि पुढची सगळी सफारी रद्द करून थेट परत हॉटेल वर आले.
हॉटेलवर आल्यावर रविंद्र जडेजाला प्रचंड शिव्या खाव्या लागल्या.कप्तान विराट कोहली, सिनियर खेळाडू एमएस धोनी यांनीसुद्धा जडेजाची खरडपट्टी काढली. यापूर्वी देखील गुजरात मध्ये जडेजाने असेच काही पराक्रम केले होते आणि त्याला वाचवायला सरकारने हस्तक्षेप करावा लागला होता.
त्या दिवशी आफ्रिकेमधेय नशीब बलवत्तर नाही तर भारताचे तीन तीन गुणवान खेळाडू चित्त्याची शिकार झाले असते.
हे ही वाच भिडू.
- सचिन आणि विराट राहिले बाजूला, पोरानं घरच्यांना पण सोडलं नाही.
- रोहित शर्माची मुंबई इंडियन्स धोनीच्या चेन्नईवर कायम भारी का पडते?
- कालच्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचमध्ये हे ५ नवे विक्रम बनले आहेत.