रस्त्यावर धुमाकूळ घातल्यानंतर रोल्स रॉईस आता आकाशात दंगा करायला फुल्ल तयार आहे

काल एक मीम बघितलं ज्याचा आशय होता की खरे लिजेंड लोक तेच असतात ज्यांना गाड्यांचा नाद असतो. सांगायचा मुद्दा इतकाच की, भारतामध्ये तरुणाईला गाड्यांचं किती क्रेझ आहे. एक काळ असा होता जेव्हा बटणांच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर हमखास कोणत्या ना कोणत्या गाडीचा फोटो असायचाच. आता फक्त काळ बदललाय पण क्रेझ नाही. त्या वॉलपेपर वाल्या गाड्या आता सोशल मीडियावर स्वतःच्या फोटोसोबत झळकवणं हा ट्रेंडच झालाय.

अशा या कार लव्हर्समध्ये क्वचितच असा कुणी असेल ज्याला रोल्स रॉईस आवडत नाही. कुणाला गाड्या आवडत नसतील तरी त्याला रोल्स रॉईस माहित नाही असेही फार कमी असतील. या ब्रँडची हवाच अशी वेगळी आहे. आणि आता तर हा ब्रँड रस्त्यावर धुमाकूळ घातल्यानंतर आकाशात दंगा करायला फुल्ल तयार आहे.  कारण रोल्स रॉईसने स्वतःचं विमान आणलंय भिडू.

त्यातही त्यांनी अशी एक घोषणा केलीये ज्याने कान टवकारल्या गेलेत, भुवया उंचावल्या गेल्यायेत, तोंड तर उघडंच्या उघडच राहिलंय. 

रोल्स रॉईसने जाहीर केलंय की, त्यांचं ऑल-इलेक्ट्रिक स्पिरिट ऑफ इनोवेशन हे विमान अधिकृतपणे जगातील सर्वात वेगवान ऑल-इलेक्ट्रिक विमान आहे.

या विमानाने दोन नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत ज्यांची आता स्वतंत्रपणे पुष्टी झाली आहे. सर्वप्रथम रोल्स रॉईसच्या या इलेक्ट्रिक विमानाने ५५५.९ किलोमीटर प्रतितास या वेगाने ३ किमी अंतर कापलं आहे. यासोबतच त्याने सध्याचा २१३.०४ किलोमीटर प्रतितास वेगाचा विक्रम मोडला आहे. तर  १६ नोव्हेंबर २०२१ ला या विमानाने सीमेंसचा ई-एयरक्राफ्ट एक्स्ट्रा ३३० एलई एरोबैटिक रेकॉर्डसुद्धा  मोडला. सीमेन्स ई-एअरक्राफ्टने २०१७ मध्ये २३१.०४ किलोमीटर प्रतितास वेगाचा विक्रम केला होता.

हा रेकॉर्ड बनवताना विमानाचा कमाल वेग ६२३ किमी प्रतितास होता. आणि याच वेगामुळे रोल्स रॉईसचं हे ऑल-इलेक्ट्रिक विमान जगातील सर्वात वेगवान उडणारं ई-विमान बनलं आहे. दोन्ही रेकॉर्ड्सची अधिकृतपणे पडताळणी देखील करण्यात आली आहे.  फेडरेशन एरोनॉटिक्स इंटरनॅशनल (FAI) आणि वर्ल्ड एअर स्पोर्ट्स फेडरेशनने यांनी ही  पडताळणी केली आहे. या  फेडरेशन जागतिक एव्हिएटर आणि अंतराळवीर रेकॉर्ड नियंत्रित आणि प्रमाणित करतात.

या विमानाने  ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाच्या बॉस्कोम्ब डाउन इथल्या विमान चाचणी साईटवर ५३२.१ किमी प्रतितास ते १५२ किमी प्रतितास वेगाने उड्डाण केलं होतं. एवढंच नाही तर या विमानाने सर्वात कमी वेळेत ३००० मीटर्स गाठण्याचा विक्रमही केला आहे. यासह त्याने २०२ सेकंदात ही उंची गाठण्याचा विक्रम मोडला. 

स्पिरिट ऑफ इनोवेशनचं  हे इलेक्ट्रिक विमान सिंगल सीटर आहे. इतर कोणत्याही विमानाच्या तुलनेत यामध्ये सर्वात शक्तिशाली ६४८० सेल बॅटरी पॅक आहे. ही  बॅटरी इतकी पावरफुल आहे की याने ७५०० मोबाईल चार्ज होतील. विमानात ४०० किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. ही मोटर सुपरकार प्रमाणे ५३४bhp ची शक्ती निर्माण करण्यास सक्षम आहे. तर विमानाच्या पुढे लावलेला प्रोपलर रोटेशन एका मिनिटात २२०० फेऱ्या करतो.

 रेकॉर्डसाठी, रोल्स रॉईसने विमानचालन ऊर्जा संचयन विशेषज्ञ YASA सोबत भागीदारीत काम केलं. रोल्स रॉईसचे सीईओ वॉरेन ईस्ट यांचं म्हणणंय की, हे विमान प्रगत बॅटरी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानाचं उदाहरण आहे. जे इलेक्ट्रिक एव्हिएशनमध्ये मैलाचा दगड ठरेल. शिवाय या तंत्रज्ञानामुळे रोल्स रॉईसच्या भविष्यातील योजनाही अपग्रेड होतील. 

रोल्स रॉईसचं हे विमान आणि त्याची बांधणी बघून सगळेचं वाह वाह करताय. त्यातच या विमानाने तयार केलेले सर्व रेकॉर्डस् रोल्स रॉईसच्या दूरदृष्टिकोनाचे दर्शन घडवते. आतापर्यंत रोल्स रॉईसच्या गाड्या रस्त्यावर ग्रँड एंट्री मारायच्या. मात्र आता आकाशातही रोल्स रॉईसच्या रॉयल एन्ट्रीने चर्चेचा विषय झाला आहे. रोल्स रॉईसच्या या विमानांचे देखील फॅन तयार होतील, यात फार वेळ लागणार नाही असं दिसतंय. 

हे ही वाच भिडू :

web title : Rolls Royce Aircraft : Rolls Royce claimed that their aircraft is the fastest in the world

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.