या लेण्यांच्या मुळे कळतं की कोकणचं थेट इटलीबरोबर कनेक्शन होतं ..

भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात लेण्यांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते. या लेण्यांमधून मिळणारी माहिती, इतिहासाशी असलेला संबंध याची उकल होते. महाराष्ट्रात असलेल्या प्राचीन बौद्ध लेण्या जगभरात असलेलं अमाप सौंदर्य प्रकट तर करतातच पण अगदी परदेशी कनेक्शनसुद्धा दर्शवतात. अशीच कोकणातली लेणी आहे ज्याचा संबंध थेट रोम म्हणजे इटलीशी आहे. तर जाणून घेऊया या इतिहासाबद्दल.

रोमसोबत व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध असलेली लेणी म्हणजे कुडा लेणी.

कुडा लेणीचा इतिहास हा महत्वाचा आहे. इसवी सन ३ ऱ्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये कुडा लेणीचा समावेश केला जातो. मुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडाची भुरळ जगातील ट्रेकर्स आणि अभ्यासकांना पडते म्हणजे पडतेच. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. अंतरावर आणि माणगावच्या आग्नेयला २१ कि.मी. अंतरावर असणारे कुडा हे रायगड जिल्ह्यात वसलेलं एक खेडेगाव आहे.

कुडा लेणी हि मांदाड पासून अगदी जवळ आहे आणि याच मांदाडचं कनेक्शन थेट इटलीशी आहे. सातवाहन काळामध्ये परदेशी व्यापार वाढलेला होता. सोबतच सांस्कृतिक आणि व्यापाराची देवाणघेवाणसुद्धा मोठ्या प्रमाणात झाली.

लेखक डॉ. श्रीदत्त राऊत या लेण्यांविषयी ऐतिहासिक माहिती लिहितात कि, सातवाहन कालखंडात भारताचा रोमशी होणारा व्यापार हे महत्त्वाचे साधन होते. देशावरील आणि कोकणातील माल नाणेघाटातून जवळ असलेल्या कल्याण बंदरात जात असे. नाणेघाटाच्या पश्चिमेस खाली उतरल्यावर प्रधानपाडा व वैसाघर या दोन लहान वस्त्या आहेत. प्राचीन काळी व्यापारी वर्ग मंडळी येथे मुक्काम करीत असत.

व्यापारी मार्गांनी व्यापार व इतर अनेक कारणांनी आलेले परकीय व्यापारी यवन महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर लहान मोठ्या वसाहती निर्माण करून येथील समाज जीवनात मिसळून गेले. रोम सारख्या इतर अनेक साम्राज्याशी व्यापाराच्या निमित्ताने संपर्क आल्याने स्थानिक आर्थिक जीवनावर सुबत्ता नांदू लागली.

कुडा लेणीजवळ आहे मांदाड बंदर. या बंदराचा संबंध इटलीच्या लेखकांनी त्यांच्या दस्तऐवजांमध्ये केलेला आहे. मांदाड म्हणजे रोम लेखकांनी उल्लेख केलेलं मॅंडागोरा बंदर होय. मांदाड येथील उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची विटा व खापरे सापडलय होत्या. हे सातवाहन साम्राज्यात महाभोजांच्या मांदव घराण्याचे केंद्र होते.

सातवाहनांच्या अस्तानंतर गुप्त, वाकाटक, राष्ट्रकूट राजवटींचा प्रभाव महाराष्ट्र संस्कृतीवर झाला. महाराष्ट्र प्रांतांच्या भूभागाचे राजकीय व सांस्कृतिक एकीकरण यादव कालखंडात झाले असे तत्कालीन संदर्भात दिसून येते. महाराष्ट्रातील सांस्कृतिक जडणघडण मध्ये अनेक धर्मांचा, जातींचा, अनेक स्थलांतरित, राजवटींचा, साम्राज्यांचा, परकीय व्यापारी व आक्रमकांचा हातभार लागला हे मांदाड बंदरावरून स्पष्ट होते.

रोमन लेखकांनी कुडा लेणीत व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आश्रयाची वर्णनं लिहून ठेवलेली आहेत.

कुडा लेणीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक १ ते १५ ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक १६ ते २६ ही लेणी वरच्या स्तरात आहेत. ही सर्व लेणी बौद्धांच्या हीनयान पंथाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये स्तूपपूजा प्रचलित होती. बुद्धप्रतिमा इ.स. सहाव्या शतकामध्ये स्थापिल्या गेल्या. लेणीतील २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आढळतात. 

इंडियन स्टडी सेंटर मुंबईने अनेक संदर्भावरून कोकण आणि रोम यांचं पहिल्या दुसऱ्या शतकात अजून काय कनेक्शन होतं याची माहिती घेण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. सातवाहन काळात महाभोजांचं केंद्रस्थान असलेलं मांदाड ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं होतं कारण यातून रोमसोबत असलेले व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध स्पष्ट होतात.

इंडो रोमन पोर्ट ऑफ मॅंडागोरा मध्ये उल्लेख करण्यात आला आहे कि पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. यावरून अनेक लोकांनी कोकण आणि इटलीच्या संबंधावर प्रकाश टाकला. कुडा लेणी आणि मांदाड आज भलेही दुर्लक्षित असलं तरी त्याचा इतिहास हा अतिप्राचीन आणि महत्वाचा आहे.  

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.